वेध - वेड लागलेला वन, वित्तमंत्री !

By admin | Published: July 3, 2017 12:05 AM2017-07-03T00:05:20+5:302017-07-03T00:32:55+5:30

मंत्रिपद आले की अनेकांना नको त्या गोष्टीचे वेड लागते. त्याच्या सूरस कथा लपूनही राहत नाहीत. अगदी अमित शहा यांनी मंत्र्यांच्या बैठकीत

Obsessive-obsessed forest, finance minister! | वेध - वेड लागलेला वन, वित्तमंत्री !

वेध - वेड लागलेला वन, वित्तमंत्री !

Next

- अतुल कुलकर्णी
मंत्रिपद आले की अनेकांना नको त्या गोष्टीचे वेड लागते. त्याच्या सूरस कथा लपूनही राहत नाहीत. अगदी अमित शहा यांनी मंत्र्यांच्या बैठकीत कोणत्या मंत्र्याला झापले तेही बाहेर आलेच की... या सगळ्या पार्श्वभूमीवर वेड लागलेला वनमंत्री म्हणूनच वेगळा ठरतो...

जगी हा खास वेड्यांचा,
पसारा माजला सारा...
गमे या भ्रांत संसारी,
ध्रुवाचा ‘वेड’ हा तारा...
कुणाला वेड कनकाचे,
कुणाला कामिनीकांचे...
भ्रमाने राजसत्तेच्या,
कुणाचे चित्त ते नाचे...
कुणाला देव बहकावी,
कुणाला देश चळ लावी...
दुरंगी दीन दुनियेची,
जवानी रंगली सारी...
वीर वामनराव जोशी, यांनी लिहिलेले व वझेबुवांनी संगीत दिलेले, मा. दीनानाथ यांच्या आवाजामुळे अजरामर झालेले हे गाणे ७० वर्षानंतरही जसेच्या तसे खरे ठरताना दिसते आहे. आपल्या आजूबाजूला वेड्यांचाच पसारा मांडलाय, कुणाला पैशांचे वेड लागले, तर कुणाला हातात पैसे खेळू लागले की कामिनीचे वेड लागते. बेभानपणे पैसा, जवानी आणि नको नको त्या गोष्टींची बेफाम उधळण करणारे मग मिळालेल्या पदाचीही तमा बाळगत नाहीत.
आज हे सगळे आठवण्याचे कारण ठरले आहेत, स्वत:च्याच निर्णयांचा पाठपुरावा घेण्याचे आणि दिसेल तेथे वृक्ष लावण्याचे वेड लागलेले मंत्री सुधीर मुनगंटीवार. मंत्रिपदाची झुल अंगावर आली की भल्या भल्यांना काही सुचेनासे होत असताना मुनगंटीवारांना गेले दोन ते तीन महिने झाडं लावण्याच्या वेडाने झपाटले आहे. गेल्यावर्षी सव्वा कोटी झाडं लावून झाल्यानंतर यावर्षी त्यांनी चार कोटी झाडं लावण्याचा संकल्प सोडला आणि त्यासाठी हा माणूस दिवसरात्र वेड्यासारखा भटकतो आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला सारून पक्ष आणि पक्षाबाहेरच्या नेत्यांचे उंबरे झिजवत त्यांनी राज्यातल्या एकाही नेत्याचे घर सोडले नाही. सगळ्यांनी वृक्षारोपणात सहभाग घ्यावा, वातावरण निर्मिती करावी याचा आग्रह त्यांनी धरला. १ जुलै ते ७ जुलै हा आठवडा प्रत्यक्षात कृती करुन दाखवण्याचा असताना मुनगंटीवार यांनी त्याआधी शेकडो बैठका घेतल्या. दिसेल त्याला झाडं किती लावली असे आग्रहाने विचारणाऱ्या या वेडाचे वर्णन
कुणाला झाड बहकावी,
कुणाला झाडे चळ लावी...
यापेक्षा वेगळे काय असू शकते? त्यांचा हा वेडेपणा केवळ झाडे लावण्यापुरता राहिलेला नाही. स्वत:च्या मंत्री कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र ही त्यांनी मिळवले. आपण जो निर्णय घेतो त्याचे पुढे काय झाले यासाठी टोकाचा चिवटपणे पाठपुरावा करणारा दुसरा मंत्री अभावानेच दिसतो. एखाद्या सचिवाला काम सांगितलेले असेल तर कुठे, कधी, कोणत्या वेळी आणि कोणासमोर ते काम सांगितले याची लेखी नोंद ते ठेवतात. एखाद्याने कधी सांगितले असे विचारले की ते लगेच ‘पाठपुरावा डायरी’ काढतात आणि सगळी कुंडली सांगून टाकतात. त्यामुळे ‘काम करतो पण पाठपुरावा आवरा’ असे म्हणण्याची वेळ सचिवांवर येते तेथे बाकीच्यांचे काय?
आयएसओ प्रमाणपत्र घेतल्यानंतर आता त्यांच्या कार्यालयात कोणत्या अधिकाऱ्याने कोणते काम किती दिवसात पूर्ण करायचे याच्या याद्याच भिंतीवर लावून ठेवलेल्या आहेत. जर दिलेल्या वेळेत काम झाले नाही तर थेट आपल्याला सांगा, असे ते सांगतात. याच्या उलट अन्य मंत्री कार्यालये आहेत.
कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही पण त्यांच्या मोबाईलवर आलेल्या एसएमएसचेही ते प्रिंटआऊट काढतात आणि त्याचे पुढे काय झाले हे खासगी सचिवांना विचारतात. हे असले वेड राज्यातल्या अन्य मंत्र्यांना १० टक्के जरी लागले तरी मुख्यमंत्र्यांना अपेक्षित असणारा निकाल मिळायला वेळ लागणार नाही, पण अन्य मंत्र्यांना कशाकशाचे वेड लागले आहे याच्या सुरस कथा मंत्रालयात फिरले की हमखास ऐकायला मिळतात.
जे चित्र आज वित्त मंत्र्यांच्या कार्यालयात पहायला मिळते तेच चित्र अन्य मंत्र्यांच्या कार्यालयात का पहायला मिळत नाही याचे उत्तर त्या त्या मंत्र्यांनी शोधायचा जरी प्रयत्न केला तरी खूप काही साध्य होईल...
 

Web Title: Obsessive-obsessed forest, finance minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.