आता बोलणे दुरावले कायमचे, पण स्वर असतीलच तार्इंचे...
By admin | Published: April 5, 2017 05:21 AM2017-04-05T05:21:10+5:302017-04-05T05:21:10+5:30
प्रतिभावंत गायिका असलेल्या किशोरीतार्इंशी माझे कौटुंबिक ऋणानुबंध होते, माझी मोठी बहीणच होती ती
प्रतिभावंत गायिका असलेल्या किशोरीतार्इंशी माझे कौटुंबिक ऋणानुबंध होते, माझी मोठी बहीणच होती ती! आता तिचे
नसणे सहन करणे आले. या काहिलीत दिलासा एवढाच की, त्यांचे स्वर असतील सोबतीला... त्या केवळ गायिकाच नव्हत्या. संगीताविषयीच्या चिंतनातून नव्या पिढीसमोर वस्तुपाठ घालून देणाऱ्या ‘विचारवंत’ होत्या त्या! संगीतात भावपूर्ण गायकी खूप महत्त्वाची असते, त्याचा संपूर्ण अभ्यास त्यांच्या गायकीत पाहायला मिळतो.
आवाजाला तयार कसे करावे, लगाव कसा वाढवावा, स्वर कसा लावावा, असे गायकीशी संबंधित अभ्यासपूर्ण चिंतन, त्याला विचारांची असलेली जोड, अशा मांडणीतून गायनाचे सादरीकरण करणारे गायक फार दुर्मीळ. त्यातल्या एक किशोरीताई. त्या जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका, पण घराण्यांमधल्या भिंती त्यांना अडवून धरू शकल्या नाहीत. आमच्या डागर घराण्याविषयी त्यांच्या मनात नितांत प्रेम होते. माझी सत्तरी झाली, तेव्हा मुंबईतल्या सत्कार सोहळ्याला त्या आवर्जून आल्या. ‘भाई’ म्हणून खूप आशीर्वाद दिले त्यांनी. सारख्या भेटी होत. बोलणे होई... आता तो योग नाही. पण तरी ‘भेटतीलच’ त्या. भेटत राहातील...
- सईदुद्दीन डागर , ज्येष्ठ धृपद गायक
दैवी देणगी
किशोरीताई गेल्या, यावर विश्वास बसत नाही. गेल्या आठवड्यात त्यांनी दिल्लीला कार्यक्रम केला होता. मी त्यांना फोन केला होता, त्या वेळी १४ आॅक्टोबरला त्यांनी कार्यक्रम करण्यासाठी मला होकार दिला होता आणि आज ही बातमी आली. त्यामुळे किशोरीताई गेल्या, यावर विश्वास तरी कसा ठेवणार, आकस्मिक घटना आहे. १९५७ साली किशोरीतार्इंना जोधपूर येथे मी पहिल्यांदा भेटलो. त्या वेळी रेडिओचा एक कार्यक्रम होता. त्यानंतर, आमचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. आम्ही अनेक कार्यक्रमांत भेटायचो. त्या म्हणजे देवाची देणगी होत्या. असे कलाकार खूप कमी जन्माला येतात. त्या नेहमी स्वत:च्या अटींवर जगल्या. कधीही त्यांनी तडजोड केली नाही. किशोरीताई जयपूर घराण्याच्या गायिका होत्या, पण त्यांचा विचार वेगळा होता. त्यांनी स्वत:चा एक वेगळा मार्ग निवडला असल्याने त्या तशा जगल्या. हेच विचार त्यांच्या आयुष्याचे तत्वज्ञान होते. पुढच्या पिढीला त्यांच्यासारखी गायिकी ऐकायला मिळणार नाही.
- पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ संतूरवादक