भारतीयत्व टिकविणे हाच धर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:49 AM2018-01-07T01:49:45+5:302018-01-07T01:49:54+5:30
गुजरात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अस्ताचा काळ सुरू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर लोकसभेत ८० जागा कमी होतील असे राजकारण्यांना वाटू लागले, म्हणून भाजपाने नव्या नीतीने राजकारण करायचे ठरविले. शासन चालविण्यास भाजपाचे सरकार कुचकामी ठरले हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
- डॉ. कुमार सप्तर्षी
गुजरात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अस्ताचा काळ सुरू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर लोकसभेत ८० जागा कमी होतील असे राजकारण्यांना वाटू लागले, म्हणून भाजपाने नव्या नीतीने राजकारण करायचे ठरविले. शासन चालविण्यास भाजपाचे सरकार कुचकामी ठरले हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. धोरणात्मक राजकारण दूर सारून केवळ ठरावीक जाती, समुदायात भेद निर्माण करून त्या ऐंशी जागा भरून काढण्याचा विचार सुरू झाला. मोंदीनी यापूर्वीही जातीय ध्रुवीकरणातून विजय मिळविला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाज आणि दलित वर्ग यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही गटांमध्ये द्वेष पसरविण्याचा कटू डाव रचण्यात आला आणि मुख्य म्हणजे द्वेष पसरण्यासाठी हिंसा महत्त्वाची असते. कारण हिंसा पसरली की, माणसांना त्याचा सहजासहजी विसर पडत नाही. या माध्यमातून समाजाचे तुकडे करण्याचे त्यांनी ठरविले, या संपूर्ण घटनेमागे गुजरात निवडणुकीच्या निकालाचा पॅटर्न आहे.
गुजरातमध्ये मोंदीनी जेथे ओबीसी मतदार अधिक तेथे पटेलांविरोधात भाषणे केली आणि जेथे पटेल मतदार जास्त आहेत, तेथे याउलट प्रचार केला. त्यामुळे राज्यात सतेत्त असलेल्या अल्प मताच्या सत्ताधा-यांनी मराठ्यांना उचकवण्यासाठी कोरेगाव भीमाची घटना घडवून आणली. या घटनेत एका गटाने इतिहासाला आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. कारण मागच्या पिढीने काही तरी विचार करूनच समाधी बांधण्याचे निर्णय घेतले होते. मात्र त्या घटनेला शौर्य मानून दलित वर्ग ‘विजय दिन’ साजरा करत असेल तर ही भूमिका चुकीची आहे. कारण त्याच दिवशी परकीय शत्रूंनी आपल्या देशात आगमन केले होते आणि त्यानंतर कैक वर्षे आपली मातृभूमी त्यांच्या गुलामगिरीत होती. या घटनेतील सर्वांत मोठी विसंगती अशी होती की जेव्हा स्वकीय अत्याचार करू लागतात, तेव्हा परकीय जवळचे वाटू लागतात.
या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन अतिशय गंभीर आहे. या सर्व घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभावी परिणाम दिसून येतो आहे. ज्या वेळी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्या वेळी देशात शांतता, सुरक्षितता ठेवायची अशी ठाम भूमिका पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. एखाद्या राज्यातील राज्यकर्त्यांना हे जमत नाही, तेव्हा केंद्राने जबाबदारी घेऊन पुढाकार घेतला पाहिजे. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी जाणीवपूर्वक कोणतीच भूमिका घेतली नाही. राज्यातील सद्य:स्थिती लक्षात घेता हे धार्मिक राजकारण नसून जातीपातीचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्म म्हणजे त्या - त्या काळात तिथले लोक जोडण्यासाठी जे सांगतात तो धर्म असतो आणि माणसाला माणसापासून तोडण्यासाठी जे केले जाते त्याला अधर्म म्हणतात.
या घटनेचा सर्वसमावेशक विचार करता निळा, भगवा आणि हिरव्या रंगाचा वैयक्तिक विचार करण्याऐवजी सर्व रंगांना आपल्या तिरग्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. म्हणजेच, कोणत्याही एका रंगापुरते मर्यादित न राहता आपण भारतीय आहोत. भारतीय असणे आणि भारतीयत्व टिकवून ठेवणे हाच खरा धर्म आहे, हा विचार आजच्या समाजावर बिंबविला पाहिजे. या विचारांच्या व्यक्तींनी समाजात सक्रिय होऊन क्रियाशील पद्धतीने नव्या पिढीसाठी काम केले पाहिजे. जेणेकरून जात, धर्म, पंथ या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन समाज केवळ ‘भारतीय’ म्हणून विचार करण्यास सुरुवात करेल, त्या वेळेस ख-या अर्थाने तो ‘विकासा’कडे पाऊल टाकेल.
(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)
(शब्दांकन - स्नेहा मोरे)