आता नुसता बंगाल!
By admin | Published: August 30, 2016 05:08 AM2016-08-30T05:08:04+5:302016-08-30T05:08:04+5:30
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्य विधानसभेत अखेर आपल्या राज्याचा नामबदल घडवून आणला असल्याने यापुढील काळात
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्य विधानसभेत अखेर आपल्या राज्याचा नामबदल घडवून आणला असल्याने यापुढील काळात त्यांचे राज्य बंगाली भाषेत बांगला, इंग्रजीत बेंगॉल आणि हिन्दी भाषेत बंगाल म्हणून ओळखले जाईल. अर्थात नामबदलाचा हा ठराव राज्याने संमत केला असला तरी केन्द्राची त्याला मान्यता मिळावी लागेल, पण त्याबाबतीत काही अडचण येण्याचे कारण नाही. फाळणीपूर्व भारतात एकच बंगाल राज्य होते. फाळणीमुळे या राज्याचा पूर्वेकडील भाग पाकिस्तानात गेला आणि पश्चिमेकडील भाग भारतात राहिला. त्यामुळे तिकडचा तो पूर्व बंगाल आणि इकडचा तो पश्चिम बंगाल असे नामकरण केले गेले. पण इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पूर्व बंगालमधील स्वातंत्र्य चळवळीला भारताचे सक्रीय सहकार्य लाभून पूर्व बंगाल पाकिस्तानातून स्वतंत्र झाला व लगेचच त्याचे बांगला देश असे नामकरणही केले गेले. मुळात भारतातील बंगालचे पाकिस्तानातील बंगालशी नाते सांगणारा पश्मिच बंगाल हा उल्लेख असयुक्तिकच होता आणि तिकडचा पूर्व बंगाल आपले नाव बदलून बसल्यानंतर तर पश्चिम बंगाल असा उल्लेख चक्क अतार्किक ठरु लागला. पण ही विसंगती दूर व्हावी म्हणून ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्याच्या नामातील पश्चिम या दिशादर्शक उल्लेखावर काट मारण्याचा तार्किक निर्णय घेतला असे कोणाला वाटत असेल वा वाटणार असेल तर फसगत होण्याची शक्यता आहे. कारण वेगळेच आहे. मध्यंतरी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांची एक बैठक पाचारण केली होती. बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांना बोलण्याची आणि त्यांच्या राज्यांच्या समस्या मांडण्याची मुभा होती. त्यासाठी निश्चित केलेला क्रम इंग्रजी मूळाक्षरांवर आधारित होता. पश्चिम म्हणजे इंग्रजीतील ‘डब्ल्यु’चा नंबर येता येता बराच विलंब झाला. परिणामी आधीचे मुख्यमंत्री जरी मन:पूत बोलले असले तरी नंतरच्या मुख्यमंत्र्यांवर वेळेचे बंधन घातले गेले. त्यात ममताबाईदेखील आल्या. तिथेच त्यांनी नामबदलाचा निर्णय घेतला आणि आता तोे पुरादेखील करुन टाकला.