टपालासोबत आता बँकही आपल्या दारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 07:46 PM2018-10-15T19:46:14+5:302018-10-15T19:46:35+5:30
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात त्यापासून दूर राहणे टपाल खात्याला परवडणारे नाही.
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात त्यापासून दूर राहणे टपाल खात्याला परवडणारे नाही. टपाल खात्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी व उपयुक्तता कायम ठेवण्यासाठी विविध नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत, त्यानुसार नवनवीन कामे सुरू करून, टपाल खात्याला विकासाच्या मार्गावर नेले जात आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल हरीश अग्रवाल यांनी ‘लोकमत कॉफी टेबल’ उपक्रमांतर्गत टपाल खात्याच्या विविध योजना व भविष्यातील उपक्रमांबाबत माहिती दिली. या वेळी टपाल खात्याचे जनसंपर्क अधिकारी संतोष कुलकर्णीदेखील त्यांच्यासोबत होते.
हरीश अग्रवाल यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी खलील गिरकर यांनी साधलेला संवाद. राज्यातील गावांचे सर्व्हेचेही काम टपाल खात्यातर्फे करण्यात येणार असून, या माध्यमातून प्रत्येक गावांमधील किती नागरिकांच्या घरांमध्ये वीज पोहोचलेली नाही, याचा आढावा घेण्यात येणार आहे. पुढील महिन्यात या सर्वेक्षणाला प्रारंभ होणार आहे. राज्यात किती घरे अद्यापही विजेपासून वंचित आहेत, हे पाहण्यासाठी व त्या संदर्भात पुढील उपाययोजना आखण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. टपाल खात्याचे गावागावांत असलेले नेटवर्क यासाठी वापरण्यात येणार आहे.
टपाल खात्यासमोरील आव्हानांमध्ये वाढ होत असताना, टपाल खात्याची उपयुक्तता कायम ठेवणे कसे शक्य झाले?
- एके काळी टपाल खात्याचा वापर केवळ संवादासाठी केला जात असे. त्यामध्ये सातत्याने बदल होत गेला. १९९० मध्ये मुंबईत पत्रांचे वर्गीकरण करण्यासाठी आम्ही स्वयंचलित मशिन बसविली होती. त्याद्वारे एका तासाला ३० हजार पत्रांचे वर्गीकरण होत असे. पिन कोडनुसार बारकोडिंग करून हे वर्गीकरण होत असे. कालांतराने परिस्थितीत बदल होत गेला व पत्रांचे प्रमाण घटत गेले. १० वर्षांनंतर ही मशिन वापरणे बंद करण्यात आले. आता पत्रांऐवजी छोटे पार्सल पाठविण्याचे काम वाढले आहे. ए ४ आकारातील पाकिटे पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वीच्या काळी विविध स्पर्धांना प्रतिसाद देण्यासाठी पोस्ट कार्डद्वारे उत्तर पाठविले जात असे. त्यामुळे मोठमोठ्या पिशव्या भरून पोस्ट कार्ड येत असत. आता त्यामध्ये बदल झाला असून, स्पीड पोस्टचे काम वाढले आहे. छोट्या पत्रांकडून मोठ्या पत्रांकडे, पार्सलकडे हा व्यवसाय वळला आहे. ईकॉमर्समध्ये वाढ झाली आहे.
कुरिअरसारख्या सेवा पुरवठादारांचा टपाल खात्यावर प्रभाव पडतोे का?
- टपाल खाते हे खासगी कुरिअरपेक्षा अत्यंत चांगली सेवा देत आहे. त्यामुळे टपाल खात्याच्या स्पीड पोस्टद्वारे मिळणाऱ्या महसुलात गतवर्षीपेक्षा १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ग्राहकांनी पाठविलेले पार्सल नेमके कुठे पोचले, याबाबत ग्राहकांना मोबाइलवर एसएमएस पाठवून माहिती दिली जात आहे. पार्सल डिलिव्हरीची पूर्ण माहिती वेबसाइटद्वारे पुरविण्यात येते. इतकेच नव्हे, तर पार्सल पाठविणाºयाने पार्सल स्वीकारणाºयाचा मोबाइल क्रमांक दिला, तर त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्यांच्या सोयीनुसार वस्तू पोहोचविली जाते. अनेकदा खासगी कुरिअर कंपन्यांद्वारे पाठविण्यात आलेल्या वस्तू गहाळ होतात. मात्र, टपालाद्वारे पाठविण्यात आलेली प्रत्येक वस्तू संबंधितांपर्यंत पोहोचविली जाते. त्या वस्तू गहाळ होत नाहीत. याबाबत कोणतीही समस्या असल्यास, आम्ही तक्रार निवारण करण्यासाठी विशेष कक्ष तयार केला आहे.
टपाल खात्याची व्याप्ती व उपयुक्तता वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहे?
- टपाल खात्याने बचतीचा संदेश देऊन विविध योजना राबविल्या आहेत. त्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी)ची स्थापना १ सप्टेंबरपासून केली आहे. या माध्यमातून बँक ग्राहकाच्या घरी जाऊन अशी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकारकडून विविध प्रकरणांत मिळणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आयपीपीबी खात्यांचा चांगला वापर होत आहे. १ सप्टेंबरपासून आजपर्यंत राज्यभरात ८२ हजारांपेक्षा अधिक खाती सुरू करण्यात आली आहेत. सध्या आम्ही बँकेच्या ४२ शाखा व टपाल कार्यालयातील २१० अॅक्सेस पॉइंटच्या माध्यमातून बँकिंग सेवा पुरवित आहोत. डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व टपाल कार्यालयात या बँकेचे अॅक्सेस पॉइंट सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. ग्रामीण भागात व शहरात या बँकेद्वारे कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाणे शक्य झाले आहे. क्युआर कोड व बायोमेट्रिक पद्धतीमुळे खातेदाराव्यतिरिक्त कोणालाही याद्वारे व्यवहार करता येणार नसल्याने फसवणूक होण्याचे प्रकार घडणार नाहीत. खासगी खाते व व्यापारी, कंपन्यांचे खाते अशा प्रकारे नागरिक याच्याशी जोडले जाऊ शकतील. डिजिटल इंडियाच्या जगात सर्व डिजिटल आर्थिक व्यवहार या बँकेद्वारे करता येतील, अशी व्यवस्था उभारली जात आहे. राज्यातील सर्व टपाल कार्यालये कोअर सीस्टिम इंटिग्रेशन प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडण्यात आली आहेत.
आधार व पासपोर्ट सेवाही टपाल खाते पुरवित आहे?
- सध्या टपाल खात्यातर्फे आधार व पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सध्या १६ पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू असून, पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत आणखी १८ पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना त्याला कर्मचाºयांचा कसा प्रतिसाद आहे?
- कोणतीही नवीन योजना, तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरण्यापूर्वी मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेतले जाते. टपाल खाते टिकले, तरच कर्मचारी-अधिकारी टिकतील याची जाणीव असल्याने त्यांचे पूर्ण सहकार्य मिळते. टपाल खात्याचे अस्तित्व टिकविणे हे कर्मचाºयांच्या हिताचे असल्याचे कर्मचाºयांना पटले आहे.
पोस्टमन हा टपाल खात्याचा चेहरा समजला जातो, त्यांचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी काय योजना आहेत?
- पोस्टमन व इतर कर्मचाºयांना खात्यांतर्गत सातत्याने विविध प्रशिक्षणे देण्यात येतात. एके काळी हातात पिशवी घेऊन पत्रे वाटणाºया पोस्टमनच्या हातात आता आम्ही मोबाइल व हँड हेल्ड डिव्हाइस दिले असून, याद्वारे पोस्टमनला नवीन युगाशी जोडण्यात आले आहे.
पत्रलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी काय योजना आहेत?
- पत्रलेखनाची जागा आता एसएमएस, ईमेलनी घेतली आहे. त्यामुळे पत्रलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी व तरुणाई, लहान मुलांना पत्र लेखनाचा छंद जोपासता यावा, म्हणून आम्ही ढाई आखर ही पत्रलेखनाची स्पर्धा दोन वर्षांपासून आयोजित करतो. यामध्ये १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील नागरिक सहभागी होऊन पारितोषिक मिळवू शकतात. आजच्या युगात एखाद्याने पत्र पाठविले, तर त्याद्वारे मिळणारा आनंद वेगळा असतो. त्यामुळे पत्रलेखनाची सवय व्हावी, यासाठी असे उपाय योजण्यात येत आहेत. शाळा-महाविद्यालयांना या स्पर्धेमध्ये सहभागी केले जात असून, यामध्ये राज्य व देश पातळीवर विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय टपाल तिकिटांचा संग्रह करण्याची आवड जोपासण्यासाठी स्पर्धा घेतली जात आहे. त्यामध्ये यशस्वी ठरणाºया राज्यातील ४० विजेत्यांना वर्षभरासाठी ६ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. टपाल तिकिटांचा संग्रह करण्यासाठी फिलॅटॅली क्लबचे सदस्यत्व घेण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे. त्याद्वारे टपाल खात्याचे प्रकाशित होणारे प्रत्येक तिकीट घरी पाठविले जाते. ‘माय स्टॅम्प’ अशी एक वेगळी योजना टपाल खात्याने सुरू केली आहे. वैयक्तिक स्तरावर व कॉर्पोरेट स्तरावर ही योजना राबविली जात असून, नागरिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत केवळ मोठ्या व्यक्तिमत्त्वांवर टपाल तिकीट प्रकाशित केले जात होते. मात्र, या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींना आपल्या छायाचित्राचे टपाल तिकीट प्रकाशित करण्याची संधी मिळाली आहे. राज्यात सध्या सिद्धिविनायक मंदिर, गेट वे आॅफ इंडिया व शिर्डी येथील साईबाबा मंदिर असे तीन थीम उपलब्ध आहेत. त्याशिवाय देशात विविध थीम उपलब्ध आहेत.
पोस्टात नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे का?
- दरवर्षी जितके कर्मचारी निवृत्त होतात, त्यांच्या बदल्यात नवीन कर्मचाºयांची भरती केली जाते. सणासुदीच्या काळात टपाल कर्मचाºयांवरील काम वाढते. मात्र, अतिरिक्त काम करून काम पूर्ण केले जाते. वाहतूक पोलिसांचे ई चलान टपालाने पाठविण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे, तसेच, नागपूर, कोल्हापूर व पुणे येथे महापालिकेच्या मालमत्ता कराची देयके टपालाने पाठविण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने टपाल खात्यातर्फे विविध योजना राबविल्या जात असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. टपाल जीवन विमा योजनेत व्यावसायिकांना जोडून त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.