पुन्हा एकदा 'भाऊ विरुद्ध भाऊ' सामना; पण ही नुरा कुस्ती तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 09:18 PM2020-07-18T21:18:04+5:302020-07-18T21:19:15+5:30

नाथाभाऊ विरुद्ध गुलाबभाऊ असा सामना यापूर्वी झाला आहे. जाहीर टीकेपाठोपाठ न्यायालयीन लढाईदेखील झाली. आता गिरीशभाऊ विरुद्ध गुलाबभाऊ असा सामना सुरू झाला आहे. ही नुरा कुस्ती तर नाही, हा प्रश्नही आहेच.

Once again, a brother-in-law match against Hybhau | पुन्हा एकदा 'भाऊ विरुद्ध भाऊ' सामना; पण ही नुरा कुस्ती तर नाही ना?

पुन्हा एकदा 'भाऊ विरुद्ध भाऊ' सामना; पण ही नुरा कुस्ती तर नाही ना?

Next
ठळक मुद्दे सेनेच्या गुलाबरावांनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांना दिले आव्हानमहाजनांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्यावर जाहीरपणे सवाल उपस्थितमहाविकास आघाडीचे एकमेव लक्ष्य ठरत आहे गिरीश महाजन

- मिलिंद कुलकर्णी

नाथाभाऊ विरुद्ध गुलाबभाऊ असा सामना यापूर्वी झाला आहे. जाहीर टीकेपाठोपाठ न्यायालयीन लढाईदेखील झाली. आता गिरीशभाऊ विरुद्ध गुलाबभाऊ असा सामना सुरू झाला आहे. ही नुरा कुस्ती तर नाही, हा प्रश्नही आहेच.

जिल्हा प्रशासनावर प्रभाव कुणाचा?

यासंबंधी देखील चर्चा सुरू असते. मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यापैकी कुणाच्या सूचनेवर प्रशासन निर्णय घेत आहे, याविषयी मतमतांतरे आहेत. एनएसयुआय या काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीने महाजनांच्या सूचनांना महत्त्व देऊ नये, असे जाहीर आवाहन केले. तर गुलाबरावांनी महाजनांच्या आरोग्यक्षेत्रातील कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले .

भाजप - शिवसेना युतीच्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गिरीश महाजन व गुलाबराव पाटील या दोन नेत्यांमध्ये संघर्षाचा अध्याय लिहिला जाईल, असे चित्र राजकीय पटलावर निर्माण झाले आहे. त्याला अनेक कारणेदेखील आहेत. गुलाबराव पाटील हा लढवय्या शिवसैनिक आहे. मुरब्बी राजकारण्यांसारखे खोटे बोलणे, वेळ मारुन नेणे, निर्णय न घेणे असे काही त्यांना जमत नाही. परिणामांची चिंता न करता ते मुलुख मैदान तोफेतून गोळे डागत असतात. कधी ते कामचुकार प्रशासनावर असतात तर कधी प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांवर असतात. गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांना उशिरा, तेही राज्यमंत्रीपद मिळाले होते. त्यावर ते फारसे समाधानी नव्हते. 'चिडी मारण्याची बंदूक' देऊन प्रभावी कामगिरीची अपेक्षा कशी करता ही त्यांची व्यथा असायची. याउलट युतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपने गिरीश महाजन यांना जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण अशी प्रभावशाली, वजनदार कॅबिनेट खाती दिली होती. पालकमंत्रीपद खडसे, फुंडकर यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे दीर्घकाळ राहिले. शेवटच्या टप्प्यात महाजनांना ते मिळाले. त्यामुळे गुलाबराव यांना जिल्ह्यात दुय्यम भूमिका मिळाली. हा सल त्यांच्या मनात राहिला.

गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यात साम्यस्थळेदेखील बरेच आहेत. दोघांची पार्श्वभूमी ग्रामीण आहे. तरुण वयात दोघेही राजकीय क्षेत्रात आले. कमालीचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वच पक्षात मित्र असले तरी पक्षावर देवासारखी श्रध्दा असा त्यांचा लौकिक आहे. शून्यातून पुढे आल्याने दीनदुबळे, सामान्य माणसांची जाणीव आहे. लोकांमध्ये मिसळणे, कामे करणे यात हातोटी असल्याने जनतेची गर्दी त्यांच्याभोवती कायम आहे. गुलाबरावांची स्वत:ची टपरी होती, तर महाजन हे टपरीवर उभे राहून जनसंपर्क साधत. दोघांमध्ये सख्य चांगले आहे. अधूनमधून होणारे वाद हे 'नुरा कुस्ती'सारखे असतात असे सांगणारी मंडळीदेखील आहे. त्याला कारण असे की, त्यांचे जिवलग मित्र, सल्लागार हे काही प्रमाणात सारखे आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोघांमधील संबंध ताणले गेले, त्याला कारण दोघांची पक्षीय भूमिका असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.

महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेच्या मदतीने पक्षविस्तार केला असला तरी जळगाव जिल्ह्यात तसे झालेले नाही. जळगावात ३० वर्षांपासून भाजपच क्रमांक एकचा पक्ष राहिलेला आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत भाजपने सेनेला, किंवा त्यांच्या काही नेत्यांना सोबत घेतले नाही, हा अलिकडचा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीत सगळ्या ११ जागा जिंकण्याचे भाजपचे मनसुबे लपून राहिलेले नाही. अमोल शिंदे (पाचोरा), प्रभाकर सोनवणे (चोपडा), चंद्रशेखर अत्तरदे (जळगाव ग्रामीण), गोविंद शिरोळे (एरंडोल) हे भाजपचे बंडखोर सेनेच्या उमेदवारांविरुध्द उभे राहिले. त्यांना महाजन यांच्याकडून बळ दिले जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभेत गुलाबरावांनी उघडपणे संताप व्यक्त केला होता. महाजनांची ही कृती सेनेच्या पक्षश्रेष्ठी, संपर्कप्रमुख यांनाही खटकल्याने सेनेच्यादृष्टीने महाजन हे क्रमांक एकचे शत्रू झाले आहेत. युती तोडल्याची घोषणा करणारे खडसे यांच्याऐवजी महाजन हे सेनेच्या निशाण्यावर आले आहेत. स्वाभाविकपणे गुलाबरावांची भूमिका पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत अशीच राहणार आहे. त्यांना स्वत:ला विधानसभा निवडणुकीत त्रास झाला, पालकमंत्रिपदाच्या सहा महिन्यांच्या काळात महाजन त्यांच्यावर कुरघोडी करीत असल्याचे चित्र निर्माण झाले. कोरोना काळात अमळनेर, पाचोरा याठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, जळगावात कोरोना रुग्णालयाची पाहणी करणे अशा गोष्टींमधून महाजन समांतर व्यवस्था तयार करीत असल्याचे आणि प्रशासन त्यांच्या सूचनांवर अंमल करीत असल्याची टीका होऊ लागली. एनएसयुआयने तर जाहीरपणे ही टीका केली.

अखेर गुलाबरावांनीही महाजन यांची महा आरोग्य शिबिरे, आरोग्यदूत यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत आरोग्य क्षेत्रातील कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिकडे जामनेरातून महाजनांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी संजय गरुड यांनीही जी.एम. रुग्णालय अधिग्रहणाची मागणी करून महाजनांना पेचात पकडले आहे. रिलायन्सच्या मदतीने उभारलेले दोन कोटींचे जामनेरातील रुग्णालय, जळगावातील नानीबाई मनपा रुग्णालयातील प्रयोगशाळा याविषयी महाजन घोषणा करीत असले तरी कोरोना काळात ते सुरू झालेले नाही. त्यामुळे टीकेची धार टोकदार होत असताना महाजन काय भूमिका घेतात, यावर पुढील द्वंद्व कसे असेल याची दिशा निश्चित होईल.

Web Title: Once again, a brother-in-law match against Hybhau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.