पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो; पण सुडाची आग विझत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 07:03 AM2023-01-26T07:03:59+5:302023-01-26T07:04:36+5:30

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो. काबाडकष्ट करून पोट भरता येते. मैलोनमैल पायपीट करावी लागते, तेव्हा कुठे भाकरीचा चंद्र दिसतो.

One family 7 dead bodies and a sinister conspiracy in pune | पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो; पण सुडाची आग विझत नाही!

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो; पण सुडाची आग विझत नाही!

Next

पोटाची आग भडकलेली असेल, तर त्यावर मार्ग निघतो. काबाडकष्ट करून पोट भरता येते. मैलोनमैल पायपीट करावी लागते, तेव्हा कुठे भाकरीचा चंद्र दिसतो. हे वेदनादायक असतेच, पण अपरिहार्य असते आणि आवाक्यातही. मात्र, पोटाच्या आगीपेक्षा सुडाची आग अधिक भयंकर असते. ती विझत नाही. उलटपक्षी वाढत जाते. अंतिमतः ती सर्वनाश करते. ज्यांचा बदला घेतला जातो, त्यांचा तर नाश होतोच, पण ज्याच्या मनात ही आग पेटते, तोही त्यातच भस्मसात होतो. सुडाच्या या आगीत अनेक साम्राज्ये संपली. राजे-महाराजे संपले.

कित्येक महाल जमीनदोस्त झाले. या आगीतून झोपड्याही सुटत नाहीत. फाटकी, कंगाल आणि उपाशीपोटी झोपणारी माणसंही या आगीत संपून जातात. नाहीतर, पारगावमध्ये असे भयंकर हत्याकांड कशाला घडले असते? ज्या दोन कुटुंबांच्या कलहातून या हत्या झाल्या, ती दोन्ही कुटुंबं काबाडकष्ट करणारी. एकमेकांच्या नात्यातली. हातावरचं पोट. भटकंती करत जगणारी; पण याच सुडाच्या भावनेनं घात केला आणि एक कुटुंब संपून गेलं. दुसरं कुटुंब आता तुरुंगात चाललं. पुणे जिल्ह्यातल्या दौंडजवळच्या पारगावात घडलेल्या या घटनेने सगळेच हादरले आणि हळहळलेही. गेले आठवडाभर हे सुरू होते. संथ वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात एक मृतदेह सापडल्याने गावकरी भयभीत झाले. पंचक्रोशीत या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. ही बातमी आजूबाजूला पोहोचत नाही, तोवर आणखी मृतदेह सापडले. असे सात मृतदेह आठवडाभरात सापडले तरीही ठावठिकाणा समजत नव्हता.

तीन चिमुरड्यांचे मृतदेह दिसल्याने महाराष्ट्र हादरला. नंतर मृतांची ओळख पटली. सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले. आत्महत्या असल्याचा आधी संशय होता. अखेरीस हे हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले. जे आरोपी आहेत, ते एकाच कुटुंबातील. त्यात स्त्री-पुरुष आहेत. ज्यांचे मृत्यू झाले, तेही एकाच कुटुंबातील. त्यात महिला, पुरुष, बालके आहेत. चार चुलत भावांनीच कुटुंब प्रमुखासह सातजणांची हत्या केल्याचे आता समोर आले आहे. मृत मोहन पवार आणि कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा अपघात करून त्याचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला होता. त्याचा बदला म्हणून हे अख्खे खानदान संपविण्याचे त्याने ठरवले. त्याने इतर तीन भावांसह पवार कुटुंबातील सातजणांची हत्या केली. नंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकले, असे तपासात समोर आले. या घटनाक्रमाने चक्रावलेल्या पोलिसांनी अगदी अल्पावधीत या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपींना अटकही केली.

शेवटी ‘परफेक्ट क्राइम’ असे काही नसते. आरोपींनी मोठ्या चलाखीने सगळे खून करून भीमा नदीपात्रात मृतदेह फेकून दिले होते. सगळे पुरावे नष्ट केले होते; पण मृतदेहही बोलतात, हे त्यांना ठाऊक नसावे. अखेरीस छडा लागला. पाच आरोपींना अटक झाली. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासामुळे पोलिस दलाची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. आज प्रजासत्ताक दिनी कर्तबगार पोलिस अधिकाऱ्यांचे सन्मान होत असताना, हे आणखी आश्वासक आहे. गुन्हेगार एवढ्या लवकर सापडले आणि अशा त्वरेने गजाआड गेले, तर ‘कायद्याच्या राज्या’वरचा लोकांचा विश्वास वाढेल. पण, मूळ मुद्दा वेगळाच आहे.

सूड, बदला, विश्वासघात यांनी माणसाचे एवढे नुकसान करूनही त्या वाटेने माणसे का जातात? समूळ कुटुंब संपवायचे; वंशाला दिवाही उरता कामा नये, अशा अमानुष हेतूने चिमुरड्यांनाही कशी संपवू शकतात? प्रेमाऐवजी द्वेष आणि विखाराची भाषा माणसं कुठून शिकतात? मोठ्यांच्या या वादात तीन चिमुरड्यांनी जीव गमावला, त्याचे काय करायचे?  त्यांचा अपराध असा कोणता होता की त्यांना ही शिक्षा मिळाली? माणूस प्रगत झाला. आधुनिक झाला. त्याने सगळ्या जगावर विजय मिळवला. अन्नसाखळीत अगदी खालच्या टप्प्यावर असणारा माणूस नावाचा प्राणी शीर्षस्थानावर आला. याचे कारण केवळ त्याची बुद्धिमत्ता नाही.

संवाद, सामोपचार, सौहार्द, सकारात्मकता हेही त्याचे मुख्य कारण आहे. माणूस आधुनिक झाला; पण तो ‘माणूस’च उरला नाही तर? सुडाची आग सगळे संपवते, पण ती विझत नाही, हेच त्याला समजले नाही तर? द्वेष आणि विसंवादाने दोन कुटुंबांचा बळी कसा घेतला, ते पारगाव हत्याकांडाने समजले असेल, तर प्रेम आणि सुसंवादाचा रस्ताच खरा, हे पटायला हरकत नाही. संथ वाहणारी भीमा कसलीच खंत करत नसली, तरी एवढे गुपित मात्र ती नक्कीच सांगते आहे!

Web Title: One family 7 dead bodies and a sinister conspiracy in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.