एक तरी काश्मिरी जोडावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:53 AM2018-11-07T04:53:26+5:302018-11-07T04:53:51+5:30
काश्मीरला जीवनात एकदा तरी जावे व तेथील अद्भुत सौंदर्याचा अनुभव घ्यावा, असे स्वप्न देशातीलच नव्हे, तर जगातील बव्हंशी लोक जपतात, पण काश्मीरमधील कधी शांतता, तर कधी उद्रेकी अशी बेभरवशी परिस्थिती अनेकांना या स्वप्नापासून दूर ठेवते.
- संजय सोनवणी
(काश्मीर विषयाचे अभ्यासक)
काश्मीरला जीवनात एकदा तरी जावे व तेथील अद्भुत सौंदर्याचा अनुभव घ्यावा, असे स्वप्न देशातीलच नव्हे, तर जगातील बव्हंशी लोक जपतात, पण काश्मीरमधील कधी शांतता, तर कधी उद्रेकी अशी बेभरवशी परिस्थिती अनेकांना या स्वप्नापासून दूर ठेवते. काश्मीरबाबत येणाऱ्या बहुतेक बातम्या या दहशतवादाच्या, हिंसेच्या असल्याने, ज्यांना तेथील वास्तव स्थिती माहीत नाही, त्यांच्या मनात संपूर्ण खोरेच हिंसेच्या तांडवाखाली आहे की काय, असा समज निर्माण करते, त्यामुळे ते मग काश्मीरपासून दूर राहणेच पसंत करतात.
जम्मू-काश्मीर सरकारच्या पर्यटन विभागाने काश्मीरची स्थिती निवडक लोकांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहावी व काश्मीरबाबत जे समज निर्माण झालेत ते दूर व्हावेत, या प्रयत्नांचा भाग म्हणून नुकताच पानगळ महोत्सव आयोजित केला होता. मी तब्बल सोळा वर्षांनंतर या निमित्ताने पुन्हा काश्मीरला गेलो. श्रीनगर, पेहलगाम ते गुलमर्गलाही भेट देता आली. मधल्या काळात तेथे काय काय बदल झाले, हेही स्पष्टपणे टिपता आले व तुलनाही करता आली. आम्ही गेलो त्या दिवशीच श्रीनगरमध्ये बंदचा सामना करावा लागला. हा बंद विशेषत: दक्षिण काश्मीरमध्ये कडकडीत तर अन्य भागांत तुरळकपणे पार पडला. काही भागांत दगडफेकीच्याही बातम्या आल्या. हा बंद दुसºया दिवशीही सुरूच होता. कधी हुरियत तर कधी संयुक्त विरोध समिती हे बंद घोषित करत राहते. त्याचा परिणाम सामान्य व्यापारही ठप्प होण्यात होतो आणि अर्थजीवन अजूनच विस्कळीत होते, हे सहज लक्षात येण्यासारखे होते. या बंदच्या दरम्यान काही भागांत दगडफेकीचे प्रकार घडल्याचे कानावर येत असले, तरी आम्हाला असा प्रकार प्रत्यक्ष दिसला नाही. पर्यटकांवर तेथील अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने का होईना, पर्यटकांची सुरक्षा काश्मिरींच्या दृष्टीने महत्त्वाची असणे स्वाभाविक आहे.
या चार दिवसांच्या काळात सामान्य घोडा-खेचरवाल्यांपासून ते उच्च अधिकाºयांशी, अगदी काश्मिरी पंडितांशीही अनौपचारिक चर्चा केली. मुख्य प्रश्न हाच होता की, काश्मिरी माणसाला अखेर हवे काय आहे? काश्मीरची प्रादेशिक अर्थव्यवस्था उभारण्यात आलेले अपयश आणि काश्मिरी जनतेला वैचारिक, सांस्कृतिक व आर्थिक चळवळींपासून दूर ठेवत सारे काही राजकारणकेंद्रित बनविण्यात आल्याने काश्मीरचा प्रश्न चिघळल्याचे जाणवले़
फार कशाला, काश्मीरचा इतिहास किमान पाच हजार वर्षांचा असूनही आणि आठव्या शतकातील कर्कोटक घराण्याच्या ललितादित्य मुक्तापीड या महान सम्राटाने अरबी स्वाºयांना थोपवत इराण, तुर्कस्थान, तिबेट ते मध्य भारतापर्यंत पसरलेले विशाल साम्राज्य स्थापन केले असूनही, त्या काश्मिरी सहिष्णू परंपरेचे समग्र चित्र काश्मिरी अथवा अन्य विद्वानांना उभे करता आले नाही. येथील मुस्लिमांचीही परंपरा आहे, ती सुफी. या सुफी विचारधारेपासून आपण का आणि कसे नकळत दूर निघून गेलो, याचेही आकलन व विश्लेषण केले जात नाही. काश्मीरमध्ये आज संस्कृती व इतिहासाबद्दल आकलन नव्हे, तर केवळ सोईस्कररपणे करून घेतलेले समज आहेत आणि असे समज वर्तमान असा का आहे, हे समजून घेण्यास मदत करत नाहीत. थोडक्यात, काश्मिरी समाज हा विचार बंदिस्त झाला आहे आणि त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न देशी विद्वान व विचारवंतांनी करायला हवे होते, ते केले नाहीत.
काश्मिरी राजकारण त्याच्या पद्धतीने चालत राहील. केंद्रातील सरकारे बदलतील तशी धोरणेही बदलत राहतील, पण लष्कराची उपस्थिती आणि अस्फा कायद्याचा वापर जी अविश्वासाची परिस्थिती निर्माण करत आहे, त्यावर अत्यंत गांभीर्याने व तत्काळ मार्ग मात्र काढावाच लागेल. कोणत्याही धर्माचे असले, तरी भौगोलिक स्थितीमुळे इतरांपासून तुटलेल्या लोकांची मानसिकताही स्वकेंद्रित बनते. पूर्वोत्तर राज्यांतही स्थिती फारशी वेगळी नाही. त्यांच्याशी भावनिक नाळ जुळविणे, समजूतदार नागरिकाच्या भूमिकेत जात स्नेहबंध कसे वाढतील व हे तुटलेपण किमान तरी कसे होईल, यासाठी अन्य भागांतील नागरिकांनीही व्यक्तिगत पातळीवरही प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. किंबहुना, फुटीरतावाद्यांना तेच उत्तर आहे व त्यातच काश्मीरचे पुरातन वैभव परत मिळवित, काश्मिरी जीवन समृद्ध करण्याचा मार्ग लपलेला आहे. पर्यटकांनी चिंता करावी, काश्मीरला टाळावे, असे काहीही नाही. कोठेही जाताना जेवढी खबरदारी घ्यावी लागते ती अवश्य घ्यावी. काश्मिरी माणूस अत्यंत साधा व अगत्यशिल कसा आहे, याचा अनुभव तेथे जाऊन आलेले तुम्हाला सांगतीलच. कोणत्याही विखारी अपप्रचारांना बळी पडण्याचे कारण नाही. काश्मीरचे अलौकिक सौंदर्य पाहिलेच पाहिजे... आणि तेथील शक्यतो एका तरी माणसाशी स्नेहबंध जुळविता आले पाहिजे. स्वत:साठी निसर्गाचा आनंद लुटत असतानाच, काश्मीरची कोंडी फोडण्यात आपण एवढा तरी हातभार नक्कीच लावू शकतो!