दृष्टिकोन - कौमार्य चाचणी हा गुन्हा ठरविण्यातील आव्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:51 AM2019-02-18T04:51:28+5:302019-02-18T04:51:46+5:30

कालांतराने जेव्हा शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या विचारांवर ठाम व्हायची वेळ आली, तेव्हा या कौमार्य परीक्षणासंदर्भातही ठाम राहून परिवर्तनाचे काम करायला हवे

 Opinion - The Challenges in Determination of Parents Testing | दृष्टिकोन - कौमार्य चाचणी हा गुन्हा ठरविण्यातील आव्हाने

दृष्टिकोन - कौमार्य चाचणी हा गुन्हा ठरविण्यातील आव्हाने

Next

विवेक तमायचीकर 

अनेक प्रसंग लहानपणापासूनच मनात घर करून गेले. जेव्हा कोण्या नातेवाइकांचे लग्न असे तेव्हा लग्नानंतर पुढच्या दिवशीचे वातावरण बुचकळ्यात टाकणारे आणि म्हणून मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजवणारे असे होते. कारण एका स्त्रीला लग्नानंतर तिच्या पतीकडून केली जाणारी विचारणा ही एखाद्या वस्तूपेक्षा जास्त नसे. इथे जातपंचायतीच्याच सांगण्यावरून एखाद्या लॉजमध्ये लग्न झालेल्या रात्री जोडप्याला शारीरिक संबंध ठेवायला लावत नातेवाईक मंडळी लॉजच्या रूमबाहेर उभी असतात आणि दुसऱ्या दिवशी विचारणा होते, सांग रे बाबा, तुझा माल कसा होता? किंवा असेही विचारले जाते की, तुला दिलेली धान्याची गोण आधीपासूनच फाटलेली होती की त्यात चीर मारली. एका स्त्रीचा असल्या शब्दांत जर ‘मान’ राखला जात असेल, तर खरेच आपल्याला माणूस म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का, हे आपले आपणच विचारायला हवे.

कालांतराने जेव्हा शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या विचारांवर ठाम व्हायची वेळ आली, तेव्हा या कौमार्य परीक्षणासंदर्भातही ठाम राहून परिवर्तनाचे काम करायला हवे, हा विचार मनात पक्का होत गेला. जोडीला वारंवार डोळ्यासमोर होणाºया पंचायती आणि त्यातले न्यायनिवाडे व इतर गोष्टींचा अनुभव होताच. कौमार्य परीक्षणाबाबत जाणून घेण्याआधी जातपंचायतीबाबत जाणून घेणे खरे तर खूप महत्त्वाचे आहे. कारण या सगळ्या प्रथांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कुणाची असेल, तर ती जातपंचायतीचीच. ही जातपंचायत आणि त्यांच्याकडून केले जाणारे अघोरी प्रकार यांचा सातत्याने आलेला अनुभव पाहून राहवले न गेल्याने मित्रांसमोर मांडायला सुरुवात केली खरी, पण मनातील घालमेल कमी होईना. मग बोलायला सुरुवात केली ती समाजमाध्यमांवर. तेथून मिळालेल्या प्रतिक्रियांवरून समाजातीलच फारच थोडे तरुण-तरुणी एकत्र आले. त्यातून व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा, समविचारी गट तयार करत पुढे येणाºया अडचणींना एकत्रित सामोरे जाण्याचे बळ एकवटण्याचा निर्णय झाला. या ग्रूपमध्ये जोडल्या गेलेल्या प्रत्येक तरुण-तरुणीसमोर उमेद होतो, मी आणि माझी होणारी पत्नी. कारण आम्ही दोघेही कौमार्य चाचणीविना लग्न करून दाखवण्याचे धाडस करण्यास सुज्ञ होतो. हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यात अडचणी आणि आव्हाने बरीच होती, याची सुरुवातीलाच पूर्ण कल्पना होती. जेव्हा जेव्हा हा विषय घरात मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा प्रामुख्याने हेटाळणी, टिंगल, भांडणे झाली. सर्वात मोठी भीती होती, समाजाकडून माझ्यासोबत अख्ख्या परिवाराला बहिष्कृत केले जाण्याची, मी मोठा असल्यामुळे बाकी लहान भावा-बहिणींची लग्ने होणार नाहीत हे दडपण सतत होते. हा बहिष्कार घालणार कोण? तर तीच जातपंचायत जिने जणू समाजाला दावणीला बांधून ठेवले आहे. कंजारभाट समाज जणू काही भारतीय संविधानाच्या चौकटीबाहेरच आहे, अशी एकंदर जातपंचायतीची वागणूक. कौमार्य चाचणीला विरोध केल्याने, ती नाकारल्याने या पंचायतीला माझ्या लग्नाचे वृत्त समजताच ते कसे हाणून पाडता येईल, यासाठी सर्व शक्ती पणाला लावली गेली. त्यात पत्नीच्या घरच्या मंडळींना माझ्यापेक्षा इतर चांगले मिळतील, इथपासून मी पुरुषच नसल्याने कौमार्य परीक्षणासाठी घाबरतोय इथपर्यंत त्यांनी ठरविलेल्या

लग्नाचा पुनर्विचार करायला भाग पाडले.
सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा बनवून जातपंचायतींना नष्ट करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य. या कायद्यातील काही तरतुदी कौमार्य परीक्षणासारख्या काही कुप्रथांबाबत कमी पडतात. कायद्यानुसार कौमार्य परीक्षणानंतर पीडित व्यक्तीने तक्रार करायला हवी. जी आजच्या घडीला निव्वळ अशक्य आहे, असे मी मानतो. त्यातही जनहित लक्षात घेऊन जर कुणी जागल्याचे (व्हिसल ब्लोअरचे) काम म्हणून तक्रार करत असेल, तर वैयक्तिक गोपनीयतेचे उल्लंघन न होता अशी तक्रार नक्कीच विचारात घेतली जावी, ही अपेक्षा आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी मिळालेली साथ आणि कायम सोबत असणाºया डॉ. नीलम गोºहे यांच्या पाठपुराव्यामुळे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाला, तो म्हणजे ‘कौमार्य चाचणी’ हा एक लैंगिक गुन्हा ठरविण्याचा. त्यासाठी अधिसूचना काढण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्याचे स्वागत करताना आणि सरकारचे आभार मानताना जाणवतो पोलिसांचा निरुत्साह आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी. योग्य अंमलबजावणी झाली, तर आणि तरच जातपंचायतीसारख्या गुंड प्रवृत्तींना आळा बसण्यास सुरुवात होईल. त्यासाठी समाजाशी संवाद प्रस्थापित करून कायद्याचा प्रचार आणि प्रसार महत्त्वाचा आहे.

(लेखक कौमार्य चाचणीला विरोध करणारा कंजारभाट समाजातील तरुण)

Web Title:  Opinion - The Challenges in Determination of Parents Testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.