...ही तर दमनशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:58 PM2018-10-02T15:58:20+5:302018-10-02T15:58:42+5:30
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या दहा महिन्यानंतर झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी विधाने केली ती जबाबदार मंत्र्याला शोभणारी खचितच नव्हती.
मिलिंद कुलकर्णी
जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या दहा महिन्यानंतर झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी विधाने केली ती जबाबदार मंत्र्याला शोभणारी खचितच नव्हती. चंद्रकांत पाटील हे अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि वजनदार मंत्री आहेत. परंतु त्यांच्याकडे बांधकाम, महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन अशी महत्त्वाची खाती, कोल्हापूर आणि जळगावचे पालकमंत्रीपद, मराठा आरक्षणविषयी मंत्री समितीचे नेतृत्व अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. पश्चिम महाराष्टÑात भाजपाची पाळेमुळे रुजविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यातुलनेत जळगाव हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने पाटील यांना पक्षवाढीसाठी फार काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन या नेत्यांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडे दुवा, समन्वय म्हणून खरे तर पालकमंत्रिपद सोपविले असल्याची अंतर्गत वर्तुळात चर्चा असते. लवकरच महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद येईल, अशीही चर्चा वर्षभरापासून सुरु आहे. त्यामुळे पाटील यांचे जळगावला येणे तसे कमी असते, हे वास्तव आहे.
जळगाव जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे एकमेव आमदार असलेल्या डॉ.सतीश पाटील यांनी १० महिन्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला वेळ मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आणि पालकमंत्र्यांचा तीळपापड झाला.
पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष एकूण १०-१२ वर्षे फार तर सत्तेत राहिला आहे; अधिकचा काळ हा विरोधी पक्षात घालविला आहे. त्यामुळे सत्ताधाºयांवर टीका करण्यात अग्रभागी असलेल्या भाजपाच्या मंडळींना त्यांच्यावर झालेली टीका सहन का होत नाही? सत्तेतील कामगिरीचा हिशेब मागीतला तरीही या मंडळींना राग येतो? कॉंग्रेसला ६० वर्षे दिली आणि आम्हाला चार वर्षांत जाब विचारता अशी अतार्कीक विधाने भाजपा नेत्यांकडून होत असतात. सरकारचे दोष, त्रूटी दाखविणे हे विरोधी पक्षाचे काम असते, हे भाजपाच्या मंडळींना खरे तर नव्याने सांगण्याची गरज नाही. पण सत्तेची नशा अशीच असते. पालकमंत्री पाटील यांचे पुढील विधान अधिक धक्कादायक होते. अशा व्यंगात्मक बोलण्याची गरज नाही. दोन निवडणुकांच्या आचार संहितेमुळे सभा झाल्या नाहीत. पण सभेअभावी कामे खोळंबलेली नाहीत. तुम्हीही मला कामासाठी भेटून गेला. तुम्ही असे बोलत असाल तर आता सभेतच भेटत जाऊया. समक्ष भेटीसाठी येऊ नका, असा इशारा पाटील यांनी दिला.
एखादा जबाबदार मंत्री लोकप्रतिनिधीला अशा पध्दतीने प्रत्युत्तर देतो, हे धक्कादायक आहे. आमदार डॉ.सतीश पाटील हे लोकप्रतिनिधी या नात्याने सभा विलंबाबद्दल लक्ष वेधत होते, यात काय गैर आहे. संसद आणि विधिमंडळात तर गदारोळाची परंपरा आहे. भाजपाने अनेकदा हा मार्ग अवलंबलेला आहे.
पालकमंत्र्यांचा दुसरा मुद्दा म्हणजे, सभेअभावी कामे थांबलेली नाहीत. हे तद्दन चुकीचे विधान आहे. सभेत केवळ प्रलंबित विषयांवर चर्चा झाली. मग ती नजर पैसेवारी, महामार्ग चौपदरीकरण, समांतर रस्ते, कर्जमाफी, बोंडअळी अनुदान, पीकविमा, जलयुक्त शिवार योजनेतील गैरप्रकार हे विषय का चर्चिले गेले. महामार्ग चौपदारीकरणाचे काम का थांबले, महापालिकेत भाजपाची सत्ता येऊनही गाळेकराराचा प्रश्न न सुटणे, हुडको व जिल्हा बँकेच्या कर्जफेडीसाठी हालचाली नसणे, नाट्यगृहाचे स्ट्रक्चरल आॅडिट, त्यासाठी मिळत नसलेला ठेकेदार, शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी दोनदा निविदा काढूनही मिळत नसलेला प्रतिसाद, भुयारी गटार योजनेची तीच अवस्था का आहे, याची उत्तरे कोण देणार? माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपाच्या व्यासपीठावरुन स्वकीय सरकारच्या काळात विकास ठप्प झाल्याचे सोदाहरण स्पष्ट करतात. मंत्रिपद नसल्याने त्यांची नाराजी असेल हे एकवेळ खरे मानले तरी भाजपा व शिवसेनेचे तमाम आमदार खाजगीत हेच म्हणतात. ठोस विकास कामे सांगताना लोकप्रतिनिधींची पंचाईत होते. याविषयी विरोधी पक्षाने जाब विचारला तर पालकमंत्र्यांना राग येण्याचे कारण काय?
तिसरा मुद्दा, कामांसाठी मला भेटू नका, हे विधान तर अजब तर्कट आहे. सभेचा आग्रह धरला म्हणून असा हेका मंत्र्यांनी धरणे गैर आहे. आमदार डॉ.पाटील हे जनतेचे प्रश्न घेऊनच पालकमंत्र्यांना भेटले असतील ना, मग त्यांना नकार देण्याचे कारण काय? रिपब्लीकन पक्षाने काळे झेंडे दाखविले म्हणून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. अशी दमनशाही योग्य नाही.