वॉटर कपच्या निमित्तान
By admin | Published: June 12, 2016 05:02 AM2016-06-12T05:02:59+5:302016-06-12T05:02:59+5:30
सत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे नेमका काय प्रकार आहे? कोणते गाव जिंकेल हे कसे ठरवले जाईल? या प्रश्नांची उत्तरे समजण्यास पाण्याच्या विज्ञानाचा आपल्याला थोडा अभ्यास करावा
- सत्यजीत भटकळे
सत्यमेव जयते वॉटर कप म्हणजे नेमका काय प्रकार आहे? कोणते गाव जिंकेल हे कसे ठरवले जाईल? या प्रश्नांची उत्तरे समजण्यास पाण्याच्या विज्ञानाचा आपल्याला थोडा अभ्यास करावा
वरुणराजा आपल्याला पावसाच्या रूपात किती पाणी देतो हे आधी पाहणे गरजेचे आहे. २०१५-१६ च्या भयानक दुष्काळातही मराठवाड्यात ४०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. १००० हेक्टर एवढे क्षेत्रफळ असलेल्या गावात जर ४०० मिलीमीटर पाऊस पडला तर त्या गावाला पावसाचे केवढे पाणी मिळाले असेल?
पावसाचे पाणी (घ.मी.) = गावाचे क्षेत्रफळ (१ हेक्टर = १०,००० चौरस मी.) ७ सरासरी पाऊस (मी.) = ४ कोटी घनमीटर पाणी.
जरा विचार करा, दुष्काळी वर्षातही दुष्काळी क्षेत्रातील या गावात ४ कोटी घनमीटर म्हणजेच ४०० कोटी लीटर म्हणजेच ४ लाख टँकर एवढे पाणी पावसाच्या रूपात पडले! मग या पाण्याचे नेमके काय झाले? पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते पाणी ४ मुख्य ठिकाणी पोहोचते.
१. ते बाष्पीभवनामार्फत हवेत उडून जाते.
२. मातीत ओलावा पोहोचवते.
३. अपधावाच्या (फ४ल्ल ङ्माा) रूपात ते नदी-नाल्यांतून वाहून जाते.
४. भूगर्भात मुरून तेथील पाण्याला रिचार्ज करते.
पाणलोट विकासाच्या कामांनी आपण मुख्यत: पाण्याचा अपधाव कमी करून जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जिरवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे हे पाणी बाष्पीभवनापासूनही वाचते आणि पाऊस संपल्यानंतर ते विहिरींमार्फत कामात येते.
अपधावाने वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण जर संपूर्ण महाराष्ट्रात ४० टक्के एवढे ग्राह्य धरले तर उदाहरणादाखल घेतलेल्या वरील गावात १.६ लाख टँकर एवढे पाणी गावातून वाहून गेले, हे आपल्याला लक्षात येईल. या अपधावाचा जरी अर्धा भाग आपण गावातच अडवून भूगर्भात जिरवला तर त्या गावाला ८ लाख घनमीटर म्हणजेच ८०,००० टँकर पाणी उपलब्ध होईल. थोडक्यात दुष्काळी वर्षातही वरुणराजा आपल्याला खूप पाणी देत असतो. आपल्यासमोर आव्हान आहे, पाणी जास्तीत जास्त भाग भूगर्भात पोहोचवण्याचे.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा नेमकी याच कामाला उत्तेजन देते. जे गाव सर्वात जास्त पाणीसाठे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल त्या गावाला सर्वात जास्त मार्क देण्यात येतील. स्पर्धेच्या काळात स्पर्धक गावांनी सीसीटी, मातीचे बंधारे, दगडी बंधारे असे अनेक लहान लहान उपचार तयार केले आहेत. ज्यामार्फत पाण्याचा अपधाव कमी होईल व जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जिरेल. या उपचारांची किमया ही पहिल्या पावसातच दिसू लागली आहे. अनेक दुष्काळग्रस्त गावांतील विहिरींच्या पातळीत पहिल्या पावसातच चमत्कारिक वाढ झाली आहे. ही गावे पाण्याच्या बाबतीत कायमची स्वावलंबी होतील हे निश्चित!
यात सर्वात कौतुकास्पद बाब ही की हे काम ग्रामस्थांनी एक होऊन स्वत:च्या ताकदीने केले आहे. रणरणत्या उन्हात श्रमदान करून ही कामे केली आहेत. या मेहनतीला जोड होती ती प्रशिक्षणाची. ते प्रशिक्षण नेमके काय होते आणि त्यामुळे किती फरक पडला ते पुढील लेखात पाहू. तूर्त लक्षात ठेवूया की वरुणराजा आपल्याला खूप पाणी देत असतो. त्या पाण्याचा आदर केल्यास आपण कायमचे दुष्काळमुक्त होऊ शकू.
(लेखक प्रसिद्ध दिग्दर्शक असून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)