एका क्लिकवर सवारी
By Admin | Published: July 3, 2016 02:43 AM2016-07-03T02:43:45+5:302016-07-03T02:43:45+5:30
पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या एका कॉन्फरन्सला गेलेले दोन मित्र, ट्रॅव्हिस कलनीक आणि गॅरेट कॅम्प हे टेक्नॉलॉजी विषयातील भविष्याबद्दल एकमेकांशी चर्चा करत होते. पॅरिससारख्या
- कुणाल गडहिरे
पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या एका कॉन्फरन्सला गेलेले दोन मित्र, ट्रॅव्हिस कलनीक आणि गॅरेट कॅम्प हे टेक्नॉलॉजी विषयातील भविष्याबद्दल एकमेकांशी चर्चा करत होते. पॅरिससारख्या ठिकाणी भर पावसात हातात सामानाची बॅग घेऊन रस्त्यावरती उभं राहून टॅक्सी शोधणं म्हणजे अगदी वैताग, यावर दोघांचंही एकमत होतं. आणि ही समस्या जगाच्या पाठीवर सगळ्यांनाच आहे या जाणिवेतून ट्रॅव्हिस आणि गॅरेट या दोघांच्या कल्पनेतून सध्या मोबाइलच्या क्लिकवर जगाच्या पाठीवर कोणत्याही शहरात टॅक्सी पुरविण्याची जलद सुविधा देणाऱ्या यूबर या स्टार्ट अपचा जन्म झाला.
जानेवारी २०१०मध्ये सॅन फ्रान्सिस्को शहरात फक्त ३ टॅक्सींपासून उबरने आपल्या सेवेला प्रत्यक्ष सुरुवात केली. सुरुवातीला अगदी निवडक ग्राहकवर्गासाठी असलेली सेवा ही लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आवडत होती. पारंपरिक पद्धतीच्या सार्वजनिक अथवा खाजगी वाहतुकीच्या मर्यादा आणि सुमार सेवेला वैतागलेल्या प्रवाशांना एका क्लिकवर मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून टॅक्सी मिळवण्याचा हा पर्याय जास्त सोईस्कर ठरत होता. याशिवाय प्रवासासाठी आकारण्यात येणारे दर हे आधीच कळत असल्याने आणि पारदर्शकतेमुळे उबर वेगाने लोकप्रिय बनत होती. ग्राहकांना आपली सेवा आणखी चांगल्या प्रकारे वापरता यावी यासाठी अनेक आकर्षक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या होत्या. यामुळेच नागरिकांना उबरच्या स्वरूपात अवघ्या काही वर्षांतच सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील विस्कळीत आणि मनमानी व्यवस्थेला उत्तम पारदर्शक पर्याय मिळाला. एकीकडे जास्तीतजास्त ग्राहक मिळवताना उबरने आपला बिझनेस वेगाने वाढविण्यासाठी ज्या योजनांचा वापर केला त्या कोणत्याही स्टार्ट अप्ससाठी आदर्शच आहेत.
अगदी सुरुवातीपासून उबरला पारंपरिक वाहतूक क्षेत्रातील प्रस्थापितांचा कडवा विरोध सहन करावा लागला. अमेरिकेसहित अनेक देशांत प्रस्थापित वाहतूक व्यावसायिकांनी उबरमुळे समान रोजगार संधी मिळत नसल्याचे दावे करत रस्त्यावर उतरण्यापासून कायदेशीर मार्गानी उबरला आपल्या शहरात बंद करण्याचा प्रयत्न केला. काही वेळा उबरच्या वाहनचालकांमुळे प्रवाशांना वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागल्याच्या घटना घडल्या होत्या. उबरच्या काही वाहनचालकांकडून घडलेल्या घटनांना प्रसारमाध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिल्याने उबरचा प्रवास सुरक्षित नसल्याचे दावे करत उबरला बंद पाडण्याचे प्रयत्न झाले होते. आणि यासारख्या गंभीर प्रश्नांचा तितक्याच गांभीर्याने अभ्यास करत उबरने वाहन चालकाची नेमणूक करण्यापासून प्रवास करत असताना जी पी एस प्रणालीचा वापर अशा अनेक बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास आणि वापर करत एखादी अनुचित घटना घडणार नाही याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. उबरला आलेल्या या समस्येतून एकूणच जगभरातील ‘आॅन डिमांड सर्व्हिस’ या प्रकारातील स्टार्ट अप्सनी शहाणपणाचे धडे घेतले आणि आपल्या सेवेत योग्य ते बदल केले. ज्या कर्मचाऱ्यांकडून स्टार्ट अप्स कोणत्याही प्रकारची सेवा ग्राहकांना पुरवतात, तेव्हा प्रत्यक्ष सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी काटेकोरपणे तपासणे, सेवेबद्दल कर्मचाऱ्यांना ग्राहकांकडून रेटिंग देणे आणि उत्तम सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्तीचा मोबदला देणे अशा अनेक संकल्पना उबरमुळे सगळेच स्टार्ट अप्स राबवायला लागले.
उबरकडून स्टार्ट अप्सला शिकण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे, सर्वोत्तम जाहिरात म्हणजे तुमच्या ग्राहकांकडून होणारा सकारात्मक प्रतिसाद ही होय. जगभरात आपलं साम्राज्य उभं करणाऱ्या या कंपनीने सुरुवातीपासून थेट जाहिरातींवर खर्च केला नाही. त्यांनी जाहिरातीचा सगळा पैसा हा ग्राहकांना उत्तम सेवा व अनुभव देण्यासाठी आणि विद्यमान ग्राहकांमार्फत आपल्या सेवेचा सकारात्मक प्रचार करून नवीन ग्राहक मिळविण्यासाठी खर्च केला. विद्यमान ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक आल्यास उबर दोघांनाही आपली सेवा ठरावीक योजनेनुसार पूर्णपणे मोफत वापरण्यास देत होती. यासारख्या कल्पक योजनांमुळे उबरला जाहिरातींवर थेट खर्च ना करता मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळविणे शक्य झाले. एकीकडे जगभरात व्यवसाय करीत असताना गरज असेल तेव्हा सेवा पुरविणे (आॅन डिमांड सर्व्हिस) हा स्टार्ट अप्सचा नवीन प्रकार स्टार्ट अप जगतात रुजायला सुरुवात झाली. स्टार्ट अप व्यवसायाच्या या प्रकाराला आज ‘उबर फॉर एक्स’ असेदेखील म्हटले जाते. आज जगाच्या पाठीवर उबरच्या या बिझनेस मॉडेलला केंद्रस्थानी ठेवून मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून प्लम्बिंग, सुतारकाम, मेक अप, विविध वस्तूंची डिलिव्हरी करणे यांसारखे सेवा देणारी अनेक स्टार्ट अप्स जगभरात सुरू झाली आहेत.
बदलत्या काळानुसार आपल्या सेवेत अनेक बदल करणाऱ्या उबरने आत्ता आणखी वेगवेगळ्या सेवा पुरवायला सुरुवात केली आहे. उबर आत्ता फक्त टॅक्सी अथवा वाहनचालक यांची सेवा पुरविण्यासोबत स्थानिक दुकानदारांना त्यांच्या उत्पादनाची ग्राहकांच्या घरी डिलिव्हरी करण्यासाठीसुद्धा मदत करत आहे.
भारतात उबर २६हून जास्त शहरांत कार्यरत असून, टॅक्सी आणि खाजगी वाहनांच्या सेवेसोबत उबरने आत्ता काही ठिकाणी आॅटोरिक्षासुद्धा आपल्या सेवेत समाविष्ट केल्या आहेत. २०१० साली सुरू झालेली उबर अवघ्या पाच वर्षांत आज जगभरातील ७० देशांमधील ४००हून अधिक शहरांत पोहोचली आहे.