पौष्टिक ‘स्मूदी’ पिऊया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 01:30 AM2017-06-25T01:30:08+5:302017-06-25T01:30:08+5:30
आपल्या घरी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाज्या असतात. त्यांचे विविध प्रकार आपण करत असतोच. पण सध्या अशा विविध फळे आणि भाज्यांचा एक हटके
- भक्ती सोमण
आपल्या घरी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाज्या असतात. त्यांचे विविध प्रकार आपण करत असतोच. पण सध्या अशा विविध फळे आणि भाज्यांचा एक हटके आणि पौष्टिक प्रकार जाम लोकप्रिय आहे, तो म्हणजे स्मूदी.
आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत खूपच जागरूक झाले आहेत. आपण जे खाऊ- पिऊ त्यातून काही तरी पौष्टिक मिळाले तर ते त्यांना हवे असते. त्यासाठी खाण्यापिण्यावर असंख्य प्रयोग होत असतात. यातलाच एक हटके प्रकार
म्हणजे स्मूदी.
स्मूदी म्हणजे दही, दूध घालून केलेला फळ आणि भाज्यांचा घट्ट रस. जवळपास मिल्कशेकसारखाच. घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून सहज करता येणारा. स्मूदीसाठी लागतं काय? तर आपण नेहमी खातो ती सर्वच फळं. केळं, सफरचंद, स्ट्रॉबेरी, पेर, कलिंगड, संत्रं, मोसंबी अशी सगळंीच फळे. आणि जोडीला दही, दूध किंवा पाणी. त्यानंतर गोड वा खारी याप्रमाणे मीठ, साखर, मिरची, कोथिंबीर, क्वचित पुदिना असं. काही वेळा फळांबरोबर दालचिनीपूड, जायफळ पूड, कोको पावडरचा वापर केला जातो. बरं स्मूदी करणंही एकदम सोप्पं. एक केळं, अननसाचे तुकडे, अर्धा कप दही वा दूध, काजू, साखर हे सर्व मिक्सरमधून काढायचं. झाली स्मूदी तयार. घरात आंबे खूप आहेत. मिल्कशेक पिऊन कंटाळा आला असेल तर त्याची स्मूदी करा! आंब्याच्या फोडी, दही, थोडंसं क्रीम, साखर मिक्सरमधून घट्टसर काढा. ते मिश्रण काचेच्या ग्लासमध्ये घाला वरून छोट्या आंब्याच्या फोडी आणि मध. अहाहा... अफलातूून चव लागते. गार करून प्यायचे तर गार करून नाहीतर तसेही. घरात केळी असतातच. तर या केळ्याचे, अननसाचे तुकडे व संत्र्याचा रस एक तास फ्रीजमध्ये गार करून मिक्सरच्या भांड्यात हे सर्व घालून त्यात दही व पिठीसाखर घालून दाट घट्टसर अशी सेलन स्मूदी तयार होते. केळ्याची स्मूदी करताना तुम्ही त्यात चॉकलेट सिरपही घालू शकता. ओट्सचाही वापर आवडीप्रमाणे करता येऊ शकतो. अशा प्रकारे एकच फळ नाही तर दोन-तीन फळं एकत्र करूनही स्मूदी करता येईल.
हे वाचून साहजिकच घरी स्मूदी करायचा मोह नक्कीच होईल. आता हॉटेल्स, मॉलमध्येही स्मूदी सहज मिळते. जर तिथे पिणार असाल तर ती प्यायला देतात ती काचेच्या आकर्षक ग्लासमधून. घट्ट स्मूदी, त्यावर फळांचे तुकडे घालून आकर्षक वेष्टनातली ही स्मूदी सिप सिप पिण्यात मजा येते. या स्मूदी साधारण २०० रुपयांपासून पुढे मिळतात.
एखादवेळेस ज्या फळाची स्मूदी करायचीय तेच घरी नसेल तर मूड घालवू नका. कारण आता बाजारात स्मूदी सिरपही सहज मिळते. ते सिरप दूध, दह्यात घालून तुम्ही स्मूदीचा आनंद घेऊ शकता.
घरातल्या सामानापासून अगदी सहज करता येऊ शकणारी, महत्त्वाचं म्हणजे अत्यंत पौष्टिक आणि कमी खर्चात तयार होणारी. आरोग्याच्या दृष्टीनेही परिपूर्ण असल्याने ती आपलीशी वाटते. हो ना?
bhaktisoman@gmail.com