जमिनीतून वर येते आहे देखणे मणिकर्णिका कुंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:29 AM2021-03-13T01:29:36+5:302021-03-13T01:30:50+5:30
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या आवारात गेली ६३ वर्षे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेली एक देखणी वास्तू कमळ उमलावे तशी मातीतून बाहेर येते आहे..
इंदुमती गणेश
करवीरनिवासिनी अंबाबाईचे वास्तव्य आणि राजर्षी शाहू महाराज यांचे पुरोगामित्व लाभलेले कोल्हापूर. अगणित तीर्थकुंडे, जलाशये आणि तळ्यांचे शहर. या जलाशयांमध्ये पुराणकालीन वास्तुसौंदर्याचा अजोड नमुना म्हणजे अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणिकर्णिका कुंड! भारतीय स्थापत्यशैलीमध्ये मंदिरांच्या शेजारी किमान दोन जलाशयांची निर्मिती असते.
भक्ताला पाणी मिळावे, क्षणभर विश्रांती घेता यावी हा हेतू! देशातील अनेक मंदिरांशेजारी अशी कुंडे असतात. त्यातलेच एक म्हणजे हे मणिकर्णिका कुंड! अंबाबाई मंदिराच्या सपाटीपासून ४० फूट खोल, ६० फूट लांब, ६० फूट रुंद असे चौकोनी! त्यात उतरण्यासाठी शेजारच्या मुक्तिमंडपातून दक्षिणेला तसेच उत्तरेला पायऱ्या. खाली प्रशस्त जलाशय. जिवंत झरे असल्याने यातील पाणी कधीच आटले नाही. मोठी कासवे आणि माशांचा येथे मुक्त वावर असे. पूर्ण दगडी बांधकाम. भक्तांना स्नानानंतर वस्रे बदलण्यासाठी भव्य मंडप. महिलांसाठी स्वतंत्र बंदिस्त जागा. खांबांवर देखणे कोरीव काम! राजघराण्यातील महिला-पुरुष येथे स्नान करण्यासाठी आले की अंगावरची वस्त्रे येथेच सोडून जात. नंतर ही वस्त्रे घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी होत असे. शहरीकरण सुरू होताच कोल्हापुरात एवढ्या जलाशयांची गरजच काय, त्यात भराव टाकून जमिनी उपलब्ध करू अशी चर्चा सुरू झाली. १९५८ साली मणिकर्णिका कुंडावर हातोडा पडला. कुंडात कचरा टाकला जातो, पीडित स्त्रिया आत्महत्या करतात ही कारणे कुंड बुजविण्यासाठी पुरेशी होती. त्या वेळी कोल्हापूर नगरपालिकेने आधुनिक कोल्हापूरचे शिल्पकार जे. पी. नाईक यांच्यासह त्रिसदस्यीय नगरविकास समिती नियुक्त केली. नाडकर्णी नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कुंडातील पाण्याचा उपसा करून गाळ काढण्याचा प्रयत्न केला. पण, जिवंत झऱ्यांमुळे पाणी हटेना. पूर्ण उपसलेले कुंड एका रात्रीत पुन्हा भरायचे. असे चार महिने चालले.
शेवटी उपसा थांबवून जे. पी. नाईक यांनी कुंड बुजविण्याचा निर्णय घेतला. शेजारचा महंतांचा वाडा आणि निरंजन आखाड्याची इमारत पाडून त्याचा भराव या कुंडात टाकला गेला. नगरपालिकेला जमीन मिळाली, बाग तयार केली गेली आणि पुढे महापालिकेने त्यावर थेट सुलभ शौचालयच उभारले. अशा रीतीने ‘मणिकर्णिका कुंड’ ही सुरेख वास्तू, त्यासोबत जोडले गेलेले धार्मिक अधिष्ठान सगळे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. १९५८ साली मणिकर्णिका बरोबरच कपिलतीर्थ, खंबाळातीर्थ ही तीर्थकुंडे बुजविली गेली. कोरीव रेखीव दगडीकाम केलेली अनेक मंदिरे, ओवऱ्या, पौराणिक कथा, परंपरा, धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या वास्तू जमिनीखाली गाडल्या गेल्या. तब्बल ६३ वर्षे मातीच्या ढिगाऱ्याखाली बंदिस्त झालेले हे मणिकर्णिका कुंड आता पुन्हा प्रकाशात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने गेल्या नऊ महिन्यांपासून या कुंडाचे उत्खनन सुरू आहे. त्यात महादेवाची मंदिरे, ओवऱ्या, पायऱ्या, वीरगळ, ध्यानसाधनेसाठीचे मंडप या वास्तू प्रकाशात आल्या आहेत. शिवाय तांब्याची नाणी, अनेक देवतांच्या मूर्तींसोबतच बंदुकीचे बार, पुंगळ्या, घड्याळ, तांब्याचे तांबे, भोजनपात्र, काचेचे कंदील, मापटी, तांब्याची असंख्य नाणी, जर्मन बनावटीची बंदूक अशा साडेचारशेहून अधिक वस्तू सापडल्या आहेत. आतापर्यंत २७ फूट खुदाई झाली असून आणखी १३ फूट खुदाई होईल. सध्या जेथून पाण्याचे उमाळे फुटतात, ते मुख्य १४ बाय १८ फूट आकाराचे चौकोनी कुंड सापडले आहे.
तळ्यातून कमळ उगवावे तशी जमिनीत गाडलेली एका देखणी वास्तू पुन्हा उमलू लागली आहे. आंधळ्या शहरीकरणाच्या नादात आपण आपल्याच इतिहासाच्या, परंपरांच्या अशा अनेक खुणा जमिनीत गाडतो, तेव्हा त्याबरोबर आपले सत्त्वही गाडले जात असते. आता खिशाला परवडतो म्हणून युरोपचा प्रवास करायला जाणारी आपण भारतीय माणसे तेथील संवर्धन केलेल्या वास्तू पाहून अवाक् होतो, तेव्हा आपण आपल्याच अंगणात काय काय गाडून वर सिमेंटचे ठोकळे उभारत सुटलो आहोत, याचा विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही. दगडी बांधकामातल्या जुन्या देखण्या मंदिरांना सिमेंटचे प्लास्टर चढवून वर लाल-निळे रंग फासण्याचा निर्बुद्धपणा म्हणजेच ‘सौंदर्य’ अशी काहीतरी भलतीच व्याख्या हल्ली झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कौतुक यासाठी की त्यांनी जमिनीत गाडलेला इतिहास उकरण्याची, झाली चूक दुरुस्त करण्याची तयारी दाखवली.
(लेखिका लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये वार्ताहर आहेत )