मलालाचे शंभर भाऊ

By admin | Published: December 17, 2014 12:28 AM2014-12-17T00:28:20+5:302014-12-17T00:28:20+5:30

दहशतवादाला धर्म नसतो असे नेहमीच म्हटले जाते; पण ते तेवढेच खरे नसावे. दहशतीला मन, बुद्धी वा आत्मा यातलेही काही नसते.

One hundred brothers of Malala | मलालाचे शंभर भाऊ

मलालाचे शंभर भाऊ

Next

दहशतवादाला धर्म नसतो असे नेहमीच म्हटले जाते; पण ते तेवढेच खरे नसावे. दहशतीला मन, बुद्धी वा आत्मा यातलेही काही नसते. पाकिस्तानच्या पेशावर परिसरातील एका शाळेवर हल्ला चढवून तेथील तालिबानी दहशतखोरांनी केलेली शंभरावर मुलांची हत्या हा याच क्रौर्याचा पुरावा आहे. शाळेत शिकायला आलेल्या निष्पाप आणि निरागस मुलांवर आपल्या दहशती बंदुका चालवून त्यांचे बळी घेणाऱ्या या दहशतखोरांना मन वा आत्मा असेल असे तरी कसे म्हणायचे? ‘तुमच्या लष्कराने आमच्या कुटुंबीयांवर हल्ले केले म्हणून आम्ही ही मुले मारली’ हे आपल्या कृत्याचे तालिबान्यांनी पुढे केलेले समर्थन जेवढे दुष्ट आणि संतापजनक तेवढेच ते अविश्वसनीयही आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानी लष्कराने तालिबानांविरुद्धचा आपला लढा तीव्र केला असून, त्यात अनेक दहशतखोर ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या लष्कराला तोंड देणे वा त्याचा सामना करणे अशक्य झाल्यामुळेच तालिबान्यांनी या मुलांना आपले लक्ष्य बनविले हे यातले वास्तव आहे. अफगाणिस्तानकडून होणारी कोंडी आणि पाकिस्तानच्या लष्कराची चढाई यांच्यात अडकलेल्या तालिबान्यांजवळ आपली दहशत वाढविण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. शंभरावर मुलांची हत्या करून त्यांनी नेमके तेच लक्ष्य साधले आहे. मुले नि:शस्त्र होती आणि त्यांच्या हातात पुस्तकांच्या दप्तरांखेरीज काही नव्हते. अशा नि:शस्त्र मुलांना आपल्या गोळ्यांचे लक्ष्य बनविण्यात पराक्रम नव्हता आणि साहसही नव्हते. तो एक भ्याड हल्ला होता. साऱ्या जगाने त्याची तशीच निंदा केली आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबंध कितीही ताणलेले असले, तरी भारत सरकारनेही या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. सारे पाकिस्तान या हल्ल्याने हादरले असून, त्याने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्या देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पेशावरला जाऊन त्या दुर्दैवी घटनेच्या स्थळाला भेट दिली व त्यात बळी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले. या प्रकारातून त्यांच्या सरकारची तालिबानविरोधी कारवाई आणखी तीव्र होईल यात शंका नाही. तशी ती झालीही पाहिजे. तालिबानांना संस्कृतीची पर्वा नाही. पेशावरनजीक शेकडो वर्षे उभ्या असलेल्या बामियान बुद्धांच्या दोन मूर्ती त्यावर तोफा डागून त्यांनी उद्ध्वस्त केल्या. त्यांना शिक्षणाविषयी आस्था नाही. ‘मला शिकायचे आहे’ असे निर्धाराने म्हणणाऱ्या मलाला युसूफजाई या मुलीच्या मेंदूत त्यांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतरही आपला निर्धार कायम राखणाऱ्या त्या शूर मुलीने शिक्षण जारी ठेवले, तेव्हा तिला नोबेल पारितोषिक देऊन जगानेच तिचा सन्मान केला. आपल्या पुरस्काराची रक्कम आपल्या गावात अद्ययावत शाळा उभारण्यासाठी आपण खर्ची घालू, असे उद््गार तिने पुरस्कार स्वीकारताना काढले. तालिबान्यांची आताची कारवाई हे मलालाच्या त्या धाडसाला दिलेले भित्रे उत्तर आहे. पुरोगामी मार्गावर टाकलेले प्रत्येकच पाऊल अडवून धरणे ही सगळ्या परंपरावाद्यांची मानसिकता आहे. मलालावरचा तालिबान्यांचा राग जुना आहे आणि कधीतरी तिला धडा शिकवू ही त्यांची भाषाही जुनीच आहे. शिकणारा प्रत्येक मुलगा हा माझा भाऊ आहे, प्रत्येक मुलगी ही माझी बहीण आहे, असे मलाला आपल्या भाषणात म्हणाली. तालिबान्यांनी तिचे शंभरावर भाऊ आता मारले आहेत. जगभरच्या सगळ्या कर्मठ परंपरावाद्यांची आणि धर्मांधांची क्रूर मानसिकता पुन्हा एकवार या घटनेने जगासमोर आणली आहे. ही मानसिकता केवळ तालिबान्यांमध्येच आहे असे नाही. अल कायदात ती आहे, बोको हराममध्ये आहे, मार्टिन ल्युथर किंगवर गोळ्या झाडणाऱ्यात ती होती आणि गांधीजींचा बळी घेणाऱ्यांची मानसिकताही याहून वेगळी नव्हती. अशा वृत्तीला आळा घालायला जगाला माणुसकीचाच आधार घ्यावा लागणार. दु:ख याचे की माणुसकी वा मनुष्यधर्म एकाएकी रुजविता येत नाही आणि त्याचा संस्कारही दीर्घकालीन म्हणावा असा असतो. त्यातून तालिबान्यांसारखी माणसे या संस्काराचा उच्छाद करायला सर्वत्र बसलीही आहेत. ती पाकिस्तानात आहेत, अफगाणिस्तानात आहेत, इराक व इराणमध्ये आहेत आणि भारतातही आहेत. माणसांचे बळी घेणे हा त्यांचा हातचा मळ आहे. जोवर माणुसकीचा श्रेष्ठ संस्कार त्यांना आळा घालत नाही तोवर कायदा आणि लष्कर यांच्या बळावरच तो मोडून काढावा लागणार आहे. त्यामुळेच दहशतवादाविरुद्ध साऱ्या जगाने एकत्र येऊन युद्ध छेडण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संयुक्त राष्ट्र संघटनेसमोरील भाषणात प्रतिपादन केली होती.

Web Title: One hundred brothers of Malala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.