आता ट्विटरचे ‘कॉर्नर ऑफीस’ही भारतीयच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:08 AM2021-12-01T08:08:31+5:302021-12-01T08:08:57+5:30

Parag Agrawal : जगातील सर्व नावाजलेल्या कंपन्या आणि त्या चालवण्याची जबाबदारी भारतीयांवर हे जणू आता समीकरण झाले आहे. यापूर्वी अनेक भारतीयांनी आणि मूळ भारतीय असलेल्यांनी परदेशात राहून आपल्या देशाची शान वाढवली आहे.

Now Twitter's 'Corner Office' is Indian! | आता ट्विटरचे ‘कॉर्नर ऑफीस’ही भारतीयच!

आता ट्विटरचे ‘कॉर्नर ऑफीस’ही भारतीयच!

googlenewsNext

जगातील सर्व नावाजलेल्या कंपन्या आणि त्या चालवण्याची जबाबदारी भारतीयांवर हे जणू आता समीकरण झाले आहे. यापूर्वी अनेक भारतीयांनी आणि मूळ भारतीय असलेल्यांनी परदेशात राहून आपल्या देशाची शान वाढवली आहे. इंद्रा नूई दक्षिण भारतात जन्मल्या आणि त्यांनी अनेक वर्षे पेप्सी या बलाढ्य कंपनीची जबाबदारी लीलया पार पाडली. त्यांच्यासह अनेक ताऱ्यांनी भारताचे क्षितिज जगाच्या पटलावर सतत लखलखते ठेवले आहे. त्यातून भारत आणि इंटेलेक्च्युअल पॉवर हे समीकरण पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आता ट्विटरच्या सीईओ पदासाठी पराग अग्रवाल या भारतीय वंशाच्या तरुणाची निवड झाल्याने  पुन्हा त्याच इंटेलेक्च्युअल पॉवरवर शिक्कामोर्तब झाले आहे.

यापूर्वीही भारतीय इंटेक्लेक्च्युअल पॉवरने अनेक कंपन्यांना दिशा दिली. वेगाने भरारी घेण्याचा मार्ग दाखवला आणि त्यांना यशशिखरावरही नेले आहे. हैदराबादमध्ये जन्मलेले सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी सीईओ हे पद ग्रहण केल्यापासून मायक्रोसॉफ्टने भरारी घेतली आहे. जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलची कमान मूळ भारतीय सुंदर पिचाई यांच्या हाती आहे. सध्या जे क्रोम ब्राऊझर सर्रास सर्वत्र वापरले जात आहे, ते तयार करण्यात पिचाई यांचा मोठा वाटा होता. शंतनू नारायण हेही हैदराबादचे. त्यांच्याकडेही अडोब या मोठ्या कंपनीच्या केवळ सीईओ पदाचीच जबाबदारी नाही, तर या कंपनीचे ते अध्यक्षही आहेत. देवभूमी उत्तराखंडमध्ये जन्मलेले अरविंद कृष्णा जगभर बोलबाला असलेल्या आयबीएमसारख्या कंपनीचे  सीईओ आहेत. गाझियाबादसारख्या शहरात जन्मलेले निकेश अरोराही असेच. जगातील सर्वाधिक वेतन घेत असलेल्या सीईओंमध्ये त्यांचे नाव आहे. अरोरा हे सध्या पालो अल्टो नेटवर्क्स या सायबर सिक्युरिटीमध्ये दादा असलेल्या कंपनीची धुरा सांभाळत आहेत.

हे सर्व दिग्गज देशाची शान तर वाढवत आहेतच, शिवाय सर्वसामान्य भारतीय म्हणून आपल्यालाही त्यांचा अभिमान आहे. याच शिरपेचामध्ये पराग अग्रवाल नावाचा आणखी एक नवा तुरा खोवला गेला आहे. आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेतलेले पराग अग्रवाल यांना ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी मिळणे हे भारतीयांसाठी गौरवाचे आहे. कंपनीत प्रवेश केल्यापासून केवळ दहा वर्षांमध्ये त्यांनी हे यश गाठले. सोशल मीडियाच्या विश्वात आपले व्यासपीठ टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने नवनवे प्रयोग करत असलेल्या ट्विटरसाठीही त्यांची निवड महत्त्वाची होती. कारण, गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियातील दादा असलेले फेसबुक आणि ट्विटर वादात सापडत होते. भारतातही त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत आणि भारतीय कायद्यांनुसार त्यांना बदल करावे लागत आहेत. कायद्यांच्या पातळीवर अनेक देशांमध्ये अशाच घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवाय मधेच उठणारी आरोप-प्रत्यारोपांची राळ निराळीच.

एकूणच सोशल मीडियाच्या सगळ्याच चावड्यांवर जगभरात सर्वत्रच संशयाची सुई रोखली जात  असताना या महाबलाढ्य कंपन्यांचे तारू अनिश्चिततेच्या धुक्यातून वल्हवत नेणे हे सोपे नव्हे.  अशा वातावरणात आपले यूझर्स टिकवून ठेवायचे, वाढवायचे हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे या कंपन्या आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत. पराग अग्रवाल यांची निवड याचसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी ट्विटरमध्ये आणि त्यापूर्वी मायक्रोसॉफ्ट, एटी अँड टी आणि याहू या बड्या कंपन्यांमध्ये अनेक पातळ्यांवर संशोधनासंबंधी काम केले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर वाढू लागलेला असताना ट्विटरलाही त्यासाठी सक्षम करण्यात पराग यांचा वाटा मोठा आहे.

कोणतीही कंपनी उत्पन्नाशिवाय फारकाळ टिकू शकत नाही. चांगली धोरणे आणि त्यातून चांगले उत्पन्न अशी रणनीती असेल तर यशाचे दार फार काळ बंद राहू शकत नाही. पराग यांनी हीच कामगिरी आतापर्यंत करून दाखवली आहे. आजच्या काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला प्रचंड महत्त्व आहे आणि यात पराग अग्रवाल यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांची निवड ही येत्या काळात ट्विटरला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पराग यांचे (अर्थातच ट्विटरवर) अभिनंदन करताना एलॉन मस्क यांनी मूळ मुद्द्याला हात घातला आहे. ते म्हणतात,  ‘भारतातून स्थलांतरित झालेल्या बुद्धिमान लोकांनी अमेरिकेच्या प्रगतीला मोठा हातभार लावला आहे हे नक्की!’

स्थलांतरितांच्या बुद्धिवैभवाचा त्यांच्या दत्तक देशालाच अखेर कसा फायदा होतो हे अधोरेखित करणारी आणखी एक बातमी पराग अग्रवाल यांच्या रूपाने समोर आली, याकडेही अनेक गट निर्देश करीत आहेत, हेही महत्त्वाचेच ! 

जगाला दाखवून देऊ!
पराग अग्रवाल यांना ट्विटरकडून दहा लाख अमेरिकन डॉलर्स इतके मूळ वार्षिक वेतन तर मिळेलच; शिवाय बोनस आणि कंपनीचे भागही दिले जातील. आपल्या कर्मचाऱ्यांना उद्देशून केलेल्या टि्वटरवर पराग यांनी आपल्या पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली आहे. ते आपल्या पत्रात लिहितात, ‘जगाला टि्वटरची क्षमता दाखवून देऊ..’

Web Title: Now Twitter's 'Corner Office' is Indian!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.