मान ना मान भगवान

By admin | Published: July 25, 2016 03:34 AM2016-07-25T03:34:33+5:302016-07-25T03:34:33+5:30

असे गणंग गाठीशी बांधल्यानंतर त्यातून वेगळे काय होणार असते? कोणत्याही का होईना क्षेत्रात आपल्यातील गुणावगुणांच्या जोरावर लोकप्रियता संपादन केलेल्या लोकांना स्वत:च्या पदरी

Oh no god of honor | मान ना मान भगवान

मान ना मान भगवान

Next

असे गणंग गाठीशी बांधल्यानंतर त्यातून वेगळे काय होणार असते? कोणत्याही का होईना क्षेत्रात आपल्यातील गुणावगुणांच्या जोरावर लोकप्रियता संपादन केलेल्या लोकांना स्वत:च्या पदरी बाळगण्याची हौस देशातील सारेच राजकीय पक्ष करीत असतात. त्यामुळे ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ म्हणजे नकला करण्याच्या कलेच्या माध्यमातून लोकप्रियता प्राप्त केलेल्या भगवंतसिंग मान या नकलाकाराला आपलेसे करून घेण्याचा मोह ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनाही झाला यात नवल नाही. फार तर एरवी उच्च नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या केजरीवालांचे पायदेखील मातीचेच असल्याचे म्हणता येईल इतकेच. तर ‘आप’कृत मान यांना केजरीवालांनी लोकसभा निवडणुकीत पंजाबातून उभे केले आणि मतदारांनी त्यांना निवडूनही दिले. आपचे जे चार सदस्य लोकसभेत दाखल झाले, त्यांच्यातीलच एक म्हणजे भगवंत मान. त्यांचे लोकसभेत अधूनमधून दिसणारे सादरीकरण पाहता त्यांना त्या श्रेष्ठ सभागृहात कोणी गांभीर्याने घेत असेल असे वाटत नाही. त्यातच मध्यंतरी त्यांच्याच पक्षाच्या लोकसभेतील एका दुसऱ्या सदस्याने भगवंत मान थेट सभागृहात अपेय पान करून येतात अशीदेखील तक्रार केली होती. त्यावरून त्यांचा एकूण पोतदेखील लक्षात यायला हरकत नाही. परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले. आपल्या निवासस्थानापासून तोे थेट संसदेत प्रवेश करण्यापर्यंतच्या प्रवासाचे बारा मिनिटांचे चित्रीकरण त्यांनी केले आणि आपल्या फेसबुकवरील खात्यावर टाकले. चित्रीकरण करीत असताना संसदेच्या आवारातील सुरक्षारक्षकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला पण खासदारकीच्या गुर्मीत त्यांनी या रक्षकांनाही जुमानले नाही. संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यापासून तेथील सुरक्षा व्यवस्थेत अनेक काटेकोर बदल करण्यात आल्याचे सांगितले जाते. पण ते नेमके काय आहेत याबाबत रास्तपणे गोपनीयता पाळली जाते. परंतु मान यांनी त्या गोपनीयतेचेच चक्क वाभाडे काढले. लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली तेव्हा मान यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण एरवी मात्र आपल्या कृतीचे समर्थनच करीत राहिले. दरम्यान, भाजपाच्या काही सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाच्या प्रस्तावाची नोटीस दिली असून, चालू आठवड्यात त्या बाबतीत जे काही व्हायचे ते होईल. परंतु यातील आश्चर्याची आणि खेदाची बाब म्हणजे केजरीवाल यांनाही यात काही गैर वाटलेले नाही.

Web Title: Oh no god of honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.