संधीसाधूंचे राजकारण!
By admin | Published: February 6, 2017 12:05 AM2017-02-06T00:05:40+5:302017-02-06T00:05:40+5:30
हरियाणामधील एक आमदार गयालाल यांनी १९६७ मध्ये एकाच दिवशी तीन पक्ष बदलले. या प्रकरणात हरियाणा जनहित पार्टीने न्यायालयात धाव घेतली होती.
हरियाणामधील एक आमदार गयालाल यांनी १९६७ मध्ये एकाच दिवशी तीन पक्ष बदलले. या प्रकरणात हरियाणा जनहित पार्टीने न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणाचा निकाल देताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ‘आयाराम-गयाराम’ असा शब्दप्रयोग सर्वप्रथम केला होता. तेव्हापासून भारतीय राजकारणाला नवा वाक्प्रचार मिळाला. त्यानंतर हा वाक्प्रचार म्हणजे राजकारणाचे प्राक्तन ठरले आहे. सध्या सुरू असलेल्या राज्यातील महापालिकेच्या रणसंग्रामामध्ये अशा आयाराम-गयारामांची संख्या फक्त वाढलेलीच दिसते असे नाही, तर त्यांच्या राजकीय कोलांटउड्यांना ‘स्टेटस’ मिळू लागल्याने आता ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरुद कोणत्याच पक्षाला मिरवता येणार नाही. राजकारणाच्या बदलत्या प्रवाहामध्ये कार्यकर्त्यांच्या निष्ठा जशा हरवत चालल्या आहेत, तसा नेत्यांचा कार्यकर्त्यांवरील विश्वासही कमी होत चालला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकाही पक्षाने उमेदवारी जाहीर करण्याचा धोका पत्करला नाही. ज्या ठिकाणी अशा याद्या आधी जाहीर झाल्या, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ‘राडे’ केले. पुण्यात तर नाराज कार्यकर्ते चक्क उपोषणास बसले. हा सर्व प्रकार राजकारणाला नवा नाही; मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा किती टोकाच्या झाल्या आहेत, याचे प्रत्यंतर आले. राजकारणात काम करायचे असेल, तर आधी समाजकार्य केले पाहिजे, हा धडा आता गिरवला जात नाही. नावापुरता झाडू हाती घेतला, एखाद-दोन रक्तदान शिबिरे, एखादी क्रीडा स्पर्धा किंवा महिला मेळावा घेतला म्हणजे समाजकार्याचा ‘कोटा’ पूर्ण झाला अन् निवडणुकीची पूर्वतयारी झाली, हाच कार्यकर्त्यांचा विचार झाला आहे. नेत्यांनीही त्यांच्या सोयीसाठी हा समज कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवला; पण अनेक कार्यकर्ते एकाच महत्त्वाकांक्षेने भारित झाले की जो गोंधळ उडतो, तो काल उभ्या महाराष्ट्राने पाहिला. अवघे सात-साडेसात हजार रुपये महिना मानधन असलेले नगरसेवकाचे पद मिळविण्यासाठी ज्या पद्धतीने लाखोंची उधळण केली जाते, ती पाहता त्यामागचा उद्देश सर्वसामान्यांपासून लपून राहत नाही. समाजसेवेसाठी राजकारण करण्याची कितीही भलावण केली जात असली, तरी अशा समाजसेवेचा वसा घेण्यासाठी आपल्या पक्षाने तिकीट नाकारताच दुसऱ्या पक्षाच्या दारात जाण्यामध्ये कुणालाही गैर वाटत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी पाच वर्षे सतरंज्या उचलल्या, त्यांना बाजूला सारत आयारामांसाठी पायघड्या टाकण्यात राजकीय पक्षांनाही चुकीचे वाटत नाही. यामुळे प्रत्येक पक्षातून निष्ठावंत कार्यकर्ते कमी होतील. राजकारण हे ‘मनी अॅण्ड मसल पॉवर’चे झालेच आहे. ते पुढे फक्त आणि फक्त संधीसाधूंचेच होईल!