कोरोनाच्या छायेतही संख्याशास्त्र नमस्तेस्तु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:16 AM2020-05-02T02:16:51+5:302020-05-02T02:17:02+5:30
व्यक्तीगत व्यवहारात संख्याशास्त्र फारसे उपयोगाचे नाही असे लक्षात आले.
मधूसुदन जोशी
कोरोनाचा कहर जगभर चालूच आहे. आर्थिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ त्या वर आपले विचार मांडत आहेत. भारतात संचारबंदी लागून आता महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. महिन्याभराचा ताळेबंद बांधायचा विचार करून काही माहिती गोळा केली. व्यक्तिगत पातळीवर प्रवास न केल्या मूळे वाचलेला इंधन खर्च व हजामपट्टी न केल्यामुळे वाढलेली दाढी ह्या बरोबर वजनामध्ये तोळ्याची न झालेली वाढ ह्या किरकोळ गोष्टी. त्याच बरोबर भरपगारी सुट्टी मिळाली हा तर अनेकांसोबत झालेला लाभ. त्यामुळे व्यक्तीगत व्यवहारात संख्याशास्त्र फारसे उपयोगाचे नाही असे लक्षात आले.
रिकामे मन सैतानाचे घर अशी एक म्हण. त्याला अनुसरून गुगल काका व महाजाल (६६६ )मावशी यांच्या सत्संगाचा बराच लाभ झाला. त्या सतसंगात आकडेवारीची अनेक ज्ञान भंडारे उघडी झाली. पश्चात बुद्धी अथवा असे एक संत वचन आहे त्याचेही स्मरण त्या निमित्त झाले. संख्याशास्त्र अथवा हे वयाने तसे लहान शास्त्र. परंतु कलियुगात जगाचा अंत होण्याऐवजी डेटायुगाची सुरवात झाली. प्रचंड प्रमाणातील डेटाचा सुप्त अर्थ केवळ सांख्यिकी महर्षीच सांगू शकतात.
जगाची लोकसंख्या सुमारे ७७० कोटी आहे. जगातील मृत्यू दर दर वर्षी एक टक्का धरल्यास वर्षाकाठी अदमासे ७ कोटी लोक यमलोकी जातात. अर्थात जगात दिवसाला सुमारे २ लाख लोक मरतात. अमेरिका सध्या सगळ्याच बाबतीत आघाडीवर असल्याने त्या देशाच्या आकडेवारी कडे प्रथम लक्ष गेले. अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटी आहे. (ह्या आकड्याचा भारतीय तत्वज्ञानाकडे संबंध आहे हा देखील विलक्षण योगायोग म्हणायचं काय?) अमेरिकेत मृत्यूचे प्रमाण. ०.८%आहे. वर्षाला तीस लाख, तर महिन्याला अडीच लाख लोक अमेरिकेत मरतात.
भारतात ‘सव्वा सौ’ करोड लोक असल्याचे पाच सहा वर्षांपूर्वी वारंवार कानावर आदळत होते. आजपावेतो लोकांनी जाणते अजाणतेपणी त्या फुलांच्या परडीत देवघराच्या दहा कोटी फुलांची तरी भर टाकलेली असणारच. गुगल काकांनी पुरवलेल्या माहिती प्रमाणे भारतात मृत्यूचे प्रमाण ०.९ टक्के आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर दर वर्षी किमान १ कोटी लोक जिस मिट्टीसे आते है उस मिट्टीमे जाते है. आकडेमोड करून असे कळले की दर दिवशी भारतात पंचवीस हजार लोक मृत्यू प्रमाणपत्र मिळवतात. पैकी पाच हजार भूकबळी असल्याचे कोण तरी सांगतो. सुमारे पाचशे लोक रस्त्यावरील अपघातात मरतात. भारत अनेक रोगाची राजधानी आल्याचे बऱ्याच वेळा कानी पडते. उदाहरणार्थ मधुमेह, हृदय रोग ई. भारतात टीबीची लागण आठ लाख नव्या लोकाना होते. अदमासे दोन ते तीन लाख लोक भारतात क्षय रोगाने मरतात.
संख्याशास्त्राचा आधार नमुना तपासणी. शितावरून भाताची परीक्षा करतातना तसं. समजा वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ सुरय, उकडे,बासमती वगैरे एकत्र करून भात शिजवताना केवळ एका शितावरून भात शिजल्याची परीक्षा होईल का? सॅम्पलची निवड चुकली कि अंदाज चुकलाच. ह्या नमुन्याच्या निवडची मिमांसा ग्राऊंट ह्या ब्रिटिश माणसाने पंधराव्या शतकात प्रथम केली. निमीत्त होतं इंग्लंड मध्ये आलेल्या प्लेग साथीचे. त्यासाठी त्याने लंडन मधील माणसांची जमेल तेवढी माहिती जमवायला सुरवात केली. ह्यातूनच मग संख्याशास्त्राच्या जोडीला जनकशास्त्र अथवा डेमोग्राफी अवतरले. डेटा युगाचा पाया ह्या ग्रॉउंटने घातला म्हणा हवं तर. ह्या डेटाची माहिती मग सरकारला नियोजना साठी उपयोगी पडली.
संख्याशास्त्रामध्ये तोवर संभाव्य अथवा शक्य अशक्यतेचा शिरकाव झाला नव्हता. प्रोबॅबिलिटी अथवा संभ्याव्यतेने संख्याशास्त्राची उपयुक्तता वाढवली. त्यातूनच मग विज्ञान, अर्थशास्त्र, विमा,आरोग्य हे भविष्याची दिशा ठरवू लागले. लोकडउनचा काळ ठरवण्या साठी संभाव्यतेचा उपयोग होतो. रोग होण्याची, त्याच्या तीव्रतेची, प्रसार होण्याचा वेग हे संगणकाचं वापर करून ठरवण्यात येऊ लागले. भारत लॉकडाउनची गरज होती का इथपासून त्यामुळे किती नुकसान झालं हेदेखील संख्या शास्त्र सांगते. पण हे नंतरचे पांडित्य. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोठे प्रयोग करून पाहता येत नाहीत. संभाव्यतेचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावे लागतात. सरकारचे प्रथम काम नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवायचे हे असते. सलामत राहिलेल्या डोक्यात आकडे येतात किंवा किडे वळवतात हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर व विचारसरणीवर अवलंबून आहे. शेवटी लॉकडउन हे शारिरिक होते, मानसिक नव्हते.
ही आकडेवारी अशासाठी की तीन मे रोजी टाळेबंदी उठविल्यावर चर्चा, वादविवाद ह्यांना जोर चढणार आहे. हे सगळे कसे घडले ह्याचे विश्लेषण करणारे अनेक असतील. का घडले ह्याचाही अचूक अंदाज अनेक घेतील. पुढे काय घडणार ह्याचा लक्षवेध ह्या मंथनातून अपेक्षित आहे. अनेक सांख्यमुनी संख्याशास्त्राचा यथायोग्य अभ्यास करून कोरोना वादळ मार्गी लावतील अशी अपेक्षा करूया.
(प्राध्यापक, साहित्यिक)