राजीव गांधींप्रतिची कृतज्ञता आता तरी व्यक्त व्हावी

By admin | Published: May 21, 2016 04:41 AM2016-05-21T04:41:22+5:302016-05-21T04:41:22+5:30

अत्यंत क्रूरपणे हत्त्या केली जाणे हा राजीव गांधी यांच्या जीवनातील एक अत्यंत शोकात्म असा दैवदुर्विलासच म्हणायचा.

Now be thankful to Rajiv Gandhi for his gratitude | राजीव गांधींप्रतिची कृतज्ञता आता तरी व्यक्त व्हावी

राजीव गांधींप्रतिची कृतज्ञता आता तरी व्यक्त व्हावी

Next


जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधानपद वयाच्या अवघ्या ४४व्या वर्षी भूषविणे आणि हे पद प्राप्त झाल्यापासून केवळ सात वर्षांच्या आत आणि या पदाचा दुसरा कार्यकाळ भूषविण्यासाठी सिद्ध होत असतानाच अत्यंत क्रूरपणे हत्त्या केली जाणे हा राजीव गांधी यांच्या जीवनातील एक अत्यंत शोकात्म असा दैवदुर्विलासच म्हणायचा. आज त्या दुर्घटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. राजीव गांधी तिसऱ्यांदा मोठा विजय मिळवून पुन्हा पंतप्रधान होतील असे चित्र स्पष्ट दिसत असताना एका होतकरू, उज्ज्वल आणि आशादायी जीवनाची एका घातपाती कृत्यात अत्यंत क्रूर अखेर झाली. कधीच भरून येऊ न शकणाऱ्या हानीला संपूर्ण राष्ट्र त्यावेळी सामोरे गेले. त्या जखमा अजूनही भरून निघालेल्या नाहीत व त्यांचे व्रण आजही डोळ्याना दिसत आहेत.
राजीवजींच्या हत्त्येमुळे सर्वात मोठे व्यक्तिगत नुकसान झाले ते त्यांच्या पत्नी सोनिया आणि मुले राहुल व प्रियंका यांचे. परंतु आपल्या सार्वजनिक जीवनातील नकारात्मकता अशी की, एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनात झालेली हानी एकतर विसरली जाते किंवा विरोधकांकडून तिचा उपहास केला जातो. अर्थात याला समाजात वाढत चाललेली असंवेदनशीलता आणि विशेषत: राजकीय संस्कृती कारणीभूत आहे. आज देश एक जागतिक महासत्ता आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना केवळ अशा नकारात्मकतेपायी दूरदृष्टी असलेल्या नेत्याचे योगदान व त्याचे श्रेय नाकारता येऊ शकत नाही. ‘भारत देश एकविसाव्या शतकात प्रवेश करताना त्याच्याकडे उंच भराऱ्या घेण्यासाठी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हे दोन पंख असतील’, असे उद्गार राजीव गांधी यांनी काढले, तेव्हा विरोधकांनी त्यांचा उपहास केला होता. योगायोगाने उपहास करणारे तेच नेते आज स्वत:च्या क्रांतिकारक कल्पनांचा आधार घेऊन बढाया मारीत असले तरी मनातल्या मनात त्यांनाही हे ठाऊक आहे की त्यांच्या कल्पनांचे बीज राजीव गांधींनीच रोवले होते. राजीव गांधींच्या स्वप्नातील कल्पना आज मूर्त रूपात दिसत असून, तेच त्यांच्यातील प्रतिभेचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे. याचे साधे कारण म्हणजे मुळात त्या कल्पनाच अंगभूत गुणवत्तेच्या व साकारक्षम होत्या.
अर्थात त्यांचे योगदान केवळ संगणक आणि माहिती तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाही. त्यांनी दूरसंचार क्षेत्रातही मोठे योगदान दिले. आज देशात कोट्यवधी लोक त्याचा लाभ घेत असून, त्याचा प्रारंभ राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या काळातच झाला. जागतिक मुक्त अर्थव्यवस्थेची सुरुवातदेखील त्यांच्याच कार्यकाळात झाली. त्यांनी केलेल्या सर्व कामांचे पुरावे आज उपलब्ध आहेत. १९९१ च्या निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले असतानाही ते अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांचे धोरण निश्चित करण्यात मग्न होते. यापुढे जागतिक शक्तीला आर्थिक प्रबळतेवर अवलंबून राहावे लागेल आणि लष्करी शक्तींना त्यांचे अनुकरण करावे लागेल, असे स्पष्टपणे सांगणारे ते पहिले भारतीय नेते होते.
आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर अन्य क्षेत्रांमध्येही त्यांचे दीर्घकालीन योगदान आहे. देशातील लोकशाही प्रक्रिया थेट ग्राम पातळीपर्यंत नेण्यासाठी त्यांनी दोन महत्त्वाची पावले उचलली होती व त्यातून आपल्या राजकीय व्यवस्थेचे मूलभूत चित्रच बदलून गेले. यातील पहिले पाऊल म्हणजे मतदानाच्या हक्काची किमान वयोमर्यादा २१वरून १८वर आणणे. यासाठीही त्यांच्यावर टीका झाली. अप्रगल्भ लोकाना मतदानाचा हक्क दिला असा या टीकेचा रोख होता. काहींनी तर असेही भाकीत केले की तरुण मतदारांमुळे दर पाच वर्षांनी देशात राजकीय अस्थिरता निर्माण होईल. पण राजीव गांधींचा युवा शक्तीवर प्रचंड विश्वास होता. त्यांचे दुसरे पाऊल होते त्रिस्तरीय पंचायतराज. यामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. त्यांचे हे पाऊल लैंगिक समानतेच्या आणि समाजातील अल्प सुविधाधारक घटकांच्या सबलीकरणाच्या दिशेने अत्यंत प्रगतिशील असे होते. परिणामी इथले राजकीय चित्रच पार बदलून गेले. आपण राजीव गांधींची आठवण बोफोर्स तोफांच्या उल्लेखाशिवाय करू शकत नाही. याबाबत असा एक प्रचार केला जात होता की राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळातच हा संरक्षण व्यवहार पूर्ण झाला होता. पण त्यांच्या विरोधकांना तसे सिद्ध करण्यात अपयश आले आणि ते राजीव गांधींच्या परत सत्तेवर येण्याची वाट रोखू शकले नाहीत. अर्थात यात आपण हेही विसरायला नको की १९९९च्या कारगील युद्धात याच बोफोर्स तोफांनी आपल्या सैन्याला मोठी मदत केली होती. या सर्व घटनाक्रमातून आपण संरक्षण सिद्धतेविषयक अनेक धडे शिकू शकतो. पण चुका उगाळण्याच्या आपल्या सवयीमुळे आपण पुन्हा अगुस्ता/ वेस्टलँड प्रकरण उकरून काढले आहे. पुरावा नसताना बदनामी करणे ही नेहमीच कॉँग्रेस-विरोधकांची व्यूव्हरचना राहिली आहे. जे बोफोर्सच्या काळात झाले तेच आजही होत आहे.
शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध जोपासण्याच्या संदर्भात राजीव गांधींनी पाकिस्तान आणि चीनला भेट दिली होती. या भेटीचा चांगला आणि दीर्घकाळ परिणाम झाला होता. १९६२च्या युद्धानंतर चीनला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांनी चीनशी केलेल्या चर्चेमुळे सीमेवर शांतता राखण्यासाठीच्या धोरणांचे बीज रोवण्यात आले होते. आज त्यांच्या मृत्यूच्या २५ वर्षांनंतर, त्यांना खरी श्रद्धांजली म्हणून त्यांच्या महान योगदानाचे सर्व क्षुल्लक भेद बाजूला ठेवून स्मरण करू या. त्यांच्या योगदानामुळेच २१व्या शतकातील आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य भारताकडे आले आहे. त्यांच्या गैरहजेरीत गेल्या २५ वर्षात आपण काय गमावले याचा अंदाज आपण कधीच बांधू शकत नाही. पण कमीतकमी आपण त्यांच्यावरचे आणि त्यांच्या प्रतिष्ठेवरचे अभद्र हल्ले तरी नक्कीच थांबवू शकतो आणि त्यांना अंत:करणापासून त्यांच्या कार्याचे श्रेय त्यांना देऊ शकतो.
>माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे आज २५वे पुण्यस्मरण
त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वास व पुण्यस्मृतीस केलेले अभिवादन
-विजय दर्डा
लोकमत पत्र समूहाचे चेअरमन

Web Title: Now be thankful to Rajiv Gandhi for his gratitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.