...आता उमेदवार शोधण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 04:36 PM2019-05-25T16:36:31+5:302019-05-25T16:37:16+5:30
मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविकपणे विधानसभा निवडणुकीची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेने २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याने ...
मिलिंद कुलकर्णी
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविकपणे विधानसभा निवडणुकीची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेने २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याने त्यांची स्थिती भक्कम आहे. मोदी लाटेचा लाभ विधानसभा निवडणुकीतही मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न राहतील. सुमारे अडीच महिने राज्य सरकारच्या हाती असल्याने जनहिताचे, लोकप्रिय निर्णय घेऊन जनमत आणखी आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
प्रश्न काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचा राहील. राष्टÑवादीने महाराष्टÑात गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही चार जागा जिंकल्या. याउलट काँग्रेसची एक जागा कमी झाली. खान्देशच्यादृष्टीने विचार केला तर पक्षीय ताकद ही नंदुरबार व धुळे जिल्ह्यात चांगली आहे, मात्र जळगाव जिल्ह्यात तशी स्थिती नाही, हे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी निश्चितीवरुन दिसून आले. राष्टÑवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित होण्यापूर्वी पक्षाने कितीतरी नावांचा विचार केला होता. काही प्रतिष्ठीतांची नावे माध्यमांमध्ये पोहोचवून जनमानसाचा कानोसा घेण्यात आला होता. रावेरला तर राष्टÑवादीला सक्षम उमेदवार न मिळाल्याने अखेर ही जागा काँग्रेसला द्यायला राजी व्हावे लागले. माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी पक्ष मेळाव्यात अलीकडे केलेले विधान पक्षस्थितीचे अचूक मूल्यमापन करणारे आहे. या निवडणुकीत नेते व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले नाही, तर रावेरप्रमाणे जळगावसाठी उमेदवार शोधण्याची वेळ येऊ शकते. कोणी उमेदवारी घ्यायला तयार होणार नाही.
दुर्देवाने दोन्ही पक्ष, त्यांचे पक्षश्रेष्ठी, नेते आणि कार्यकर्ते हे अजूनही जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत नाही. तुमचा प्रतिस्पर्धी हा तगडा, नियोजनपूर्वक वाटचाल करणारा आणि साम, दाम, दंड भेद नीतीचा अवलंब करणारा असताना तुम्ही ऐनवेळी उमेदवार दिल्यानंतर काय निभाव लागणार आहे, याचा विचार करायला हवा. २०१४ ची निवडणूक जिंकल्यानंतर मोदी आणि शहा हे २०१९च्या तयारीला लागले होते. त्यामुळे अशा प्रतिस्पर्धी समोर दोन्ही काँग्रेसला नव्या रणनीतीने सामोरे जावे लागणार आहे.
स्थानिक नेते आणि कार्यकर्ते अजूनही सत्ताधीशांच्या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाही.हे नेते शिक्षण संस्था, सहकारी संस्था यांच्या व्यापात एवढे बुडालेले आहेत, की पक्षासाठी वेळ त्यांच्याकडे नाही. स्वत:ला उमेदवारी मिळाली तरच ही मंडळी सक्रीय होतात, दुसऱ्यासाठी तोंडदेखले काम केले जाते हा अनुभव आहे. शेंदुर्णी नगरपंचायत, जळगाव, धुळे महापालिकेच्या निवडणुका अलिकडे झाल्या; त्यासाठी दोन्ही काँग्रेसने ज्या पध्दतीने काम केले, त्यावरुन हा निष्कर्ष काढावा लागतो. जळगावातील काँग्रेस पक्ष कार्याची स्थिती पाहून पक्ष निरीक्षक अब्दुल सत्तार यांना वैफल्य आले. दुसरीकडे सत्तेत राहण्याची जी सवय लागली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेनेशी तडजोड करुन सत्तेचा वाटा मिळविला आहे. पाच वर्षे विरोधात बसायची कुणाची तयारी नाही, मग पक्ष वाढणार कसा? संयम, प्रतीक्षा हे गुण कालांतराने लाभदायी ठरतात, हा सुविचार आमच्या गावी नाही.
हे झाले स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे तर पक्षश्रेष्ठींची तºहा वेगळीच आहे. सामान्यांमधून आलेल्या नेतृत्वापेक्षा घराणे, लांगुलचालन करणारे नेते, कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे. नेता डोईजड होऊ लागला की, त्याचे पंख कापण्याचे काम केले जाते हा अनुभव खान्देशने वारंवार घेतला आहे. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले. काहींनी कुटुंबातील सदस्य भाजप-सेनेत पाठवून संस्थाने सुरक्षित राहण्याची धडपड केली. पक्ष जर पाठीशी खंबीरपणे राहत नसेल तर कोण सत्ताधाऱ्यांशी वैर घेईल, अशी भावना नेते व कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आहे. पक्षाची संघटनात्मक पदे घ्यायला कोणी तयार नाही, उमेदवारी घ्यायला तयार नाही, हे चित्र निर्माण होण्यास पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेते, कार्यकर्ते हे समप्रमाणात जबाबदार आहेत, हे नाकारुन चालणार नाही.