शाश्वत विकासासाठी अणुऊर्जेचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:51 AM2018-11-29T06:51:54+5:302018-11-29T06:52:04+5:30

लगाम विकासाच्या मागे धावणाऱ्या मानवाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. विकासासाठी आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करताना असो किंवा ...

The option of nuclear power for sustainable development | शाश्वत विकासासाठी अणुऊर्जेचा पर्याय

शाश्वत विकासासाठी अणुऊर्जेचा पर्याय

googlenewsNext

लगाम विकासाच्या मागे धावणाऱ्या मानवाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. विकासासाठी आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करताना असो किंवा त्या विकासाची फळे चाखताना असो, माणसाने कधीच निसर्गाचा विचार केला नाही. आजचे चित्रही फारसे वेगळे नाही.


आजमितीला जगात निर्माण केल्या जाणाऱ्या ऊर्जेपैकी जवळजवळ ८0 टक्के ऊर्जा ही जीवाश्म इंधन म्हणजे कोळसा, खनिज तेल किंवा खनिज वायू वापरून निर्माण केली जाते. याशिवाय घरगुती इंधन म्हणून, तसेच वाहनांसाठीही फार मोठ्या प्रमाणावर आपण जीवाश्म इंधन वापरतो. यातून आपल्याला आपल्या जीवनाला आणि विकासाला हवी असलेली ऊर्जा मिळते, यात शंका नाही, पण या वापरामधून, तसेच इतरही अनेक उद्योगधंद्यांमधून आपण वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बनडाय आॅक्साइड, मिथेन, हायड्रोफ्लुरोकार्बन्स, क्लोरोफ्लुरोकार्बन्स, नायट्रस आॅक्साइड यासारखे हरितगृह वायू उत्सर्जित करतो. हे वायू वातावरणात उष्णता साठवून ठेवतात. गेल्या कित्येक शतकांमधील मानवी कृतीमुळे या वायूंचे वातावरणातील नैसर्गिक संतुलन बिघडल्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान सातत्याने वाढत आहे. या शतकाच्या शेवटास ही वाढ १.५ अंश सेल्सिअस एवढी असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता आणि आता तर ती २.0 अंश सेल्सिअस एवढी होईल, अशी भीती या शास्त्रज्ञांना वाटत आहे.


दिसायला हा वाढीचा आकडा जरी छोटा दिसला, तरी याचे परिणाम फार भयंकर आहेत. भीषण दुष्काळ, महापूर, महाविनाशकारी वादळे, मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळल्यामुळे सागराच्या पातळीत वाढ आणि त्यामुळे बुडणारी हजारो बेटे, किनाºयावरच्या शहरांचे बुडणारे मोठमोठे विभाग, वाढती रोगराई, असे अनेक महाभयंकर दुष्परिणाम या तापमान वाढीमुळे संभवतात. हे रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या चक्राचा कालावधी फार मोठा आहे. म्हणजे, अगदी आजच्या आज जरी आपण या हरितगृह वायुंची निर्मिती आजच्या पातळीला रोखली, तरी त्याचा हवामान बदलावरील परिणाम दृश्य होण्यासाठी सुमारे शंभर वर्षे जावी लागतील.
यामुळेच या संकटातून कसे बाहेर पडायचे, याचा अभ्यास करण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक हवामान संस्था यांनी १९८८ मध्ये आंतरशासकीय हवामान बदल मंडळ या आंतरराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. हे मंडळ या समस्येचा सखोल अभ्यास करून सदस्य राष्ट्रांनी या संकटाची घोडदौड रोखण्यासाठी काय पावले उचलावीत, याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करते. या मंडळाच्या ताज्या अहवालात या संकटाशी सामना करण्यासाठी, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी जे अनेक उपाय सुचविले आहेत, त्यात एक आहे अणुऊर्जेचा वाढत्या प्रमाणात वापर. अणुऊर्जेच्या निर्मितीत हरितगृह द्रव्यनिर्मिती नगण्य प्रमाणात होत असल्याने, वीजनिर्मितीमध्ये पुननिर्माणक्षम ऊर्जेच्या बरोबरीने अणुशक्तीचा वापर व्हावा, अशी या मंडळाची धारणा आहे.


थ्री माइल आयलँड, चेर्नोबिल आणि फुकुशिमाच्या घटना आणि अणुभट्टीतून निर्माण होणाºया दीर्घ आणि अतिदीर्घ अर्धायुष्य असणाºया किरणोत्सारी कचºयाच्या सुरक्षित विल्हेवाटीचा प्रश्न या दोन गोष्टींनी आज जनमानस बव्हंशी अणुऊर्जेच्या विरोधात आहे. जनमताच्या या रेट्यामुळे अनेक विकसित देशांनी, विशेषत: युरोपीयन देशांनी त्यांच्या अणुऊर्जा कार्यक्र मात कपात केली आहे किंवा तो टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे राजकीय आश्वासन दिले आहे. अशा परिस्थितीत आंतरशासकीय हवामान बदल मंडळाची ही शिफारस पाहून अनेकांच्या भुवया वर जातील यात शंकाच नाही.


परंतु या प्रश्नाचा म्हणजेच मानवजातीच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचा साकल्याने विचार केला, तर असे लक्षात येईल की, वरवर विसंवादी वाटणारी ही शिफारस सखोल विचारांती करण्यात आलेली आहे. कारण अणुशक्तीच्या सुरक्षिततेत आज खूपच सुधारणा झालेली आहे, नव्या पिढीच्या अणुभट्ट्या अत्यंत सुरक्षित आहेत. किरणोत्सारी कचºयाच्या विल्हेवाटीच्या प्रश्नावरसुद्धा आधुनिक तंत्रज्ञान मार्ग शोधेल, याचे आशाकिरण आज दिसू लागले आहेत. त्वरक प्रेरित प्रणाली ही दीर्घ आणि अतिदीर्घ अर्धायुष्य असणाºया किरणोत्सारी समस्थानिकांचे रूपांतर तुलनेने लघू अर्धायुष्य असणाºया समस्थानिकांमध्ये करू शकेल, अशी खात्री शास्त्रज्ञांना वाटत आहे. यामुळेच सुरक्षितरीत्या आणि पर्यावरणाची हानी न करता, अणुऊर्जा निर्माण करून शाश्वत विकास साधता येईल, असे या शास्त्रज्ञांना वाटते.
थोडक्यात, आपल्यापुढे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे पृथ्वीच्या तापमानातील सातत्याने होणाºया वाढीमुळे येणाºया भीषण परिस्थितीला मुकाट शरण जायचे किंवा हातातले विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून, कोणताही अभिनिवेश न बाळगता, शक्य त्या सर्व पर्यायांचा वापर करून येणाºया या संकटाचा सामना करायचा. निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.


- शशिकांत धारणे
विज्ञान विषयाचे अभ्यासक

Web Title: The option of nuclear power for sustainable development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.