...तरच स्त्रिया खऱ्या अर्थाने सुरक्षित!

By Admin | Published: May 8, 2016 02:03 AM2016-05-08T02:03:08+5:302016-05-08T02:03:08+5:30

स्त्री आणि पुरुष दोघंही समान आहेत. प्रकृती - पुरुष या २ तत्त्वांवर निसर्गचक्र चालू आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले अशा थोर व्यक्तींनी स्त्री-सुधारणेसाठी आयुष्य वेचलं, हे आपला इतिहास

Only then women are truly safe! | ...तरच स्त्रिया खऱ्या अर्थाने सुरक्षित!

...तरच स्त्रिया खऱ्या अर्थाने सुरक्षित!

googlenewsNext

- अश्विनी एकबोटे

स्त्री आणि पुरुष दोघंही समान आहेत. प्रकृती - पुरुष या २ तत्त्वांवर निसर्गचक्र चालू आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले अशा थोर व्यक्तींनी स्त्री-सुधारणेसाठी आयुष्य वेचलं, हे आपला इतिहास सांगतो. तरी, आपल्याला स्त्रीचा सन्मान करा, आदर करा हे शिकवावं लागतंय यासारखी लज्जास्पद ती दुसरी कुठली गोष्ट असेल?
स्त्री पुरुषापेक्षा कधीच कमी नव्हती, कमी नाही. हे सिद्ध करायची काहीच गरज नाही. आपण हे सिद्ध करण्याचा अट्टाहास करतो. याचाच अर्थ कुठेतरी आपण हे मान्य केल्यासारखं होतं. परत हे सिद्ध करण्यासाठी कुठला मार्ग अवलंबतो हेही महत्त्वाचं आहे. उत्तम मार्ग म्हणजे आपल्या क्षेत्रात इतक्या उंचीला पोचायचं की पर्यायच ठेवायचा नाही. ज्या स्त्रिया मोठ्या झाल्या त्यांनी ‘आधी केलं मग सांगितलं!’ नुसती बडबड केली नाही, तर स्वबळावर मोठ्या झाल्या, त्या सगळ्यांनी खरा पुरुषार्थ जाणला. फक्त विरोधाला विरोध करून समाज परिवर्तन होत नसतं.

२०१५ची गोष्ट, परदेशी महिलेसमोर एका भारतीय पुरुषाने अश्लील चाळे केले. तिने अत्यंत हुशारीने स्वत:च्या मोबाइलवर त्याचं शूटिंग केलं आणि ट्विटरवर टाकलं. त्या पुरुषाला लगेच पकडण्यात आलं आणि शिक्षाही झाली. खूप आनंद झाला. ‘अतिथी देवो भव:’ अशी आपली भारतीय संस्कृती. ती मातीत मिळवणारी आपलीच काही असंस्कृत माणसं. या परदेशी माणसांना लुटतात तरी किंवा त्या बायकांकडे अशा पद्धतीने पाहतात. बरं ही माणसं दुसऱ्या देशात गेली तरी देशाला बदनाम करायला मागेपुढे पाहत नाहीत, मग बाहेरच्या देशात सगळ्या भारतीयांना एकाच मोजपट्टीने मोजतात. त्यांना तरी काय बोलणार? असो. मनात आलं की जितकी झटपट त्याला शिक्षा झाली तशी, ज्या महिलांवर, चिमुकल्यांवर बलात्कार झाले त्यांचे निर्णय मात्र का रखडतात? परदेशी पाहुण्यांबरोबर असं वागल्यावर इतक्या पटकन निर्णय होत असतील तर आपल्या भारतीय महिलांबाबतीत तर क्षणात कृती व्हायला हवी. अश्लील चाळे केल्यावर जर तुरुंगवास तर बलात्काराला मृत्युदंडच हवा. कायद्याला भावना कळत नाहीत म्हणे! अरे, पण ज्या लोकांसाठी कायदा बनवला त्यांना त्याचा उपयोग नसेल आणि मग संतप्त होऊन एखाद्याने भलतंसलतं केलं तर, कायद्याने न्यायही मिळणार नाही आणि कायदा हातातही घ्यायचा नाही. फक्त मुस्कटदाबी सहन करायची.
भारतात ३ मिनिटांना १ बलात्कार अशी आकडेवारी समोर येते. पण, दुबई-सिंगापूरला असे गैरवर्तन खपवूनच घेतलं जात नाही. कारण तिथे कायद्याची भीती आहे, बलात्काराला देहदंड होतो. सिंगापूरला मला एका पुरुषाचा चुकून धक्का लागला, तो मला किमान ४ वेळातरी सॉरी म्हणाला, त्याच्या डोळ्यांत दिलगिरी होती, आदर होता, आणि भीतीही! आपल्याकडे चुकून धक्का लागला तर माफी मागणं तर लांबचीच गोष्ट, उलट काही झालंच नाही असा आव आणतात.
मला मुंबईतील घटना आठवते. मुंबईहून पुण्याला निघाले होते. ३ पुरुषांनी एक टॅक्सी शेअर केली. मी एकटीच होते. त्या ड्रायव्हरने तिघांना विनंती केली की, ही बाई आहे. तिला पुढे बसू दे. एक म्हणाला, मी आधी आलोय, पैसे दिलेत. मी मागे बसणार नाही. मागचा म्हणाला, मी विंडो सिट सोडणार नाही. त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, तुमचे पैसे परत घ्या, मला जायचंच नाही, तुमच्या घरी आई-बहीण नाही का? त्यावर ती माणसं म्हणाली, पैसे परत घेणार नाही, याच गाडीतून, याच सिटवर बसून जाणार! आम्हाला शिकवू नकोस, आमच्याही घरी बायका आहेत, आम्हाला कळतो स्त्रिचा सन्मान कसा करायचा ते. हे सगळं पाहून मला हसायला आलं. म्हटलं, यांना फक्त घरातल्या स्त्रियांचा आदर करायला शिकवलं वाटतं? तेही खरं का खोटं कुणास ठाऊक? शिक्षण फक्त पुस्तकातच राहिलं, आचारांत-विचारांत संस्कार उतरलेच नाहीत.
पुरोगामित्व विचारात असायला हवं. माणसाचे विचार बदलले तरच समाज कृतिशील होईल. आता माणसांच्या मनाची कवाडं, डोळ्यांवरची बुरसटलेली झापडं कशी उघडतील यावर काम करायला हवं. आपण सगळ्यांनी आता सुरुवात केली तर कदाचित ४० वर्षांनंतर जन्माला येणाऱ्या आपल्या मुली खऱ्या अर्थाने सुखी, समाधानी, सुरक्षित सबला नारी असतील.

Web Title: Only then women are truly safe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.