अब तुम ही हो ‘सहारा’!
By admin | Published: December 24, 2016 12:00 AM2016-12-24T00:00:14+5:302016-12-24T00:00:14+5:30
सुब्रतो राय नावाचे एक ‘महा’उद्योगपती देशातील समस्त राजकारण्यांच्या, सिनेमावाल्यांच्या, खेळवाल्यांच्या आणि सत्ताधीशांच्या
सुब्रतो राय नावाचे एक ‘महा’उद्योगपती देशातील समस्त राजकारण्यांच्या, सिनेमावाल्यांच्या, खेळवाल्यांच्या आणि सत्ताधीशांच्या नजरेत एक महान गृहस्थ आणि दानवीर कर्णदेखील आहेत. त्यांनी आपले हात नानाविध क्षेत्रातील उद्योगांमध्ये बुचकळून ठेवले आहेत आणि अशा सर्व उद्योगांना ते सहारा म्हणून संबोधतात व या सहाराचे ते ‘श्री’ आहेत. बहुधा ‘हे तो श्रींची इच्छा’मधले श्री! टाकू या करुन साऱ्यांना ओशाळे या भूमिकेतून त्यांनी दीर्घकाळ भारतीय क्रिकेटला कसे ओशाळे करुन टाकले होते, त्याची आठवण देशातील क्रिकेट रसिकांच्या मनात आजही ताजीच असणार. त्या खेळातील यष्ट्यांपासून मैदानापर्यंत आणि खेळाडूं्च्या पॅडपासून पंचांच्या टोप्यांपर्यंत यत्र तत्र सर्वत्र सहारा! लोकाना तोपर्यंत सहारा म्हणजे रखरखीत वाळवंट इतकेच ठाऊक होते. पण मग या सहाराकडे इतकी हिरवळ अचानक कोठून आली? आकर्षक व्याजाच्या भूलथापांना नेहमीच फसणारे भारतीय हे या सहाराचे सावज होते. सहारात अधिक कमाईचा सहारा लोभी भारतीयांनी शोधला आणि या खेळात अखेर तेच बेसहारा झाले. ज्यांच्या आपली फसवणूक झाल्याचे ध्यानी आले त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या परताव्यासाठी रेटा लावायला सुरुवात केली. देशातील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेऊन असणाऱ्या वा किमान तशी अपेक्षा असलेल्या ‘सेबी’ (सेक्युरिटीज अॅन्ड एक्स्चेंज बोर्ड) या पंचाने मग यथावकाश हस्तक्षेप केला. सहारा श्रींनी गुंतवणूकदारांचे तब्बल २४हजार कोटी रुपये तत्काळ परत करावेत असे फर्मान सेबीने जारी केले. पण परत द्यायला पैसे होते कुठे? मुळात ज्यांच्या नावाने गुंतवणूक झाल्याचे कागदोपत्री नोंदविले गेले होते, त्यातील कित्येक नावेच म्हणे मुळात बनावट होती. म्हणजे घोटाळ्याला तिथपासूनच प्रारंभ. देशभरात उंची हॉटेले बांधणे, अन्य उद्योगांमध्ये गुंतवणूक करणे, क्रिकेटच्या खेळाला सहारा देणे यातच सारे पैसे संपलेले. पण तितकेच कशाला, महाराष्ट्रात व तेही पुण्यानजीक लोणावळा परिसरात तब्बल दहा हजार एकरात याच सहाराने ‘अॅम्बी व्हॅली’ नावाची एका ‘मग्न तळ्याकाठची’ सुंदर वसाहत उभी केली, तिच्यात उरले सुरले पैसे संपून गेले. मग गुंतवणूकदाराना देणार काय? मग सेबी कामाला लागली. सहारा श्रींच्या विरोधात पकड वॉरन्ट निघाले. वयोवृद्ध मातेच्या आजारपणाचे निमित्त करुन काही दिवस अटक टाळली गेली. न्यायालयाचे दरवाजेही ठोठावून पाहिले गेले. पण अखेर ‘तिहार’ची हवा खाणे भागच पडले. सर्वोच्च न्यायालयाच्याही सारे गौडबंगाल लक्षात आले. तिहारात बसून का होईना जंगम मालमत्ता विका पण ठेवीदारांचे पैसे परत करा असा लकडा लावला. जामिनावर बाहेर यायचे तर दहा हजार कोटींचा जातमुचलका द्या. पण सहारा श्री ते काही करु शकले नाहीत. दरम्यान दोन वर्षांचा तिहारमधील मुक्काम पुरा झाला. तितक्यात त्या वृद्ध मातेचे देहावसान झाले आणि इकडून तिकडून पैसे गोळा करुन सहारा श्रींनी सर्वोच्च न्यायालयातून पॅरोलवर मुक्तता मिळवली. सध्या ते याच पॅरोलवर आहेत. याच सहारा श्रींनी किंवा त्यांच्या सहारा परिवाराने तीनेक वर्षांपूर्वी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना तब्बल ४० कोटी रुपयांची लाच दिल्याचा स्पष्ट आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी परवाच केला. लाचलुचपतीच्या गुन्ह्यांमध्ये ती स्वीकारणारा जितका दोषी तितकाच ती देणारादेखील दोषी मानला जातो. साहजिकच ज्या सामान्य गुंतवणूदारांनी त्यांची कष्टाची कमाई सहारामध्ये गुंतवली त्यांची रक्कम परत देण्यासाठी ज्यांच्याकडे पैसे नाहीत तेच लोक कोट्यवधींची लाच देत सुटतात म्हटल्यावर मोदींचेच शब्द उधारीत घेऊन ‘ऐसे लोगों को सबक सीखाना और उनपर सामाजिक बहिष्कार का अमल करना चाहिये की नही चाहिये’ असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण कसचे काय? जनसामान्यांनी असे आरोप-प्रत्यारोप झाले की हळहळ व्यक्त करायची आणि याच लोकांनी गळ्यात गळे घातले की आपली बोटे आपल्याच तोंडात घालायची. सारे वास्तव असेच आहे म्हणूनच या सहारा श्री सुब्रतो राय यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या आधारे लखनऊमध्ये आयोजित चर्चासत्रात देशातील सर्व राजकीय पक्षांचे लोक झाडून-आवर्जून हजर होते. अगदी असदुद्दीन ओवेसीदेखील होते. अमिताभ ते बाबा रामदेव आणि अखिलेश ते गुलाम नबी आझाद हेदेखील होते. सहारा श्रींच्या पुस्तकाचा मथळादेखील मोठा विलक्षण, ‘थिंक विथ मी’ (माझ्यासंगे विचार करा). या मथळ्यावर आधारित त्याच शीर्षकाची जी शिखर परिषद पार पडली तिला हे सारे तारांगण आवर्जून्Þा हजर होते. याचा अर्थ ते सारे सहारा श्रींच्या संगे विचार करायला सिद्ध झाले होते. मुळात सहारा श्रींचा विचार तो प्रत्यक्षात विचार, अविचार की कुविचार, याचाच पत्ता नाही. ज्यांनी आपले पैसे बुडवून घेतले त्यांच्या आणि कदाचित राहुुल गांधी यांच्या विचारांमध्ये तो कुविचारच असणार. पण त्यांना विचारतो कोण? अखेर नुसत्या विचारांनी काही होत नाही. आश्रय लागतो व त्यासाठीच हे, श्री अब तुमही हो सहारा!