एक होती चिमणी..एक होता कावळा !
By सचिन जवळकोटे | Published: July 11, 2021 08:55 AM2021-07-11T08:55:04+5:302021-07-11T08:55:49+5:30
लगाव बत्ती...
सोलापूरची ‘चिमणी’ तशी भलतीच हुश्शाऽऽर. तिनं आजपावेतो अनेकांना भुरळ घातलेली. अनेकांना वाकुल्याही दाखवत राहिलेली; मात्र परवा महापालिकेच्या सभेत ती फडफडून आलेली. तिची पिसं छाटण्यासाठी अनेकांचे हात आसुसलेले; मात्र तरीही तिला वाचविण्यासाठी आता काहीजण पुढं सरसावतील. राजकारणातल्या ‘काड्या’ पुन्हा फिरतील. ‘चिमणी’चं ‘घरटं’ सावरण्यासाठी या ‘काड्यां’चा नक्कीच वापर होईल. जोपर्यंत हा राजकारणरुपी ‘कावळा’ घिरट्या घालत राहील, तोपर्यंत विमान काही सोलापुरी भूमीवर उतरणार नाही. लगाव बत्ती..
‘थोरल्या काकां’नी सांगूनही पत्र थडकलंच !
सोलापूरचा इतिहास तसा खूप जुना. इथल्या तलावाला एक हजार वर्षांचा इतिहास. इथला किल्लाही शेकडो वर्षांपूर्वीचा. आता या तमाम ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत अजून एका गोष्टीची भर पडतेय. ती म्हणजे कारखान्याची चिमणी. ही चिमणी पडणार-पडणार म्हणत दुसरी पिढी जन्माला आली; मात्र ही आहे तश्शीऽऽच. नाकावर टिच्चून. अनेक जुन्या कापड गिरण्यांचे भोंगे झाले पाहता-पाहता जमीनदोस्त; मात्र या चिमणीला मिळाले कैक राजकीय दोस्त. मात्र या चिमणीसोबतची ‘दोस्ती-दुश्मनी’ कशी अन् कुठं रंगली, याचा शोध घ्यायलाच हवा. मग तर चला.. लगाव बत्ती
या चिमणीचे निर्माते ‘काडादी’. यांच्या पूर्वजांनी ‘हात’वाल्यांच्या विरोधात निवडणुका लढविल्या असल्यातरी ‘सुशीलकुमारां’सोबत यांचे घनिष्ट संबंध. मात्र ‘मोदी’ वादळात सोलापूरचीही समीकरणं बदलली. ही चिमणीही राजकीय वावटळीत सापडली. चार वर्षांपूर्वी ‘भोसले बुलडोझर’ या चिमणीच्या बुडापर्यंत पोहोचलं, तेव्हा ‘सुशीलकुमारां’नी स्पष्टपणे वास्तवाची जाणीवही करून दिलेली. पडल्यानंतरच्या नुकसानभरपाईचीही चर्चा केलेली. त्यामुळं राजकीय निराधाराच्या मानसिकतेत केवळ कोर्टबाजी करण्यातच टाईमपास झालेला.
अखेर कंटाळून ‘काडादी’ यांनी दिल्लीत ‘थोरल्या काकां’बरोबर भेट घेतली. त्यांनी मात्र थेट ‘एअरपोर्ट’वाल्यांशी कॉन्टॅक्ट केला. तिथले सिनिअर ऑफिसर एकेकाळी ‘काकां’चे सेक्रेटरी होते म्हणे. मात्र या ऑफिसरनं तोंडदेखलं ‘येसऽऽ येसऽऽ’ म्हणत प्रत्यक्षात मात्र ‘चिमणीची उंची’ कमी करण्याचंच लेटर थेट सोलापुरात पाठवून दिलं. ‘थोरल्या काकां’नी सांगूनही पाडापाडीचं प्लॅनिंग केवळ ‘कमळ’वाल्यांकडून होतंय, हे लक्षात आलं. त्याची सूत्रंही सोलापुरातूनच फिरली गेल्याचंही स्पष्ट झालं.
खरंतर ‘देशमुखां’च्या ‘विजयकुमारां’नी ‘काडादीं’च्या विरोधात भूमिका घेतल्यावर ‘देशमुखां’चे ‘सुभाषबापू’ बाजूनं राहिले, असं वातावरण पूर्वी तयार झालेलं. परंतु ‘हा संपूर्ण कारखानाच दुसऱ्या ठिकाणी हलवायला पाहिजे होता’ असं सूचक वक्तव्य स्टेजवरच ‘सुभाषबापूं’नी ‘सुशीलकुमारां’च्या साक्षीनं केलं होतं. यातच आजूबाजूच्या काही ‘साखरसम्राटां’ची मानसिकता खूप वेगळी होती. त्यांना विमानसेवेशी देणं-घेणं नव्हतं, मात्र चिमणी पाडण्याची सुरसुरी होती.
भलेही या कारखान्यानं चिमणी बेकायदेशीररित्या उभी केलेली. विस्तारीकरणासाठी प्रदूषण मंडळाच्या परवानग्या न घेतलेल्या; मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उसाची ‘काटामारी’ कधीच न झालेली. शेतकऱ्यांनी बोलून दाखविलेलं. त्यामुळे हा कारखाना डिस्टर्ब होणार असेल तर या ‘साखरसम्राटां’ना हवंच होतं.
महाभारतातल्या चक्रव्यूहात ‘अभिमन्यू’ सापडल्याचा दाखला; मात्र आधुनिक युद्धात खुद्द ‘धर्मराज’ राजकीय चक्रव्यूहात अडकलेले. एकीकडं कोर्टाचा निकाल मनासारखा न लागलेला. दुसरीकडं ‘सुशीलकुमार’ तटस्थ बनलेले. तिसरीकडे ‘थोबडे अँड टीम’ आक्रमक झालेली. अशावेळी फक्त अन् फक्त ‘बारामतीकर’च पूर्णपणे पाठीशी उभारलेले.
‘शिंदें’च्या विरोधात उभारणारहोते ‘काडादी’
दोन वर्षांपूर्वी ‘चाकोतें’च्या हेलिकॉप्टरमधून ‘भोसले कलेक्टरां’नी या चिमणीभोवती घिरट्या घातल्यानंतर कारखाना परिसरात धुराळा उडालेला. अशातच राज्यात सत्तांतरही झालेलं. हे सरकार यापुढं ‘बारामतीकर’च चालविणार, हे स्पष्ट होताच कारखान्याच्या धुरानं दिशा बदलली. नेहमी ‘जनवात्सल्य’कडं जाणारी पावलं प्रथमच ‘बारामती’कडं वळाली. ‘माढ्या’च्या ‘बबनदादां’नी अपॉईंटमेंट घेऊन दिली. त्यावेळी ‘अजितदादां’नी अद्याप कुठल्याच खात्याची सूत्रं घेतली नव्हती, तरीही त्यांनी ‘काडादीं’समोरच ‘नगरविकास’ खात्याला फोन करून ‘चिमणी’च्या ‘गॅरंटी’ची तरतूद करून ठेवली. मात्र त्याचवेळी ‘दादां’नी ‘घड्याळ’ स्थापनेनंतरच्या लोकसभा निवडणुकीचीही आठवण करून दिली. त्यावेळी ‘सुशीलकुमारां’च्या विरोधात ‘बारामतीकरां’नी ‘धर्मराजां’चं नाव फिक्स केलेलं. लिस्टमध्ये नावही टाकलेलं; मात्र शेवटच्या क्षणी यांनी ‘गंगानिवास’मध्ये फोन बंद करून ठेवलेला. त्यामुळं नाईलाजानं दुसरा उमेदवार शोधावा लागलेला. ही गोष्ट ‘काका-दादां’च्या मनाला लागलेली.मात्र आजपर्यंत ते कुणालाच न बोललेले.
आता महापालिकेच्या बोर्डात चिमणीच्या पाडकामाचा ठराव मंजूर झालाय. मात्र त्यामुळं लगेच चिमणीला धक्का लागेल, अशा भ्रामक समजुतीत राहणंही चुकीचं.. कारण इथली प्रशासकीय यंत्रणा म्हणजे कळसुत्री बाहुली. ‘नगरविकास’ खात्यातली बोटं हलतील, तशी ही यंत्रणा नाचणारी. जोपर्यंत मुंबईहून ‘पाडा’ असा मेसेज येणार नाही तोपर्यंत इथले अधिकारी चिमणी तर सोडाच, होटगी रोडकडंही ढुंकून बघणार नाहीत. विशेष म्हणजे पालिका हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांना अधिकृत करून देण्याचा अधिकारही याच खात्याकडं. त्यामुळं कदाचित दंड ठोठावून ही चिमणी केली जाऊ शकते कायदेशीर. विशेष म्हणजे पाडापाडीचा ठेका मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदारही म्हणे ‘तिकडं’ जाऊन चहा-बिही पिऊन आलेला. आलं का काही लक्षात. लगाव बत्ती..
ता.क. : केवळ ‘बारामतीकरां’च्या टेकूमुळंच या चिमणीचं धूड अद्याप टिकून. मात्र ‘काका-पुतण्यां’ची स्ट्रॅटेजी लय जबरदस्त. ते कुणालाबी कायबी उगाच मदत करत नसत्यात. त्यामुळं येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये ‘घड्याळ’वाल्यांच्या स्टेजवर ‘काडादी’ दिसले तर नवल वाटायला नको. वेळप्रसंगी ‘शिंदें’च्या टीमविरुद्ध बोलले तर आश्चर्य वाटायला नको. नाहीतरी अलीकडं त्यांनी ‘प्रणितीताईं’सोबत ‘संजयमामां’नाही कारखाना सोहळ्याला बोलाविलेलं. आयुष्यभर त्यांनी एका ‘शिंदे’ घराण्यासोबत ऋणानुबंध राखलेले. आता दुसऱ्या ‘शिंदें’सोबतही जवळीक साधलेली.. कारण थेट ‘अजितदादां’पर्यंत पोहोचण्याचा शॉर्टकट त्यांना गवसलेला.
विमानासह चिमणी..दहा ‘खोक्यां’ची मागणी
‘काडादी’ भलेही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा हॅण्डल करू शकतील. मात्र ‘हरित लवाद’ अन् ‘प्रदूषण मंडळा’चं काय ? या ठिकाणी ‘थोबडें’नी पुरविलेला पिच्छा त्यांना नक्कीच दमछाक करायला लावणारा. मात्र या दोन टेन्शनपेक्षाही मोठ्ठी गोष्ट म्हणजे इमेजची. या घराण्यानं आजपावेतो आपली प्रतिमा खूप जपलेली. मात्र निर्जीव चिमणीपायी प्रतिमेला धक्का लागत असेल तर त्यांना आत्मचिंतन करावंच लागेल. ‘सोलापूरच्या विकासाला अडथळा आणणारी भूमिका’ असं वेगळं वातावरण सोशल मीडियावर तयार केलं जातंय, ते त्यांना थांबवावचं लागेल. आजोबांनी कारखाना सुरू करून तीन तालुक्यातल्या हजारो कुटुंबांमध्ये आर्थिक सुबत्ता आणली, ही उपकाराची जाणीव जुन्या पिढीनं आजही ठेवलीय. आता स्वत:हून विमानसेवा सुरू करून त्यांच्या नातवांनी शहराला जगाशी जोडलं, हे ‘थँकफुल मेसेज’ फिरवायला आता नवी पिढीही तयार. मग त्यासाठी ही चिमणी पाडा नाही तर सोडा.
अजून दोन महत्त्वाचे मुद्दे. पहिला म्हणजे विमानसेवा सुरू व्हायलाच हवी अशी भावना सोलापूरकरांमध्ये तीव्र होत चाललीय. मात्र विकासाची मागणी लावून धरत असताना केवळ व्यक्तीद्वेषानं झपाटून जाणंही ठरू शकतं चळवळीला घातक; कारण यातून धगधगत राहतो केवळ सुडाग्नी. होत नसतो विकास. आता दुसरा मुद्दा. विमानाची मागणी करणारा सर्वसामान्य सोलापूरकर म्हणजे आपल्या मुळावर उठलेला दुश्मनच, अशीही व्हायला नको कुणाची भावना.
जाता-जाता : आदेशावर आदेश निघूनही ही चिमणी इंचभरही हलत नसेल तर कारखान्याची ताकद खूप मोठी. खरंच खूप मोठी. असं असेल तर मग चिमणी न पाडताही विमानसेवा सुरू करण्याचा चमत्कार घडवायला या ताकदीला तसं अवघड नसावं. तसा प्रयत्नही पूर्वी झालेला; मात्र ‘दिल्ली’तून म्हणे थेट ‘दहा खोक्यां’ची मागणी झालेली.
लगाव बत्ती..