केवळ नियतीचा घाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:28 AM2017-12-06T03:28:01+5:302017-12-06T03:28:13+5:30

एखादी अनपेक्षित दु:खद घटना घडली, की नियतीचा घाला असे म्हणून आपण मोकळे होतो. कधी अशा घटना मानवी प्रयत्नांद्वारे टाळता येण्यासारख्या नसतात किंवा मानवी चुकीमुळे घडलेल्या नसतात.

 Only Destiny Insert? | केवळ नियतीचा घाला?

केवळ नियतीचा घाला?

Next

एखादी अनपेक्षित दु:खद घटना घडली, की नियतीचा घाला असे म्हणून आपण मोकळे होतो. कधी अशा घटना मानवी प्रयत्नांद्वारे टाळता येण्यासारख्या नसतात किंवा मानवी चुकीमुळे घडलेल्या नसतात. अशा वेळी नियतीचा घाला या शब्दांत त्या घटनेचे वर्णन केले तर ते समजून घेता येईल; परंतु जेव्हा एखादी घटना निव्वळ मानवी चुकीमुळे, अक्षम्य हलगर्जीमुळे घडते, तेव्हा केवळ नियतीवर दोषारोपण करून कसे मोकळे होता होईल? अकोला जिल्ह्यातील आगर या गावातील एका कुटुंबावर सोमवारी असाच दुर्दैवी प्रसंग ओढवला. दिवसभर शेतात राब राब राबून मिळालेल्या मजुरीतून लेकरांसाठी कपडे खरेदी करण्याचे स्वप्न रंगवित असलेली तरुण महिला, तिचा अवघा १३ वर्षांचा मुलगा आणि इतर दोघांचा सोमवारी भल्यापहाटे नागपूरनजीक झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाचा फेरा असा, की ती तरुण महिला, तिचा मुलगा आणि इतर पाच जण ज्या आॅटोरिक्षातून शेतातून घरी परतत होते, त्या रिक्षाला विरुद्ध दिशेने येणाºया ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागल्याने अपघात झाला होता. त्या अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकने जबर धडक दिल्याने, अवघ्या काही तासांच्या अंतराने दुसरा अपघात झाला आणि त्यामध्ये चार जण दगावले. गंभीर बाब ही, की ज्या रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला तो रस्ता चौपदरी आहे. अशा रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन येणे अभिप्रेत नसते; मात्र ट्रकचालकाने चुकीच्या दिशेने ट्रक हाकला आणि जीवघेणा अपघात घडला. थोडक्यात, निव्वळ मानवी चूक व हलगर्जीमुळे अपघात घडून, चौघांना नाहक जीवास मुकावे लागले. या अपघातामुळे आम्हा भारतीयांच्या ‘ट्रॅफिक सेन्स’चा मुद्दा ऐरणीवर यायला हवा. संपूर्ण जगात भारतातील बेशिस्त वाहतूक कुप्रसिद्ध आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहतूक नियंत्रक दिव्यांकडे दुर्लक्ष, थोडासा वेळ आणि इंधन वाचविण्यासाठी दुभाजक असलेल्या रस्त्यांवर चुकीच्या दिशेने वाहन हाकणे, दुभाजक नसलेल्या रस्त्यांवर उजव्या बाजूला वळण्यासाठी आपले वाहन रस्त्याच्या पार उजव्या बाजूला नेणे, इतरांची पर्वा न करता रस्त्यात कुठेही वाहन उभे करणे, जड वाहने उजव्या लेनमधून हाकणे, रस्त्यांवर कोंडाळे करून गप्पा मारणे, असे नाना दुर्गुण बहुतांश भारतीयांच्या अंगी पुरेपूर भिनले आहेत. अशाच एखाद्या दुर्गुणामुळे कधी तरी असा भीषण अपघात घडतो. त्यात काही जीवानिशी जातात, काही कायमचे पंगू होतात आणि आम्ही मात्र नियतीवर दोष ढकलून मोकळे होतो!

Web Title:  Only Destiny Insert?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात