‘डीजोकर’ नव्हे, ‘एक्का’च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 03:31 AM2020-02-04T03:31:50+5:302020-02-04T03:36:27+5:30

‘ऑल टाइम ग्रेटेस्ट’ होण्यापासून नोव्हाक जोकोविच आता फक्त ३ ग्रँडस्लॅम दूर आहे.

Novak's tennis world is known as the 'Djokar'. | ‘डीजोकर’ नव्हे, ‘एक्का’च

‘डीजोकर’ नव्हे, ‘एक्का’च

Next

‘ऑल टाइम ग्रेटेस्ट’ होण्यापासून नोव्हाक जोकोविच आता फक्त ३ ग्रँडस्लॅम दूर आहे. आठव्यांदा ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ जिंकणाऱ्या नोव्हाकपुढे वीस ग्रँडस्लॅम जिंकणारा रॉजर फेडरर आहे. रॉजरच्या या विक्रमाची बरोबरी कोणीही करू शकलेला नाही. मात्र, रॉजरच्या तुलनेत नोव्हाककडे खूप वेळ आहे, कारण तो रॉजरपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे. सर्बियाच्या नोव्हाकची आजवरची वाटचाल स्तिमित करणारीच आहे.

खरे तर नोव्हाककडे रॉजर फेडररसारखी नजाकत नाही. रॉजरसारखी देवदत्त शैली आणि भक्कम तंत्र नाही. राफेल नदालसारखी ताकदही नोव्हाककडे नाही; पण नोव्हाककडे आहे प्रचंड जिद्द. जिंकण्यासाठी आवश्यक कमालीचा निग्रह. तासन् तास घाम गाळून त्याने कमावला आहे प्रचंड दम. तसे पाहता रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदाल हे तिघेही टेनिस विश्वातील सार्वकालिक महान टेनिसपटू आहेत. रॉजरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २००३मध्ये सुुरू झाली. त्यानंतर २००५मध्ये राफेलने आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवर पाय ठेवला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे २००८मध्ये नोव्हाकची कारकीर्द सुुरू झाली. या तिघांच्या उदयानंतर ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, यूएस व विम्बल्डन या चार ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेऱ्यांत कोणी इतर टेनिसपटू क्वचित दिसले.

रॉजर, राफेल आणि नोव्हाक या तिघांनी आजवर जेवढी व्यक्तिगत ग्रँडस्लॅम जिंकली, तेवढी कोणीच जिंकलेली नाहीत. या अर्थाने तर तिघे ‘सार्वकालिक महान’ आहेतच. दर वेळी आपल्याइतक्याच दर्जेदार स्पर्धकाशी दोन हात करून या तिघांना ग्रँडस्लॅम विजेतीपदे जिंकावी लागली. हा संघर्ष लक्षात घेतल्यानंतर या तिघांचेही मोठेपण लक्षात यावे. हे तिघेही एकाच काळात एकमेकांशी झुंजण्यापेक्षा वेगवेगळ्या कालखंडांत जन्मले असते, तर कदाचित त्यांच्या ग्रँडस्लॅमची संख्या आजच्यापेक्षा वाढलीही असती. अव्वल राहण्यासाठी अव्वल कौशल्य-तंत्र लागते. दर्जा लागतो. अपरिमित कष्टाची तयारी लागते. सतत जिंकत राहण्याची, कधीही हार न मानण्याची विजिगीषुवृत्ती असावी लागते. पण हेच सगळे प्रतिस्पर्ध्याकडेही असेल तर..? तेव्हा शारीरिक क्षमता म्हणजेच वय हा निकष महत्त्वाचा ठरतो. रॉजर व राफेल यांच्यापेक्षा नोव्हाक या घडीला उजवा आहे तो याच एका मुद्द्यावर.

नोव्हाक ३२ वर्षांचा, नदाल ३३चा आणि रॉजर ३८चा आहे. सर्वांत तरुण असूनही शारीरिक तंदुरुस्तीसाठी नोव्हाक जे कष्ट घेतो, ते अफलातून आहेत. ख्रिस्तीयानो रोनाल्डो (फूटबॉल), मायकेल फेल्प्स (जलतरण), उसेन बोल्ट (अ‍ॅथलेटिक्स) व विराट कोहली (क्रिकेट) यांसारख्या ‘स्पोर्ट मशीन’ मानल्या जाणाºया जगातल्या मोजक्या सर्वोत्तम तंदुरुस्त मानवी शरीरांमध्ये नोव्हाकचा समावेश होतो. या मंडळींनी मानवी क्षमतांवर मात करून अविश्वसनीय टप्पे गाठले आहेत. खेळ म्हटले की, हारजीत आलीच. कोणी किती स्पर्धा जिंकल्या, कोणते विक्रम रचले, हे महत्त्वाचे असतेच; पण काही खेळाडू असे असतात, की जे स्वत: खेळाची ओळख बनतात. टेनिसमध्ये नोव्हाकची वाटचाल त्या दिशेने चालू आहे. विजेतेपदाची भूक अशीच कायम राहिली, तर रॉजरचा सर्वाधिक ग्रँडस्लॅमचा विक्रम नोव्हाक मागे टाकेल यात शंका नाही. ‘नोव्हाक-राफेल-रॉजर’ या त्रयीत आणखी एका मुद्द्यावर नोव्हाक उजवा आहे. नोव्हाकचे बाल्य खडतर होते. रॉजरसारखे स्वित्झर्लंडमधले आल्हाददायी किंवा राफेलसारखे खेळकर स्पॅनिश बालपण त्याच्या नशिबी नव्हते.

नव्वदच्या दशकात सर्बियातल्या युद्धाची होरपळ सोसत नोव्हाक वाढला. पाणी, दूध, ब्रेड अशा मूलभूत गोष्टींसाठीसुद्धा लहानग्या नोव्हाकला रांगेत थांबावे लागले आहे. जगण्याच्या तेव्हाच्या संघर्षाने टेनिस कोर्टवरच्या नोव्हाकला अधिक कणखर बनवले आहे. कष्टप्रद बाल्याने त्याला लढवय्या केले; पण म्हणून नोव्हाकचा कोर्टावरचा वावर गंभीर झाला, असेही नव्हे. गमतीजमती करत वावरणाऱ्या नोव्हाकला टेनिस विश्व ‘डीजोकर’ म्हणून ओळखते. वास्तवात मात्र अचंबित करणारे यश त्याला खऱ्या अर्थाने कोर्टवरचा ‘एक्का’ ठरवत आहे.

वीस ग्रँडस्लॅम जिंकणारा रॉजर फेडरर जगात अव्वल आहे. १९ ग्रँडस्लॅम जिंकणारा राफेल नदाल दुसऱ्या स्थानावर आहे. आठव्यांदा ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ जिंकून नोव्हाक जोकोविचने सतरावे ग्रँडस्लॅम खिशात घातले. एका अर्थाने हे तिघे सार्वकालिक महान.

Web Title: Novak's tennis world is known as the 'Djokar'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.