धोकादायक पर्याय नाकारणे हाच पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 06:40 AM2019-04-04T06:40:51+5:302019-04-04T06:48:06+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान करायचे हे अनेकांनी निश्चित केलेले असेल.

The only option to reject the dangerous option! | धोकादायक पर्याय नाकारणे हाच पर्याय!

धोकादायक पर्याय नाकारणे हाच पर्याय!

Next

संतोष देसाई

आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान करायचे हे अनेकांनी निश्चित केलेले असेल. ज्यांनी भाजपला मतदान करायचे ठरवले असेल त्यांना त्याचसाठी अनेक कारणे असू शकतात. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास, हिंदूंनी एकजूट व्हायला हवे याची गरज वाटणे, देशाच्या अर्थकारणात मोदीच बदल घडवून आणू शकतील याविषयीचा विश्वास, मोदींची पहिली टर्म निराशाजनक जरी ठरली असली तरी उपलब्ध पर्यायात ते उत्तम पर्याय ठरतात - ही काही कारणे सांगता येतील. दुसऱ्या बाजूने विचार करणाऱ्यांच्या मते मोदींच्या विरोधात मतदान करण्यासाठीही कारणे असू शकतात. सत्तारूढ पक्षाकडून देशाचे मूळ स्वरूपच नष्ट केले जात आहे. देशातील संस्था नष्ट करण्याचा सपाटा सुरू आहे, निवडणुकीपूर्वी दिलेली अभिवचने सरकारने पूर्ण केली नाहीत, बेरोजगारीत वाढ, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराचे दुष्परिणाम ही काही कारणे असू शकतील.

पण या दोन्हीशिवाय असेही काही लोक असतील जे कुणाला मत द्यावे याविषयी द्विधा मन:स्थितीत असतील! स्तंभलेखक गुरचरण दास यांनी त्यांच्या एका लेखात योग्य पर्याय दिसत नसल्याने निराश झालेल्या लोकांच्या मन:स्थितीचे वर्णन केले आहे. प्रस्थापितांविरोधात मतदान करणे म्हणजेच विरोधकांना मतदान करणे ही अवस्था अनेकांसाठी चिंताजनक ठरू शकते. अशावेळी दोन पर्यायांतील कमी वाईट पर्यायाची निवड करावी लागते. ही तडजोड करणे झाले. (अन्यथा नोटा हा पर्याय आहेच). यंदाच्या निवडणुका या देशाच्या भवितव्यावर परिणाम करणाºया असल्याने योग्य निवड करणे हे महत्त्वाचे झाले आहे.

विचार करण्याच्या दृष्टिकोनातून थोडा बदल केला तर जे मतदार दोलायमान स्थितीत आहेत ते निश्चित उद्दिष्टापर्यंत पोचू शकतील. देशाला ज्या पर्यायापासून धोका आहे तो पर्याय निर्धारपूर्वक नाकारून कमी हानिकारक असलेला पर्याय निवडणे हे योग्य ठरणार नाही का? कोणता पर्याय साधारण बरा ठरेल असा विचार करण्यापेक्षा कोणता पर्याय वाईट आहे असा विचार का करू नये? त्यासाठी आपल्या निवडीच्या बाजूने मतदान करण्याऐवजी पर्यायाच्या विरुद्ध मतदान करावे लागेल. आदर्श व्यवस्थेत हा काही चांगला पर्याय ठरत नाही. पण सरकार हे काहीतरी भरीव बदल घडवून आणणारे असावे. त्यासाठी आपले मतदान सकारात्मक निवड करण्यासाठी असावे. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी लोकांचे सामूहिक भवितव्य निश्चित करायचे असते. पण जे मतदार कुंपणावर बसलेले असतात, त्यांनी त्यांना काय हवे याऐवजी काय नको हाच पर्याय निवडायचा असतो.कधी कधी अशी वेळ येते की जेव्हा नकारात्मक मतदान करणे ही काळाची गरज असते. अशा भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रत्येक पर्यायाची सखोल चौकशी करून प्रत्येक पर्यायाने वाईटात वाईट काय होऊ शकते याचा अंदाज घ्यावा. त्यातील आपण काय टाळायला हवे याचा विचार करावा. कोणता पर्याय निवडल्याने देशाचे भरून न येणारे नुकसान होणार आहे हेही बघावे.

मतदाराच्या विचारसरणीचा विचार करताना प्रत्येक हानिकारक पर्याय हा मतदाराला दुसºया पर्यायाकडे नेऊ शकतो. एखाद्या पक्षाने देशावर ७० वर्षे राज्य केले आहे म्हणून त्या पक्षाची निवड न करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सत्तेसाठी एकत्र आलेल्या संधीसाधू नेत्यांच्या आघाडीला डावलण्याचा विचार करण्याची भूमिका घेतली जाऊ शकते. काहींनी पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार केला होता, ते अकार्यक्षम होते, त्यांनी फक्त मूठभर लोकांच्या हिताचाच विचार केला या विचारातून त्यांचा लोकसभेतील मार्ग रोखण्याचे काम केले जाऊ शकते. दुसरीकडे आपल्या पर्यायाची गुणवत्ता काहीही असो, पण ज्यांनी धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करून देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केले, त्यांच्याविरुद्ध आपल्या मताचा उपयोग करावा असेही ठरविले जाऊ शकते. जे सरकार विरोधकांचा आवाज दाबून टाकते आणि लोकशाहीच्या संस्था उद्ध्वस्त करते त्याला मतदान करणे धोकादायक ठरते अशीही भूमिका घेतली जाऊ शकते. जे लोक अभिवचने देऊन पुढे लोकांची फसवणूक करतात त्यांच्याविरुद्ध मतदान केले जाऊ शकते.

भवितव्याविषयी वाटणाºया आशेपेक्षा त्याविषयी वाटणारा संताप हा अधिक चांगल्या प्रकारे भावना व्यक्त करू शकतो. आपण ज्याची अपेक्षा करतो त्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आपल्या मतातील नकारात्मकतेत असते. शंका उपस्थित करणे हा तर लोकशाहीचा गाभा आहे. कारण आपल्या निवडीमागे काही ना काही शंका ही असतेच. प्रत्येकाने निश्चित अशी राजकीय भूमिका जर घेतली तर निवडणुकीचा निकाल काय लागेल याचा निवाडा होऊ शकतो. कोणत्या दिशेने जायला हवे याविषयी जर संभ्रम असेल तर पक्षाच्या कामगिरीच्या किंवा भूमिकेच्या बाजूने जाण्याची शक्यता असते. पण तुमची ही भूमिका जर तुम्ही कुणाला मतदान करावे याचा निर्णय घेण्यास सक्षम ठरत नसेल तर मग मूलभूत प्रश्नांकडे तुम्हाला वळावे लागेल. अशावेळी मतदान करणे म्हणजे आपल्याला हव्या त्या नेत्याची निवड करणे किंवा तो नेता ज्या मूल्यांचा पुरस्कार करतो त्याची निवड करणे हे शिल्लक उरते. आपण जर द्विधा मन:स्थितीत असू तेव्हा सत्तेपासून कुणाला दूर ठेवायचे याचा विचार करूनच मतदान करणे योग्य ठरेल!

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत )

Web Title: The only option to reject the dangerous option!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.