आता ही मोदींचीच परीक्षा

By admin | Published: June 8, 2016 04:08 AM2016-06-08T04:08:33+5:302016-06-08T04:08:33+5:30

स्वामी हे नुसते बोलभांड वा आकांडतांडव करणारे इसम नाहीत तर त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत

Now it is Modi's exam | आता ही मोदींचीच परीक्षा

आता ही मोदींचीच परीक्षा

Next


सुब्रह्मण्यम स्वामी हे नुसते बोलभांड वा आकांडतांडव करणारे इसम नाहीत तर त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत व त्या पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेले ते बालिश गृहस्थ आहेत. (त्यांना पुढारी वगैरे न म्हणण्याचे कारण त्यांना कोणी अनुयायी नाहीत हे आहे) त्यांचा देशाच्या अर्थमंत्रिपदावर डोळा आहे आणि आताचे अर्थमंत्री अरुण जेटली हे त्यांच्या डोळ््यात सलणारे (पुन्हा) गृहस्थ आहेत. परंतु जेटली हे मोदींच्या अतिशय निकटचे मानले जात असल्यामुळे स्वामींनी सध्या रघुराम राजन या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना आपल्या विषारी टीकेचे लक्ष्य बनविले आहे. जेटलींच्या अर्थ मंत्रालयाच्या नियंत्रणात रिझर्व्ह बँक नाही असे दाखवून त्या दोघांनाही दुबळे ठरविण्याची स्वामींची ही खेळी आहे. ‘राजन यांचे मन पुरेसे भारतीय नाही. त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावर कठोर निर्बंध लादून औद्योगिक विकास रोखून धरला आहे, इ..इ..’ अशी टीका तर त्यांनी केलीच पण प्रत्यक्ष पंतप्रधानांना पत्र पाठवून (व ते वृत्तपत्रांच्या हाती देऊन) त्यात राजन यांना तत्काळ हाकला अशी मागणी केली आहे. काँग्रेसला अडचणीत आणायला उपयोगी ठरेल म्हणून भाजपाने राज्यसभेत आणलेल्या स्वामींनी त्यांच्या या उद्योगामुळे जेटली आणि भाजपासमोरच आता प्रश्नचिन्ह उभे केले आहे. स्वामी हे एकेकाळी वाजपेयींना त्यांच्या सवयींखातर नावे ठेवीत. त्यांच्या माऱ्यातून अडवाणीही सुटले नाहीत. संघालाही त्यांनी ‘बोलघेवड्या निष्क्रिय माणसांची संघटना’ म्हटले आहे. त्यांच्या अशा वाग्बाणांच्या माऱ्याचे क्षेत्र आणखीही मोठे आहे. राजीव गांधींचा स्फोटक मृत्यू लिट्टेशी संबंध ठेवून सोनिया गांधींनीच घडवून आणला असा शोध लावण्यापर्यंत त्यांच्या बालिशपणाची मजल गेली आहे. मात्र एकेकाळी अतिविद्वान म्हणून डोक्यावर घेतलेल्या या इसमाला संघ खाली ठेवू शकत नाही आणि मोकळे ठेवल्यास तो आपल्यालाही जाचक होईल या भयाने भाजपाही त्याला बाहेर ठेवत नाही. अशा उच्छृंखल माणसाच्या माऱ्याला तसेच उत्तर द्यायला माध्यमे धजावत नाहीत, पक्ष पुढे येत नाहीत आणि विरोधकांना त्याच्या उंडारण्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. या स्थितीत देशाच्या उद्योग क्षेत्रातील ५० मातब्बरांनी एकत्र येऊन रघुराम राजन यांची केलेली पाठराखण जेवढी महत्त्वाची तेवढीच या मातब्बरांच्या हिंमतीला दाद द्यावी अशी आहे. उद्योग व उदिमाच्या क्षेत्रातील माणसे सहसा सरकारशी वाद घालत नाहीत. पण रघुराम राजन यांच्या धोरणांमुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात आलेले स्थैर्य व विकासाच्या वाढीला मिळालेला वेग ठाऊक असणाऱ्या या उद्यमी लोकांएवढेच राजकारण व अर्थकारणाचा तटस्थ अभ्यास करणारे लोकही स्वामींच्या या पोरखेळाला वैतागले आहेत. राजन यांचा कार्यकाळ सप्टेंबरच्या आरंभी संपत आहे. त्यांना दुसरा कार्यकाळ दिला जावा असे उद्योगक्षेत्रातील श्रेष्ठींएवढेच अभ्यासकांचेही म्हणणे आहे. स्वामींना मात्र त्यांची हकालपट्टी हवी आहे. पंतप्रधान गप्प आहेत, जेटलींना राजन हवे आहेत, भाजपा स्वस्थ आहे आणि भाजपावर नियंत्रण ठेवणारा संघही त्याविषयी काही बोलत नाही. स्वत: राजन दुसऱ्या कार्यकाळाबाबत फारसे उत्सुक नाहीत. ते जागतिक पातळीवर मान्यता पावलेले अर्थतज्ज्ञ आहेत आणि इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. स्वत: राजन मात्र एखाद्या चांगल्या विद्यापीठात भारतीय अर्थशास्त्राचे आणखी सूक्ष्म अध्ययन करण्यासाठी उत्सुक आहेत. देशातील तरुणाईला राजन हवे आहेत. उद्योग क्षेत्राएवढाच कामगार जगतालाही त्यांना दुसरा कार्यकाळ मिळण्यात रस आहे. भाजपाशी त्यांचे भांडण नाही. (त्यांची नियुक्ती डॉ. मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत झाली एवढाच काय तो त्यांना वाटू शकणारा त्यांच्याविषयीचा दुरावा आहे) प्रश्न, विद्वत्ता आणि अध्ययन यातून करावयाचा विकास की राजकारणासाठी विद्वत्ता व अध्ययनाएवढाच विकासाचा बळी हा आहे. यातला पहिला प्रश्न राजन यांचा आणि दुसरा स्वामींबाबतचा आहे. या प्रश्नाचे उत्तर सरकारला पास वा नापास करणारे आहे. राजन यांना जावे लागले तर देशातील विदेशी गुंतवणूक थांबेल असे जगभरच्या अर्थतज्ज्ञांचे मत आहे. ही मते सरकारपर्यंत पोहोचलिही आहेत. दुसरीकडे वाजपेयींपासून सोनिया गांधींपर्यंतच्या साऱ्यांवर तोंडास्त्र सोडणाऱ्या स्वामींना राजन यांच्या जाण्याने देशात अर्थाचा सुकाळ होईल असे वाटत आहे. प्रश्न राजकारणासाठी अर्थकारणाचा बळी द्यायचा की देशाचे अर्थकारण बळकट व्हावे म्हणून पक्षांतर्गत राजकारणाला आळा घालायचा हा आहे. त्यातून राजन यांनी आता अर्थक्षेत्राएवढीच देशाच्या जनमानसातही मोठी मान्यता मिळविली आहे. अशी कोणतीही मान्यता स्वामींजवळ नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याने देशाचे वा भाजपाचे कोणतेही नुकसान नाही. तात्पर्य, स्वामींनी मोदींना परीक्षेला बसविले आहे आणि देशाला व जगाला तिच्या निकालाची वाट आहे.

Web Title: Now it is Modi's exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.