आजचा अग्रलेख: ओमायक्रॉन नावाचा लांडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:27 AM2021-12-24T07:27:02+5:302021-12-24T07:47:46+5:30

ओमायक्रॉन हा या विषाणूचा अवतार नाताळ, नववर्ष स्वागताच्या आनंदावेळी धुमाकूळ घालायला लागला आहे.

omicron variant situation in whole world including india and its consequences | आजचा अग्रलेख: ओमायक्रॉन नावाचा लांडगा

आजचा अग्रलेख: ओमायक्रॉन नावाचा लांडगा

Next

आता आयुष्यभर कोरोना विषाणूसोबतच जगायचे आहे, याची आठवण जगभरातली माणसे उठताबसता स्वत:ला करून देत असताना ओमायक्रॉन हा या विषाणूचा अवतार नाताळ, नववर्ष स्वागताच्या आनंदावेळी धुमाकूळ घालायला लागला आहे. हा अवतार म्हणे दक्षिण आफ्रिकेतून इतरत्र पसरला व आता जवळपास शंभर देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. इंग्लंड व अमेरिकेत त्याच्या संक्रमणाची दाहकता भयंकर आहे. इंग्लंडमध्ये गेल्या चार-पाच दिवसांत रोज जवळपास एक लाख रुग्ण निष्पन्न होत आहेत तर अमेरिकेत गेल्या आठवड्यातील नव्या रुग्णांपैकी ७३ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे होते. 

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी ओमायक्रॉनबद्दल केलेले भाष्य हादरवून टाकणारे आहे. ते म्हणतात,  आयुष्य पूर्वपदावर येते आहे असे वाटत असतानाच आपण सारे भयंकर स्थितीत पोहोचत आहोत. बिल गेट्स साथरोग किंवा विषाणू संक्रमण या विषयाचे तज्ज्ञ नाहीत. तथापि, जगप्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांच्या वक्तव्याला मोठी किंमत आहे. म्हणूनच लोक चिंतित आहेत. इकडे आपल्याकडे एकशे चाळीस कोटींच्या भारतात तीनशेच्या आसपास रुग्ण हा तसा फार चिंतेचा विषय नाही. तरीदेखील डेल्टानंतरचा हा कोरोनाचा अवतार महानगरांमध्ये वेगाने वाढतोय. जगभरातून येणाऱ्या बातम्या पाहिल्यास दिसते, की ओमायक्रॉनचा धोका व दिलासा अशा दोन्ही बाजूंनी सामान्य माणसांनी काही ठोस निष्कर्ष काढावा, अशी स्पष्टता त्यात नाही. एक दिवस बातमी येते, की आधीच्या डेल्टा किंवा डेल्टा प्लस या व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनची संक्रमणाची गती कितीतरी पट अधिक आहे. दुसऱ्या दिवशी कुणी तज्ज्ञ सांगतात, असे असले तरी या व्हेरिएंटमुळे रुग्णालयात भरती होण्याची गरज कमी आहे. डेल्टापेक्षा विषाणूचा हा अवतार अधिक जीवघेणा नाही. लक्षणे नसताना रुग्ण बाधित होतात. 

जागतिक आरोग्य संघटना कधी इशारा देते तर कधी दिलासा देते. भारतातल्या संस्थादेखील अशीच संभ्रमात टाकणारी माहिती देत राहतात. मुंबईच्या महापौर, आयुक्त सज्ज असल्याचा निर्वाळा देतात तर दिल्लीचे आरोग्यमंत्री मात्र तिथल्या ओमायक्रॉन रुग्णांची आकडेवारी खरी नसल्याचा दावा करतात. ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे संकेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दिले जाताहेत. भारतात तयार झालेली एक विशिष्ट लस तर या व्हेरिएंटवर अजिबात प्रभावी नसल्याचा प्रचार सुरू आहे. त्या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या तपासून घेतलेल्या नाहीत किंवा भारतासारख्या खंडप्राय देशात अशी उलटतपासणी करणे शक्यही नाही. थोडक्यात, उलटसुलट चर्चेच्या पृष्ठभूमीवर विषाणूचा हा अवतार व त्याच्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या संस्था नागरिकांची डोकेदुखी वाढवताहेत. अशा परिस्थितीत लोकांनी करायचे तरी काय? यासंदर्भात अमेरिकेतल्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञ डॉ. लीना वेन यांनी सांगितलेलाच उपाय महत्त्वाचा ठरतो.  

नाताळमागोमाग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जणांनी सुटीवर जाण्याचे, कुटुंबासोबत काही दिवस आनंदात काढण्याचे नियोजन केलेले असते, ते रद्द करायचे का, असा प्रश्न पडलेल्यांना वेन यांनी सल्ला दिला आहे, की तसे न करता कोरोनाप्रतिबंधक लस घ्या, अधूनमधून स्वत:ची चाचणी करून घ्या आणि सर्वांत महत्त्वाचे मास्क वापरा. वैयक्तिकरीत्या ही काळजी लोक घेतीलच. परंतु, सरकार हे संकट लोकांवर सोपवून शांत बसू शकत नाही. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी आपली आरोग्य व्यवस्था किती दुबळी आहे, ती सामान्यांच्या जीविताचे रक्षण करण्यात कुचकामी आहे, हे स्पष्ट झाले होते. 

काही तज्ज्ञ दावा करताहेत त्यानुसार येत्या साठ दिवसांत, फेब्रुवारीच्या मध्यात ओमायक्रॉनमुळे महामारीची तिसरी लाट तितक्याच तीव्रतेने आली तर याआधीच कमकुवत असलेल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे काय होणार, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. तेव्हा, त्यादृष्टीने कोरोनाबाधितांना इस्पितळापर्यंत आणणारी व्यवस्था, रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड, ऑक्सिजनची सज्जता, उपचारातील इंजेक्शन्स व औषधांचा साठा आदींचा केंद्र व राज्य सरकारने तातडीने आढावा घेण्याची आणि लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. ‘लांडगा आला रे आला’च्या हुलीने अकारण धास्तावू नये हे खरेच; पण लांडगा आलाच तर तयारीत राहिलेले उत्तम!  महामारीचा पहिल्यांदाच सामना करावा लागत असल्याने काही उणिवा राहिल्या, असा बचाव आता यावेळी तरी सरकारी यंत्रणेच्या मदतीला येणार नाही.
 

Web Title: omicron variant situation in whole world including india and its consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.