‘आॅनलाइन फार्मसी’चा सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:24 AM2018-11-28T06:24:15+5:302018-11-28T06:24:17+5:30

नुकताच फार्मसी दुकानांनी आॅनलाइन फार्मसीविरोधात संप पुकारला होता.

'The online pharmacy' | ‘आॅनलाइन फार्मसी’चा सावळागोंधळ

‘आॅनलाइन फार्मसी’चा सावळागोंधळ

googlenewsNext

नुकताच फार्मसी दुकानांनी आॅनलाइन फार्मसीविरोधात संप पुकारला होता. गेल्या सहा महिन्यांत देशात अनेक आॅनलाइन फार्मसी सुरू झाल्या आहेत. आघाडीच्या सेलीब्रिटींना घेऊन याच्या जोरदार जाहिराती सुरू आहेत. तसेच नुकतेच या आॅनलाइन फार्मसीवर कशाप्रकारे भोंदू आॅनलाइन डॉक्टर तुम्हाला हवे ते प्रिस्क्रिप्शन तयार करून देतात याचे गैरप्रकार उघड झाल्याने आॅनलाइन फार्मसीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घरी आयते आणून दिलेले औषध हे रुग्णांना सोयीचे वाटत असले तरी वैद्यकीयदृष्ट्या ते जिकिरीचे ठरू शकते.


आपल्या देशात आॅनलाइन फार्मसीचे वारे शिरण्याआधी २०१४ साली अमेरिकेत याचे प्रचंड पेव फुटले होते. अमेरिकेत जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत असे दिसून आले की यावर विकली जाणारी ५० टक्के औषधे ही बनावट औषधे होती व दहा हजारपैकी ९९३८ आॅनलाइन फार्मसी अमेरिकेच्या फार्मसी नियमांचे उल्लंघन करत होते. वर लान्सेट या जगमान्य मेडिकल जर्नलमध्ये आवाज उठवल्यावर अमेरिकेत यावर नियंत्रण आणण्यात आले. बनावट औषधे आणि दुकानांच्या माध्यमातून औषध विक्रीवर अजून आपल्या देशात अन्न औषध प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण नसताना आॅनलाइन फार्मसीचा भस्मासूर अंगावर ओढून घेणे धोक्याचे ठरणार आहे. आज मानसिक आजार, लहान मुले यांची बरीच औषधे ही शेड्यूल एच औषधे आहेत. यात रुग्ण बघून प्रिस्क्रिप्शनच्या हार्ड कॉपीशिवाय देणे अवैध आहे. पण हे प्रकार आॅनलाइन फार्मसीवर सुरू झाले आहेत. सवय लागण्याची शक्यता असलेली बरीच औषधे आॅनलाइन फार्मसीवर उपलब्ध आहेत. अन्न व औषध प्रशासन अजून आॅनलाइन फार्मसीच्या धोक्यांबद्दल जागरूक नाही.


आॅनलाइन फार्मसी जर नियंत्रित असेल तर त्याचे काही फायदेही आहेत. यावर तुम्हाला त्या औषधाचे कन्टेंट काय आहे हे टाकले की त्याच्या विविध किमतींचे १० आॅप्शन्स दिसतात. हे औषधांच्या दुकानात शक्य नाही. तसेच आॅनलाइन फार्मसीवर किमतीवर तुम्हाला २५ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय घरपोच औषधे मिळण्याची सोय वेगळीच. पण आजही आपला समाज औषधसाक्षर झालेला नाही. डोकेदुखते म्हणून सहज जाऊन फार्मसिस्टला विचारून औषध घेण्याचे प्रमाण आपल्या देशात खूप आहे. तसेच औषधांमध्ये चांगल्या प्रतीचे स्वस्त औषध वापरण्यास हरकत नाही. पण आज भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेली बहुतांश औषधे निकृष्ट दर्जाची आहेत.
औषधांची खरेदी हा डॉक्टर, फार्मसिस्ट आणि रुग्ण यांच्यातील एक अत्यंत व्यक्तिगत, संवादपूर्ण आणि जिव्हाळ्याचा व्यवहार असतो.

यात डॉक्टरांकडून औषधांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन ते फार्मसिस्टने पडताळून नीट देणे आणि परत डॉक्टरांनी विकत दिलेले औषध योग्य आहे की नाही हे तपासून औषध कसे घ्यायचे हे समजावून सांगणे. नंतर एखाद्या औषधाचा त्रास झाल्यास परत डॉक्टरांकडून औषध बदलून घेणे. आॅनलाइन फार्मसी व्यवहारात कुठेतरी या संवादाला तडा जाऊ शकतो. आॅफलाइन फार्मसी खरेदीत दरवेळी हा व्यवहार होतोच असे नाही. पण त्याचा हट्ट रुग्ण व नातेवाइकांनी धरायला हवा. आजच्या डिजिटल युगात आॅनलाइन फार्मसी नकोच असे म्हणून चालणार नाही. पण त्यातील अनागोंदीही खपवून घेणे जीवावर बेतेल. आॅनलाइन फार्मसी खरेदी करताना आपण किराणा किंवा मोबाइल अशा तत्सम चैनीच्या वस्तू नव्हे तर आपल्या जगण्या-मरण्याशी थेट संबंधित काहीतरी खरेदी करतोय हे भान प्रत्येकाने ठेवावे.

- डॉ. अमोल अन्नदाते । वैद्यकीय क्षेत्राचे अभ्यासक

Web Title: 'The online pharmacy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.