उघडा डोळे, बघा नीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:00 AM2018-06-19T00:00:53+5:302018-06-19T00:00:53+5:30
शिक्षणव्यवस्थेत गुणांच्या स्पर्धेला जास्त महत्त्व आले असून शाळांमध्ये विद्यार्थी अक्षरश: परीक्षार्थीच झाले आहेत.
शिक्षणव्यवस्थेत गुणांच्या स्पर्धेला जास्त महत्त्व आले असून शाळांमध्ये विद्यार्थी अक्षरश: परीक्षार्थीच झाले आहेत. शाळेमध्ये प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी चांगले गुण मिळवून बाहेर तर पडू शकतो, मात्र खरोखरच पुस्तकी धडे म्हणजेच ज्ञान होते का हा प्रश्न पालकांनी स्वत:ला विचारण्याची वेळ आली आहे. नागपूर शहरातील तब्बल ३५९ शाळांमध्ये क्रीडांगण नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अनेकांना ही बाब फारशी गंभीर वाटत नसली तरी शैक्षणिक क्षेत्रातील अव्यवस्था व बाजारीकरणाचा भंडाफोड करणारी ही बाब आहे. केवळ नागपूर नव्हे तर राज्यातील अनेक शाळांत असेच चित्र आहे. मुले म्हणजे मातीचा गोळा असतात व त्यांना जसा आकार दिला, तसे ते घडतात. मुलांमधील खेळाडू, कलाकार, लेखक घडण्याची प्रक्रिया ही शालेय जीवनातूनच सुरू होते. मात्र शाळांमध्ये क्रीडांगणच नाही म्हटल्यावर मुलांमधील खेळाडू बाहेर येण्यासाठी फारशी संधीच नसते. मुळात मुलांचे खेळणे तसेच कमी झाले आहेत. सार्वजनिक क्रीडांगणाच्या झालेल्या व्यावसायिकरणामुळे मनमोकळेपणाने खेळण्यासाठी जागा नाही. त्यातच दिवसभर शाळा, कोचिंग क्लास आणि ‘स्मार्टफोन्स’वरील ‘गेम्स’ यामध्ये विद्यार्थी इतके व्यस्त होतात की सायंकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडण्याचे भानदेखील त्यांना राहत नाही. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये ‘लाईफस्टाईल’शी संबंधित आजार, स्थूलता इत्यादी लहानपणापासूनच दिसून येतात. त्यामुळेच कमीत कमी शाळांमध्ये तरी खेळाच्या माध्यमातून त्यांंचा व्यायाम व्हावा व शरीरातील चपळता वाढावी ही अपेक्षा योग्यच आहे. मात्र अनेक ‘जागरूक’ पालक या बाबींकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात. अमूक शाळेत प्रवेश मिळाल्यावर आमच्या मुलाला तमूक टक्क्यांहून जास्त गुण मिळतीलच असा त्यांना विश्वास असतो. अशा शाळेत प्रवेशासाठी आकाशपाताळ एक करतात. मात्र तेथे क्रीडांगणासारखी सुविधा आहे की नाही, याला ते महत्त्वही देत नाहीत. त्यामुळे क्षमता व कर्तृत्व असूनदेखील अनेक विद्यार्थी केवळ परीक्षार्थीच बनून राहतात. पालक व शाळांच्या याच उदासीन भूमिकेमुळे सव्वाशे कोटींहून अधिक लोकसंख्या असूनदेखील ‘आॅलिम्पिक’मध्ये देश मागे असतो आणि ‘फुटबॉल’ विश्वचषकात तर प्रवेशदेखील मिळत नाही. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शालेय शिक्षण असले पाहिजे. दुर्दैवाने शाळा, प्रशासन आणि पालक यापैकी कुणालाही त्याची जाण नाही. क्रीडांगणाशिवाय शाळा असणे म्हणजे ‘पायडल’विना सायकल असण्याचाच प्रकार आहे. आताच यावर विचार झाला पाहिजे. पालकांनो ‘उघडा डोळे, बघा नीट’.