विरोध हा द्रोहच?
By admin | Published: March 7, 2016 01:00 AM2016-03-07T01:00:37+5:302016-03-07T01:00:37+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार यांची जामिनावर मुक्तता करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ज्या शर्ती लागू केल्या आहेत
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार यांची जामिनावर मुक्तता करताना दिल्ली उच्च न्यायालयाने ज्या शर्ती लागू केल्या आहेत आणि जे निकालपत्र दिले आहे त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली आहे. या निकालपत्रातून एक अर्थ असा काढता येईल की देशविरोधी वक्तव्य करणे हाही एकप्रकारचा देशद्रोहच ठरू शकतो. संसदेवरील हल्ला प्रकरणी फासावर लटकविल्या गेलेल्या अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा देणे अथवा त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणे देशविरोधी असल्याचे आणि विद्यापीठातील शिक्षकांनी इत:पर असे होऊ न देण्याची काळजी घेण्याचे आवाहनदेखील याच निकालपत्राद्वारे केले गेले आहे. विद्यापीठाच्या आवारात गेल्या नऊ तारखेस ज्या घोषणा दिल्या गेल्या त्यांच्यामागे कन्हैया होता अथवा नाही यावर टिप्पणी न करता (कारण तपास जारी आहे) तशा घोषणा देण्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली संरक्षण मिळू शकत नाही, असे या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. परंतु न्यायालयाच्या या अभिप्रायास कन्हैयाने लगेचच छेद दिला आहे. मुक्ततेनंतर त्याने केलेल्या भाषणात वा मुलाखतींमध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की, अफझल गुरूहा काश्मीरचा म्हणजे भारताचा नागरिक होता आणि त्यामुळे त्याला झालेल्या शिक्षेची चर्चा करण्याची मुभा राज्यघटनेने दिली आहे. येथे निश्चितच विसंवाद निर्माण होतो. अफझल गुरू यास झालेल्या शिक्षेबाबत चर्चा करणे वा विरोधी घोषणा देणे हे जर देशविरोधी असेल तर देशाच्या माजी पंतप्रधानांची अत्यंत निर्ममतेने हत्त्या करणाऱ्या आणि शिक्षा भोगणाऱ्या मारेकऱ्यांचा कळवळा येऊन तामिळनाडू राज्यातील दोन्ही प्रतिस्पर्धी पक्ष केवळ या मुद्द्यावर एकत्र येतात व राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी पुन:पुन्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या या प्रयत्नांना नेमके काय म्हणायचे असते? जामिनावर मुक्त झाल्यानंतर कन्हैयाने देशातील विद्यमान सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे हा त्याचा मूलभूत हक्क असताना त्याची जिव्हा कापून आणणारास पाच लाखांच,े तर प्राण हरण करणारास अकरा लाखांचे इनाम जाहीर करणारा भाजपा युवा मोर्चाचा कुणी कुलदीप वा आदर्श यांच्या या धमक्यांची संभावना तरी कशी करायची असते? परंतु तितकेच कशाला, विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मध्यंतरी परदेश दौऱ्यावर असताना आपण सत्तेत येण्यापूर्वी भारतात जन्मणे लोकांना लज्जास्पद वाटत होते असे जे विधान केले होते ते देशप्रेमाचे म्हणायचे की देशविरोधी? भले त्यांचा रोख काँग्रेस राजवटीकडे असेल पण त्यात ओढला गेला होता तो देशच! देशात आजही अधूनमधून सहिष्णुता आणि असहिष्णुतेची चर्चा होत असते. जनसामान्यांच्या व्याख्येत सहिष्णुता म्हणजे चक्क डोळेझाक करणे वा दुर्लक्ष करणे. मोदी सरकार वा या सरकारच्या दिल्लीतील पोलिसांनी कन्हैयाच्या बाबतीत अशीच जराशी ‘सहिष्णुता’ दाखविली असती तर देशात वा परदेशात कशाला, खुद्द दिल्लीतदेखील कोण कन्हैयाकुमार हे कोणाला कळलेही नसते.