आॅनलाइन मार्केट आणि आर्थिक उलाढालीमागील सत्ताकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 05:33 AM2018-11-08T05:33:45+5:302018-11-08T05:34:00+5:30
इतर देशांच्या तुलनेत आपला देश हा उत्सवप्रिय म्हणून गणला जातो. या प्रत्येक सणांना धार्मिक किनार असली, तरीही यामागे अर्थशास्त्रीय विचार असल्याचे दिसून येते.
- कौस्तुभ दरवेस
इतर देशांच्या तुलनेत आपला देश हा उत्सवप्रिय म्हणून गणला जातो. या प्रत्येक सणांना धार्मिक किनार असली, तरीही यामागे अर्थशास्त्रीय विचार असल्याचे दिसून येते. सणांच्या माध्यमातून तत्कालीन उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देणे हा सण-उत्सव साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण-उत्सवाला विशिष्ट पार्श्वभूमी असते. मात्र, आधुनिकतेबरोबरच या उत्सवांनी नवीन रूप धारण केल्याचे आपल्याला दिसत आहे. दिवाळीचे पाहा ना. दिव्यांचा सण म्हणून साजरी केली जाणारी दिवाळी आता संपूर्ण देशभर खरेदीचा सण म्हणून साजरा केला जातो. जाती-धर्माच्या भिंती ओलांडून सर्व भारतीयांना एकत्र आणणारा सण म्हणून दिवाळीकडे पहावे लागेल. सव्वाशे करोडपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशात दिवाळीसारखा लोकमान्यताप्राप्त खरेदीचा उत्सव म्हणजे व्यावसायिकांसाठी एक पर्वणीच.
आॅनलाइन वस्तू विक्री कंपन्यांच्या आगमनामुळे वस्तू विक्रीवर येणारी स्थल-कालाची बंधने सध्या गळून पडली आहेत. एखाद्या लहानशा गावातील कारागीरसुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या वस्तू जगभरातील ग्राहकांना विकू शकतो. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. बाजारावर आपला एकछत्री अंमल मिळविण्यासाठी या कंपन्या थेट उत्पादकांशी संधान साधून त्यांच्या वस्तू आपल्या वेबसाइटवर ग्राहकांसाठी स्वस्तात उपलब्ध करून देतात. पारंपरिक व्यवस्थेत उत्पादक ते ग्राहक यात एक मोठी साखळी कार्यरत असते. पारंपरिक वितरण व्यवस्थेतील याच त्रुटीचा फायदा घेऊन या ई-कॉमर्स कंपन्यांनी आपला नफा कमीतकमी ठेवून जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. याच आधारे अनेक चीनी कंपन्यांनी भारतीय बाजारात आपला जम बसविला असून, त्यांनी अनेक प्रस्थापित दिग्गज कंपन्यांना आपल्या उत्पादनांच्या किमती कमी करावयास भाग पाडल्याने ग्राहकराजा आॅनलाइन वस्तू विक्री कंपन्यावर भलताच खूश दिसतोय.
ग्राहकांना सवलती देतानाच उत्तम विक्रीपश्चात सेवा, आॅनलाइन खरेदी करताना ग्राहकाच्या वेळेची होणारी बचत, देश किंवा परदेशातील दुकानातूनसुद्धा खरेदी करता येण्याची सोय. आॅर्डर केलेल्या वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था, कॅश आॅन डिलिव्हरीचा पर्याय, मुख्य म्हणजे एखादी वस्तू पसंत न पडल्यास ती सहजपणे परतही करता येते. अशा अनेक सुविधा देत, आॅनलाइन वस्तू विक्री कंपन्या भारतीय ग्राहकाच्या खिशावर हात मारण्यात यशस्वी झाल्या आहेत.
ग्राहकांचा कल अधिकचे काय मिळते, याकडेच असतो. त्यामुळे दिवाळीच्या काळात गेल्या तीन वर्षांत आॅनलाइन खरेदीचे आकडे चक्रावून सोडणारे आहेत. इंटरनेटचा तर ग्रामीण भागात स्मार्ट फोनचा वाढता वापर या नवागत ई-व्यापार कंपन्यांचा आधार बनला आहे. २०१५ च्या मोसमात भारतीय ई-व्यापार उद्योगाची उलाढाल पाच अब्ज डॉलर्सच्या घरात होती. २०१६ पर्यंत दुपटीपेक्षा अधिक १२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. २०१७ मध्ये ही आकडेवारी आणखी वाढली. दोनेक वर्षांपूर्वी ई-व्यवसायाचा देशातील व्यापारातील हिस्सा १ टक्का होता. तो आता ३ ते ५ टक्क्यांवर गेला आहे. हीच गती राहिली, तर २०२० पर्यंत हे व्यवहार दुहेरी आकड्यांतला हिस्सा राखतील. भरभरून ग्राहकवर्ग मिळविणारे हे क्षेत्र रोजगारप्रवण व अर्थप्रवणही आहे.
भारत ही विकसित देशांसाठी मोठी बाजारपेठ आहे. ती आता ई-कॉमर्सच्या क्षेत्रात थेट खुली झाली आहे. वॉलमार्टसारख्या बड्या ई-कॉमर्स कंपनीला त्यामुळे मोठे घबाड हाती लागले आहे. भारतातील आॅनलाइन वस्तू विक्री बाजारावर कब्जा केलेल्या दोन्ही ही दिग्गज कंपन्या या परदेशी असल्याने प्रत्येक खरेदी मागे होणारा मोठा नफा आता विदेशात जाईल का, त्यामुळे देशांतर्गत व्यापारावर काय परिणाम होईल, याबद्दल परस्परविरोधी मते आहेत. सध्या तरी सर्वच आॅनलाइन वस्तू विक्री कंपन्या या मोठ्या तोट्यात आहेत. त्यांचे उद्दिष्ट हे लवकरात लवकर नफ्यात येणे नसून भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेवर आपला कब्जा करणे हेच आहे.
या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा इतिहास बघितला, तर त्यांनी केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीवर त्यांनी मोठा नफा मिळवून बाजारपेठेवर आपली सत्ता स्थापन केली आहे. म्हणजे या कंपन्या आज जरी नफा कमावित नसल्या, तरीही भविष्यात भरभक्कम नफा भारतीय बाजारातून आपल्या देशात घेऊन जाणार हे मात्र निश्चितच. तोपर्यंत तरी या कंपन्यांच्या भांडवल गुंतवणुकीचा फायदा भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेला होताना दिसत आहे. सव्वाशे कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतातील गरिबीचे प्रमाण अजूनही लोकसंख्येच्या ४० टक्क्यांच्या आसपास असताना भारतासारख्या देशात हे असले व्यवहार म्हणजे स्वप्नच आहेत आणि हा स्वप्नखरेदीचा खेळ भविष्यात उत्तरोत्तर बहरत जाणार आहे आणि आॅनलाइन वस्तू विक्री कंपन्यांना भविष्यात सुगीचे दिवस येणार हे मात्र नक्की.