आमदार साहेब, एकदा हे करूनच दाखवा, मग बघा..!

By अतुल कुलकर्णी | Published: November 6, 2022 05:38 AM2022-11-06T05:38:22+5:302022-11-06T05:39:11+5:30

आपण दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात आलात. आपल्यासोबत कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. आपण मुख्यमंत्री साहेबांच्या एकदम जवळचे...

open letter to mla santosh bangar | आमदार साहेब, एकदा हे करूनच दाखवा, मग बघा..!

आमदार साहेब, एकदा हे करूनच दाखवा, मग बघा..!

Next

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

आ. संतोष बांगरजी,
नमस्कार.
आपण दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात आलात. आपल्यासोबत कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. आपण मुख्यमंत्री साहेबांच्या एकदम जवळचे... आणि आपल्यालाच गेटवरच्या पोलिसांनी अडवले..! आपल्या कार्यकर्त्यांना विनापासचे आत सोडले नाही... हे काही बरोबर झाले नाही. आपण आमदार आहात. आपण कितीही लोकांना घेऊन येऊ शकता, हे त्या पोलिसाला कळू नये, हे फारच झालं...! त्यामुळे आपण ज्या पद्धतीने त्या गेटवरच्या पोलिसाला योग्य भाषेत ‘समजावले’, ते एका दृष्टीने चांगले झाले.

तुम्ही त्याला शिवीगाळ, दमदाटी केली असा त्याचा आक्षेप होता. आपल्याकडे पिस्तूल असते तर गोळ्याच घातल्या असत्या अशी धमकीही आपण त्या गेटवरच्या पोलिसाला दिल्याचे त्याने सांगितले. आमदार साहेब २६/११ ची घटना घडली त्यावेळी आपण मंत्रालयात पाहिजे होतात. त्यावेळी आपल्या जवळची बंदूक धाडधाड चालली असती आणि कसाबच काय, सगळे अतिरेकी खलास झाले असते...! पण नेमकं त्यावेळेस तुम्ही मतदारसंघात होता. त्यामुळे इकडे या काठ्या घेतलेल्या पोलिसांची पंचाईत झाली. यापुढे चुकूनमाकून असे काही झालेच तर तुम्ही तयारीत राहा. आता आपलेच मुख्यमंत्री. त्यातून तुम्ही त्यांच्या अगदी जवळचे. त्यामुळे तुम्हाला ते तासाभरात हेलिकॉप्टरने मुंबईत घेऊन येतील. 

कोण कुठला पोलीस झाला म्हणून काय झाले...? आपल्या कार्यकर्त्यांना अडवतो म्हणजे काय..? त्याची एवढी हिंमत..? त्याला माहिती नसावे तुम्ही कोण आहात? 

विना कार्यकर्त्यांचा आमदार कसा..? आपल्यासोबत तर फक्त २५ ते ३० कार्यकर्ते होते...! मुख्यमंत्री साहेबांच्या आजूबाजूला रात्री २ वाजतादेखील किमान २०० लोक असतात. हे त्या पोलिसाला माहिती नसेल. म्हणून त्याने आपल्याला अडवले असेल. आपण कार्यकर्त्यांना मंत्रालय दाखवायला थोडंच घेऊन आला होतात...? आपण मतदारसंघाचा विकास कसा करता..? विकासकाो कशी खेचून आणता, हे आपल्या कार्यकर्त्यांना ‘याच  देही, याचि डोळा’ बघायला मिळावे म्हणून आपण त्यांना सोबत आणलं... आणि गेटवरच्या पोलिसांनी आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलं... त्याला काय जातं, गेटवर उभा राहून लोकांना अडवायला...? पाच माणसं गावाकडून घेऊन ये म्हणावं, मग कळेल...

आपल्या अशा वागण्यामुळे शिंदे गटाची कॉलर टाईट होते. हे अजून त्या पोलिसांना कळालेलं नसावं... त्यात पुन्हा गृहखाते भाजपकडे... त्यामुळे पोलिसांनी मुद्दाम तुम्हाला बदनाम करण्यासाठी तर हे सगळं नाटक केलं नसेल ना...? उगाच आपलं गावाकडच्या पद्धतीने शंका आली म्हणून विचारलं... याआधी पण आपण खोटं बोलणाऱ्या ठेकेदाराच्या गालावरून किती प्रेमाने हात फिरवला होता... ते प्रेमदेखील मीडियाच्या लोकांना बघवलं नाही. गालावरून प्रेमाने हात फिरवणं आणि कानशिलात लगावणं यातला फरक त्यांना कसा काय कळाला नाही साहेब...? त्यांना पण प्रेमानं गालावरून हात फिरवून पाहिजे का..?

मी काय म्हणतो साहेब, आता आपल्या सगळ्या आमदारांनी या घटनेचा स्पष्ट शब्दांत निषेध केला पाहिजे. सी.एम., डी.सी.एम. यांनाच पत्र दिलं पाहिजे आणि निषेध म्हणून आपल्याला दिलेला पोलीस बंदोबस्त ताबडतोब परत पाठवून दिला पाहिजे. उगीच आपल्या मागे काठ्या घेऊन हे पोलीस फिरत राहतात... आणि मंत्रालयात जायची वेळ झाली की, आपल्याला कोणी आत पण सोडत नाही... मग काय कामाचा हा पोलीस बंदोबस्त...?

तेव्हा आमदार साहेब, आपण पुढाकार घ्या. आपल्या गटाच्या चाळीस-पन्नास आमदाराची सुरक्षा काढायला सांगा आणि मग मैदानात यायला सांगा...! मंत्रालयात कार्यकर्ते सरकारचा कारभार बघायला जातात... आपल्या आमदाराचा अधिकाऱ्यांवर किती वट आहे..? हे बघायला जातात. नंतर मतदारसंघात जाऊन आमदारांच्या स्टोरी अन्य मतदारांना सांगतात. हादेखील पक्षाचा आणि आपला प्रचार नाही का साहेब..? त्यामुळे आता मागे फिरू नका. पोलिसांनी तुमच्याविरुद्ध काय काय रिपोर्ट दिल्याच्या बातम्या आहेत. ते रिपोर्ट हाणून पाडायचे असतील तर, सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांना दिलेली सुरक्षा नाकारा! मग बघा कसे घाबरून जातील. तुम्ही व्हा पुढे... आम्ही आहोतच मागे, कपडे सांभाळायला...
- तुमचाच बाबूराव

Web Title: open letter to mla santosh bangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.