आता अपेक्षा ‘रामायण सर्किट’च्या विकासाची!

By किरण अग्रवाल | Published: August 6, 2020 07:31 AM2020-08-06T07:31:46+5:302020-08-06T13:28:44+5:30

भारतातीलच नव्हे तर जगभरातील भाविकांसाठी प्रभू श्रीराम हे श्रद्धेचे व आस्थेचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत त्यांचे भव्य मंदिर असावे असे तमाम भाविकांचे स्वप्न राहिले आहे

Now expect the development of 'Ramayana Circuit'! | आता अपेक्षा ‘रामायण सर्किट’च्या विकासाची!

आता अपेक्षा ‘रामायण सर्किट’च्या विकासाची!

googlenewsNext

किरण अग्रवाल

अयोध्येत पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या राममंदिर निर्माणाच्या भूमिपूजनामुळे कोट्यवधी रामभक्तांनी गेल्या अनेक वर्षांपासून मनात बाळगलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने वाटचालीस प्रारंभ झाला आहे. लवकरच निर्धारित कालावधीत मंदिर साकारलेले बघण्याची आस बळावून गेली आहेच; पण ते होताना खुद्द मोदी यांनीच यावेळी उल्लेखिलेल्या देशातील ‘रामायण सर्किट’च्या विकासाबाबतही अपेक्षा उंचावून जाणे स्वाभाविक ठरले आहे.

भारतातीलच नव्हे तर जगभरातील भाविकांसाठी प्रभू श्रीराम हे श्रद्धेचे व आस्थेचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत त्यांचे भव्य मंदिर असावे असे तमाम भाविकांचे स्वप्न राहिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडल्याने या स्वप्नाची पूर्तता होतानाचा अनुभव समस्त रामभक्त घेत आहेत. या सोहळ्यासाठी शरयू तटावरील अयोध्या नगरी तर सजलेली दिसलीच; परंतु त्याचसोबत देशभरातही जे उत्सवाचे व उत्साहाचे वातावरण दिसले त्यातून जना-जनांच्या मनामनात वसलेल्या रामाचा प्रत्यय यावा. विशेष म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्श लाभलेली देशभरातील जी काही ठिकाणे आहेत तेथील रामभक्तांचा आनंदही अवर्णनीय असा राहिला. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास प्रभू श्रीरामांनी त्यांच्या वनवासाचा काळ जेथे व्यतीत केला त्या नाशिक पंचवटीसह नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्येही त्यांचा पदस्पर्श लाभल्याचे उल्लेख आढळतात, त्यामुळे या ठिकाणांवरही राममंदिर भूमिपूजनाचा अपूर्व आनंद व्यक्त झालेला दिसला. कोरोनाचे संकट लक्षात घेता या आनंदाला मर्यादा आलेल्या असतानाही तो ओसंडून वाहिला. अनेक ठिकाणी गुढ्या उभारल्या गेल्या तर मंदिरांमध्ये पूजा-अर्चनेसह घंटानाद व शंखध्वनी केले गेले. राज्यातील सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण असलेल्या नाशकात प्रख्यात रामकुंडावर यानिमित्त आरती करून कोरोनाच्या संकटापासून लवकर सुटका व्हावी यासाठी प्रार्थना केली गेली.



महत्त्वाचे म्हणजे अयोध्येतील भूमिपूजनाचा सोहळा समस्त भाविक दूर चित्रवाहिन्यांच्या माध्यमातून तन्मयतेने ऐकत होते व डोळ्यात साठवत होते. त्यामुळे भूमिपूजनानंतर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या मंदिर निर्माण बरोबरच देशातील प्रस्तावित रामायण सर्किटच्या विकासाचा मुद्दा उल्लेखिताच संबंधित ठिकाणच्या भाविकांच्या अपेक्षा उंचावून गेल्या. प्रभू श्रीरामांनी देशभरात जेथे-जेथे भेटी दिल्या ती ठिकाणे विकसित करून त्याचे पर्यटकीय महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने रामायण सर्किटची योजना आखण्यात आली आहे. अयोध्येत उभ्या राहणाऱ्या मंदिरामुळे यापुढील काळातील तेथील अर्थकारणाला चालना मिळून जाईल, असे मोदी यांनी सांगितले, त्यानुसारच रामायण सर्किटमधील स्थानकांचा विकास केला गेल्यास त्या त्या परिसरातील अर्थकारणालाही गती मिळेल, म्हणूनच आता राममंदिर भूमिपूजनानंतर रामायण सर्किटच्या विकासाची अपेक्षा केली जात आहे.



श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थान न्यासच्या यादीत प्रभू श्रीरामांनी भारत भूमीत २९० ठिकाणी भेटी दिल्याचा उल्लेख आहे. या यादीचा विचार करता यात महाराष्ट्रातील ४५ स्थानांचा उल्लेख आहे. विशेषकरून श्रीरामांनी जेथे वनवासाचा अधिक काळ व्यतीत केला व जेथून सीताहरण झाले तसेच शूर्पणखेचे लक्ष्मणाकडून नाक कापले गेल्याचे दाखले पुराणात आढळतात त्या नाशिकमध्ये यासंबंधीच्या खुणा आजही जपल्या गेल्या आहेत. सिंहस्थाचे स्नान होणारे प्रख्यात रामकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा, तपोवन, रामशेज किल्ला, सीता सरोवर, जटायू कथा जेथे घडून आली ते सर्वतीर्थ टाकेद आदी ठिकाणांचा यात उल्लेख करता येणारा आहे. त्यामुळे रामायण सर्किट अंतर्गत नाशिकमधील या खुणांच्या विकासाची आस आहे. मध्यंतरी या दृष्टीने नाशिक व नागपूरच्या विकासासाठी एका सल्लागार समितीकडून आराखडा बनविला गेला होता व त्या आधारे केंद्र सरकारकडे सुमारे शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यटन विभागाकडे वारंवार पाठपुरावाही चालविला आहे, तेव्हा खुद्द पंतप्रधानांनीच आता रामायण सर्किटचा उल्लेख केल्याने रामाचा पदस्पर्श लाभलेल्या सर्वच ठिकाणांच्या विकासाला चालना लाभायला हवी. केंद्रात प्रतिनिधित्व करणा-या लोकप्रतिनिधींनी आता यासंदर्भात अधिक सक्रिय होत तगादा लावण्याची गरज आहे. 

Web Title: Now expect the development of 'Ramayana Circuit'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.