सर्व्हेवर की सट्ट्यावर; भरोसा कुणावर ठेवावा?
By किरण अग्रवाल | Published: June 2, 2024 12:06 PM2024-06-02T12:06:53+5:302024-06-02T12:07:03+5:30
Loksabha Election 2024 : आगामी निवडणुकांसाठी कोणती वाट धरावी याकरिता दिशादर्शक ठरेल हा निकाल
- किरण अग्रवाल
विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लढताना कोणता झेंडा हाती घ्यायचा, यादृष्टीने लोकसभा निवडणुकीचे निकाल पथदर्शक ठरणारे असतील; म्हणूनच राजकीय संबंधितांना त्याबाबतची अधिक उत्सुकता असणे स्वाभाविक आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या ४८ तासांवर येऊन ठेपल्याने ‘एक्झिट पोल’चे सर्व्हे व सट्टा बाजारही जोरात आहे; पण नेमका भरोसा कुणावर ठेवावा, हाच खरा प्रश्न आहे; कारण प्रत्येकाचेच अंदाज अगर आडाखे वेगवेगळे आहेत. अर्थात या निकालाची उत्सुकता अधिकतर त्याच लोकांना आहे, ज्यांना यापुढील अन्य निवडणुकांना सामोरे जायचे आहे. ते जाताना आपली वाट नेमकी कोणती असावी, या दृष्टिकोनातून ही उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सातव्या व अखेरच्या टप्प्यातले मतदान काल आटोपले असून, आता दोन दिवसांनी निकाल हाती येतील. हे निकाल काय असू शकतात याबाबतचे विविध अंदाज सर्व्हेच्या माध्यमातून वर्तविण्यात आले असून, काही जण सट्टा बाजाराचा कल पडताळत आहेत; पण या दोन्ही बाबींत फारशी एकवाक्यता आढळताना दिसत नाही. अर्थात, यासंबंधी अधिक सारस्य आहे ते राजकीय परिघातील लोकांना, कारण यानंतर होऊ घातलेल्या विविध निवडणुकांसाठी कोणती वाट धरावी, यासाठी हा निकाल दिशादर्शक ठरणार आहे.
यंदाच्या निवडणुकीची स्थिती गेल्या दोनवेळेसारखी नव्हती हे नक्की. आपल्या राज्यापुरतेच बोलायचे झाले तर शिवसेना व राष्ट्रवादीतील दुभंगामुळे त्या-त्या एकीकृत पक्षात काम केलेल्यांची मोठी अडचण झाली. बरे, यंदा निवडणूक प्रचार असा काही टोकदार झाला की, अनेकांना एकमेकांसमोर जाणे मुश्किलीचे झाले. लोकसभा मतदारसंघाचा परीघ मोठा असतो; पण यापुढील विधानसभा व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढायच्या तर सर्वांच्याच सहकार्याचे दरवाजे उघडे असू द्यावे लागतात; मात्र लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांनी ते स्वतःहून बंद करून घेतल्यासारखे झाले.
महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील निकालात भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख पक्ष्यांच्या वर्चस्वाचा फैसला तर होणार आहेच; पण त्याखेरीज शिवसेना व राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या मातब्बरीचाही निकाल लागणार असल्याने लोकसभेनंतर पक्ष बदलांचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिकीट मिळवून निवडून यायचे तर त्यादृष्टीने हे गरजेचे ठरेल.
या आगामी निवडणुकांच्या मांडवाखालून जाऊ इच्छीणाऱ्यांच्या तिकिटांचे मार्ग लोकसभेसाठी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात, जि.प. गटात किंवा महापालिका वॉर्डात मतांचे गणित काय राहिले, यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळेच संबंधितांना या निकालाची अधिक उत्सुकता आहे.
साधारण मतदारांना उत्सुकता असेल तर ती याचीच की, विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचार सभांमध्ये जी वारेमाप आश्वासने देऊन ठेवली आहेत, ती खरेच पाळली जाणार का, याची. शेतकरी असोत, की महिला वा बेरोजगार तरुण; यांच्या बँक खात्यात सांगितले गेले त्याप्रमाणे खरेच पैसे पडणार का? कारण या घटकाला देशाच्या ‘जीडीपी’शी घेणे नाही, त्यांचे जगण्याचे प्रश्नच वेगळे आहेत; पण त्याबद्दल या निवडणुकीत फारसे बोललेच गेले नाही. या प्रश्नांबद्दल राजकारण्यांनाही फारसे काही वाटेनासे झाले आहे आणि याची जाणीव मतदारांनाही झाल्यानेच की काय, यंदा लोकसभेसाठी मतदानाचा टक्का घटलेला दिसून आला.
सारांशात, राज्यातील राजकीय वाटचालीची दिशा या निकालातून स्पष्ट होणार आहे. शिवाय, सर्व्हेतून दाखविला जाणारा निकाल खरा ठरो की सट्टा; गुलाल कुणीही उधळो, प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांचा विसर निवडून येणाऱ्यांना पडू नये म्हणजे झाले.