आता पेंग्विन मुंबईकर झाले...
By admin | Published: April 2, 2017 01:12 AM2017-04-02T01:12:37+5:302017-04-02T01:12:37+5:30
‘याची देही याची डोळा’ पेंग्विन प्रत्यक्षात पाहिल्यानंतर पर्यटकांसह मुंबईकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याचे कारण आजपर्यंत पुस्तकांसह वाहिन्यांवर पेंग्विन पाहणाऱ्यांना चक्क
- सचिन लुंगसे
‘याची देही याची डोळा’ पेंग्विन प्रत्यक्षात पाहिल्यानंतर पर्यटकांसह मुंबईकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याचे कारण आजपर्यंत पुस्तकांसह वाहिन्यांवर पेंग्विन पाहणाऱ्यांना चक्क भायखळा येथील राणीच्या बागेत पेंग्विन पाहता आले. पेंग्विनला राणीच्या बागेत आणण्यासाठी प्रशासनाला थोडीथोडकी नाही तर तब्बल दहा वर्षे अथक प्रयत्न करावे लागले. त्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा ‘बालहट्ट’ पुरवायचा म्हटल्यावर तर प्रशासनाची दमछाक झाली. महत्त्वाचे म्हणजे ‘करून दाखविले’ या ‘उक्ती’नुसार शिवसेनेने आपली ही योजना यशस्वी झाल्याचा दावा केला. नुसता दावा नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आता पेंग्विन मुंबईकर झाले...’ असे म्हणत विरोधकांचे तोंड बंद केले. या सगळ्यात झालेले राजकारण वगळले तर एक मात्र चांगले झाले ते म्हणजे आता पर्यटकांसह मुंबईकरांना पेंग्विन दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेता येणार आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (भायखळा) येथील हम्बोल्ट पेंग्विन कक्ष, अंतर्गत बगीचे व प्रवेश प्लाझाचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली १७ मार्च रोजी करण्यात आले. हम्बोल्ट पेंग्विन मुंबईत आणणे, हे एक आव्हान होते. अनेक राष्ट्रीय व तांत्रिक संस्थांचा परवाना मिळविण्यात काही अवधी लागला. परदेशात प्राणिसंग्रहालये ही आकर्षक स्वरूपाची असतात. याच धर्तीवर मुंबईत अशा स्वरूपाचे प्राणिसंग्रहालय असावे, अशी शिवसेनेची इच्छा होती, ती यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. आणि याच निमित्ताने का होईना मुंबईतील राणीच्या बागेला यामुळे आणखी वैभव प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे पेंग्विन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मुंबईकरांनी पेंग्विन दर्शनाला तुफान प्रतिसाद दिला. शनिवारसह रविवारी पेंग्विन दर्शनासाठी झालेल्या गर्दीने राणीच्या बागेतील गेल्या तीस वर्षांचा रेकॉर्ड मोडला. दोन लाखांवर पोहोचलेल्या या ‘दर्दी’ गर्दीने पेंग्विनला अक्षरश: मन भरून पाहिले. या गर्दीमुळे प्रशासनाला अखेर मुख्य प्रवेशद्वार बंद करावे लागले आणि पेंग्विन दर्शनासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतच प्रवेश दिला जाईल, अशी सूचनाही प्रशासनाला द्यावी लागली. याचा अर्थ एवढाच की, राणीच्या बागेत पर्यटकांना यायचे आहे. पक्ष्यांसह प्राण्यांना बघायचे आहे. वन्यप्राणी दर्शनाचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. मात्र यासाठी कमी पडते ते आपले प्रशासन.
मागील कित्येक वर्षांत महापालिका प्रशासनाने राणीच्या बागेची काळजी घेतलेली नाही. बागेत आता जे काही वन्यजीव आहेत; त्यांची काळजी घेण्याबाबतही प्रशासन अपुरे पडते आहे. बागेतील सेवा-सुविधांबाबत मुंबईतील प्राणिमित्रांनी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे कित्येक तक्रारी केल्या आहेत. जर आहे त्या प्राणी आणि पक्ष्यांची प्रशासन काळजी घेत नसेल तर पेंग्विनची काळजी प्रशासन कशी घेणार, असा सवाल प्राणिमित्र संघटनांनी सातत्याने केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राणीच्या बागेत आणण्यात आलेल्या एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर प्राणिमित्रांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.
प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांना पेंग्विन दर्शन द्यायचेच, असा चंग बांधलेल्या प्रशासनासह शिवसेनेने आपला प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे. मात्र ३१ मार्चपर्यंत मोफत पेंग्विन दर्शन केल्यानंतर आता पर्यटकांना पेंग्विन दर्शनासाठी १०० रुपये अदा करावे लागणार आहेत. शुल्क आकारण्यात आल्यानंतर ‘दर्दी’ गर्दी कोणत्या गर्दीचा विक्रम मोडीत काढते, याकडेही विरोधकांचे लक्ष असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पेंग्विन दर्शनासाठी शुल्क आकारण्यात येऊ नये म्हणून सत्ताधारी आग्रही असले तरीदेखील विरोधी पक्षनेता नसलेल्या महापालिकेत या प्रकरणाला विरोध कोण करणार, हे पाहणेही यानिमित्ताने तेवढेच औचित्याचे ठरणार आहे.
दर्शन लांबणीवर पडले
लोकायुक्त आणि प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने घेतलेल्या आक्षेपामुळे पेंग्विन दर्शन लांबणीवर पडले. पेंग्विनसाठी विशेष व्यवस्था करण्यातही महापालिकेकडून दिरंगाई झाली. याचदरम्यान उद्घाटनाची तारीख तीन वेळा पुढे ढकलण्यात आली.
आकर्षक पक्षीगृह
पक्षीगृहाचे क्षेत्रफळ १८०० चौरस फूट इतके असून सुमारे २ एकर क्षेत्रामध्ये इंटरप्रिटेशन सेंटरमधील तळमजल्यावर जीवशास्त्रीय, फिजिआॅलॉजिकल तसेच वर्तणूक इत्यादी गरजा लक्षात घेऊन पक्षीगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. पक्षीगृहामध्ये होल्डिंग एरिया, क्वारंटाईन एरिया, स्वयंपाकघर, जीवनशैलीसाठी विशिष्ट रचना, ए.एच.यू. कक्ष तसेच खडकाळ जागा आकर्षकरीत्या तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये ३ नर व ४ मादी असे एकूण ७ हम्बोल्ट पेंग्विन पक्षी प्रदर्शित करण्यात आले आहेत.
उद्घाटनाचा प्रयत्न तीन वेळा फसला
पेंग्विनच्या देखभालीसाठी नेमलेली कंपनी बोगस, लोकायुक्तांची नोटीस, केंद्रीय प्राणिसंग्रहालयाकडून परवाना रद्द करण्याचा इशारा, पेंग्विनसाठी काचघर बांधण्यास विलंब अशा अनेक घडामोडींमुळे महापालिका निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न तीन वेळा फसला होता.
आता ‘बर्ड’ पार्क
सिंगापूरच्या बर्ड पार्क धर्तीवर विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे संग्रहालय मुंबईत असावे आणि यासाठी प्रयत्न करावेत. आणि ही संकल्पना महापालिकाच साकारू शकते, असा आशावाद उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन सोहळ्यादरम्यान व्यक्त केला. त्यामुळे पेंग्विननंतर आता मुंबईकरांना पक्ष्यांचे संग्रहालय पाहता येईल, असे यानिमित्ताने म्हटले तर वावगे ठरणार नाही, एवढे नक्की.
बागांचे सुशोभीकरण
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेश प्लाझा विकसित करण्यात आला असून यामध्ये अद्ययावत तिकीटगृह, साहित्य कक्ष, कृत्रिम धबधबा, प्राण्यांच्या प्रतिकृती, सिंह व सिंहिणीचे पुतळे यांची मांडणी करण्यात आली आहे. एकूण बागांचे सुशोभीकरण करण्यात आले असून अंतर्गत रस्ते/पदपथांवर पुरातन वास्तू परिसराला साजेशा एल. ई. डी. विद्युत दिव्यांच्या खांबांची उभारणी करण्यात आली आहे.
अडथळ्यांची शर्यत
एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर अडचणी वाढल्या. पेंग्विनच्या मृत्यूची चौकशी, लोकायुक्तांकडे सुनावणी, केंद्रीय प्राणिसंग्रहालयातून परवाना रद्द करण्याची राणीबागेला आलेली नोटीस अशा घडामोडींमुळे हा प्रकल्पच धोक्यात आला. त्यात पेंग्विनची देखभाल व राणीबागेत तशी सेवा निर्माण करण्यासाठी नेमलेली कंपनीच बोगस असल्याचे उजेडात आल्याने खळबळ उडाली.