वाचनीय लेख - नग्नता : ना धर्मद्रोह, ना कायदाभंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 01:10 PM2022-07-29T13:10:09+5:302022-07-29T13:11:05+5:30
अंग झाकायला वस्त्र आले तेच मुळी असल्या शब्दांना बरोबर घेऊन.
न्यू यॉर्कमधील एका मासिकासाठी रणवीर सिंगचे वेगवेगळ्या शारीरिक स्थितीत नग्नावस्थेतील फोटो काढले गेले. ही छायाचित्रे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे समाजासमोर आली आणि ती चित्रपटसृष्टीतील एका वलयांकित अभिनेत्याशी संबंधित असल्यामुळे सगळीकडे त्याचा बोभाटा झाला. त्यानंतर काही संस्कृती रक्षकांनी पोलीस ठाण्यात त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कायद्याच्या कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंदविला ते कळायला जसा मार्ग नाही, तसेच संस्कृती रक्षकांना कोणत्या संस्कृतीचे रक्षण करायचेय, तेही समजलेले दिसत नाही. वस्त्राचा शोध लागल्यानंतरची संस्कृती त्यांना बहुतेक जपायची असावी. कारण त्यापूर्वी माणूस नग्नावस्थेतच फिरत होता आणि नैतिक-अनैतिक, श्लील-अश्लील, लज्जास्पद नग्नता वगैरे शब्दांशी त्याचा परिचयच नव्हता.
अंग झाकायला वस्त्र आले तेच मुळी असल्या शब्दांना बरोबर घेऊन. शरीर वस्त्रात लपेटून घेणे हे मग संस्कृतीचे लक्षण ठरले नव्हे, तर ठरवले गेले. नग्नता हा ना धर्मद्रोह आहे, ना कायदाभंग आहे. रणवीर कपडे उतरवून वेडेवाकडे चाळे करत भाजी मंडईत फिरत नव्हता, तर एका मासिकाशी केलेल्या कराराची तो पूर्तता करत होता. मनावर खोल रुजलेल्या संस्कृतीमुळे आज कोणीही चार भिंतीच्या बाहेर येऊन उघड्या देहाचे प्रदर्शन (सामान्यत:) करत नाही. संस्कृतीचा फुकाचा डंका फुंकून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे प्रकार टाळलेच पाहिजेत. तेवढा समंजसपणा किमान आजच्या समाजात असला पाहिजे. आणि नग्नतेची गणना ‘गुन्हा’ या सदरात करायची असेल तर जिथे आजही आधुनिक वस्त्र संस्कृती पोहोचलेली नाही, अशा अतिमागास भागातील आदिवासी, रस्त्यात फिरणारे विवस्त्र मनोरुग्ण, नग्न साधू या सर्वांनाच गुन्हेगार ठरवावे लागेल.
विवस्त्र अवस्थेत रोज अर्धा तास तरी सूर्यप्रकाशात उभे राहण्याचे फायदे रघुनाथ कर्वे यांनी शंभर वर्षांपूर्वी सांगितले होते. त्यासाठी बंदिस्त जागेत त्यांनी क्लबही सुरू केला होता. पण शरीर स्वास्थ्यापेक्षा संस्कृती जपणाऱ्या त्या काळात काळाच्या खूपच पुढे असलेल्या कर्वे यांच्या या क्लबसाठी एकही सदस्य मिळाला नाही. रणवीर सिंगने रघुनाथ कर्वे यांचे स्वप्न आज पूर्ण केले. अभिनंदन रणवीर!
- शरद बापट, पुणे