आता अधिक धोका
By admin | Published: October 1, 2016 02:11 AM2016-10-01T02:11:33+5:302016-10-01T02:11:33+5:30
दहशतवाद्यांचा खात्मा केल्यावर आणि भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सेनेने त्यांना उपलब्ध करुन दिलेले तळ भारतीय सेनेने उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची कबुली देणे
दहशतवाद्यांचा खात्मा केल्यावर आणि भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सेनेने त्यांना उपलब्ध करुन दिलेले तळ भारतीय सेनेने उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची कबुली देणे म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्वत:च स्वत:ला नागवे करुन घेण्यासारखे असल्याने प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही, नियंत्रण रेषेनजीक थोडी चकमक झाली व तसे नेहमीच होत असते, असे पाकी सरकार व या सरकारचे बोलके पोपट असणाऱ्या माध्यमांनी म्हणत राहाणे ही त्यांची मजबुरी आहे. भारतीय सेनेने जो पराक्रम गाजविला तो एकीकडे अमान्य करायचा आणि दुसरीकडे पाकी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवायचे, युनोकडे गाऱ्हाणे मांडायचे, सीमेनजीकच्या प्रांतात अतिदक्षतेचा इशारा द्यायचा या साऱ्या घटना लक्षात घेता पाकिस्तानला सत्य लपविणे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे खोटे बोलणेही किती अवघड होत चालले आहे याची प्रचिती येते. बुधवारी रात्री भारतीय सेनेने पाक बळकावून बसलेल्या काश्मीर प्रांतात तीन किलोमीटर आत घुसून जी कारवाई केली, त्यानंतर आता अशा प्रकारची कोणतीही कारवाई नजीकच्या काळात करण्याचा भारताचा इरादा नसल्याचे लष्कराने अधिकृतरीत्या जाहीर केले असले तरी पिसाळलेला पाक गप्प बसेल असे नाही. याचा अर्थ भारताला अधिकच सावधान राहावे लागेल. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि तेथील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी दिलेला इशारा लक्षणीय ठरतो. याच आठवड्यात पाकी संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी भारताविरुद्ध त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करण्याचा जो इशारा दिला त्याला अनुलक्षून हिलरी यांनी चिंता व्यक्त करातानाच अशी भीती व्यक्त केली आहे की, पाकिस्तान अणुबॉम्बचा थेट मारा करण्याऐवजी आत्मघातकी अणुबॉम्ब वाहकांचा वापर करु शकतो. तसेही पाकिस्तानने अतिभयानक संहार क्षमता असलेले अणुबॉम्ब तयार करण्याचा सपाटाच लावला आहे. अशा परिस्थितीत त्या देशात लष्करी वा जिहादी उठाव होऊ शकतो अशीही भीती हिलरी यांना वाटते आहे. तसे झाले आणि जिहादींच्या हाती अणुबॉम्ब लागले तर फार मोठा विनाश घडून येऊ शकतो. अर्थात अमोरिकेने ख्वाजा यांच्या वक्तव्याची अत्यंत गंभीर दखल अगोदरच घेतली आहे. अमेरिकेचेच संरक्षण मंत्री अॅश्टन कार्टर यांनी अलीकडेच अणुशक्तीच्या संदर्भात भारत अत्यंत जबाबदार राष्ट्र आहे पण त्याचवेळी पाकिस्तानातील अणुबॉम्ब त्या देशातील कायमस्वरुपी संघर्षमय वातावरणात अडकून पडल्याचे म्हटले होते. त्यांनीच शुक्रवारी आणखी एक वक्तव्य करुन संरक्षणाच्या क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा सर्वात जवळचा सहकारी असल्याचेही म्हटले आहे. अर्थात हे सर्व कितीही खरे असले तरी या सर्व घटना सभ्य जगातल्या आहेत आणि सभ्यतेचे व पाकिस्तानचे दूरवरचेही नाते नाही. त्यामुळे भारतातील धोका अधिकत वाढला आहे आणि म्हणूनच अधिक दक्ष राहाण्याची गरजही वाढली आहे. पण त्यातील अत्यंत समाधानाची बाब म्हणजे जेव्हां देश आणि देशाच्या सार्वभौमत्वास कुणी आव्हान दिले तर मग आम्ही आपासतील राजकीय मतभेद बाजूला सारुन सरकारच्या पूर्ण पाठीशी राहू असे जे देशातील विरोधी पक्षांकडून वारंवार सांगितले जात होते, त्याची प्रचिती घुरुवारच्या दिवसभराच्या घटनाक्रमाने आणून दिली आहे. व ते निश्चितच स्वागतार्ह आहे.