मुक्त विद्यालय ही क्रीडापटूंसाठी मोठी संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:13 AM2019-01-16T06:13:36+5:302019-01-16T06:13:39+5:30
शिक्षण ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडे नेणारी निरंतर प्रक्रिया असून, मानवी जीवनाचा सामाजिक व आर्थिक स्तर सुधारण्यात शिक्षणाचे महत्त्वपूर्ण योगदान असते.
शिक्षणामुळे मनुष्याच्या विचारांचा पाया भक्कम होतो. शिक्षण ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडे नेणारी निरंतर प्रक्रिया असून, मानवी जीवनाचा सामाजिक व आर्थिक स्तर सुधारण्यात शिक्षणाचे महत्त्वपूर्ण योगदान असते. समाजातील प्रत्येक घटकातील मूल शिकले पाहिजे, याकरिता अनेक योजना राज्य सरकारमार्फत राबविण्यात येत आहेत. तरीही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. काही दिव्यांग विद्यार्थी मुख्य प्रवाहातील औपचारिक शिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. अतिप्रगत विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणापलीकडे अनेक विषयांचे पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
राज्यात सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढत असून, मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र सरकारने या साऱ्या बाबींचा विचार करून राज्यात मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेची ११ विभागीय केंद्रे, तीन उपविभागीय केंद्रे, तीन हजार संलग्न संस्था (एआयएस) आणि व्यवसायिक संस्था (एआयव्हीएस) कार्यरत आहेत. सध्या भारतातील १५ राज्ये, तसेच एका केंद्रशासित प्रदेशात मुक्त विद्यालये सुरू आहेत.
शाळेत पोहोचू न शकणारे दिव्यांग विद्यार्थी, तसेच कला, क्रीडा क्षेत्रात कारकिर्द करू इच्छिणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मुक्त मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी, आठवी, दहावी अशा तीन स्तरांवर परीक्षा देता येतील. त्यासाठी अनुक्रमे १०, १३ आणि १५व्या वर्षी सदर परीक्षा देता येतील. या निर्णयामुळे क्रीडापटूंचा फायदा होईल, असे वाटते. शालेय शिक्षणाच्या गळतीच्या प्रमाणाला आळा घालण्याचे प्रमुख उद्दिष्ट मुक्त विद्यालयाच्या स्थापनेमागे असून, प्रौढ व्यक्ती, गृहिणी, खेळाडू यांना पुरेशा संधी उपलब्ध करण्याचा मानस आहे. औपचारिक शिक्षणाला समकक्ष शिक्षण पद्धती राबविण्याचा उद्देश यामुळे साध्य होईल, अशी धारणा आहे.
मुक्त शाळांमधील अभ्यासक्रम नियमित अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असेल व त्यांच्या परीक्षेतील काठीण्य पातळी कमी करण्यावर शिक्षण खात्याचा भर असेल. दोन भाषा विषय, गणित, विज्ञान, इतिहास-राज्यशास्त्र, भूगोल यापैकी कोणतेही तीन विषय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना असेल. शिवाय कला विषयात संधी असणाºयांना चित्रकला, हस्तकला, रंगकाम, तसेच संगीतात रुची असणाºयांना गायन, वादन, नृत्य याची निवड करता येईल. याशिवाय खेळाची आवड असणाºयांसाठी शारीरिक शिक्षण, क्रीडा (फिजिकल एज्युकेशन अँड स्पोटर््स) यांना प्राधान्य देता येईल.
सोईनुसार शिक्षणाची संधी, विषयांची लवचिकता, औपचारिक शिक्षणापलीकडे विविध विषयांच्या पर्यायाची उपलब्धता, सर्वांसाठी शिक्षणाची व्यवस्था ही या विद्यालयाची वैशिष्ट्ये ठरतील. अभ्यासाचे अवडंबर न माजवता विद्यार्थी मुक्तपणे आपल्या आवडत्या खेळात प्रगती करु शकतील.
मुक्त विद्यालयामुळे पालकांना दिलासा तर लाभेलच, शिवाय आपल्या पाल्यांच्या भवितव्याची फारशी चिंता करावी लागणार नाही. मुक्त विद्यालयांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळून समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी. एकूणच सरकारने सुरू केलेला हा उपक्रम चांगला असला, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.
शरद कद्रेकर । ज्येष्ठ क्रीडा पत्रकार