‘नाटू नाटू’ने जगाला वेड लावले, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 08:38 AM2023-03-14T08:38:55+5:302023-03-14T08:39:27+5:30

ऑस्करच्या रंगमंचावरून जोशात नाचत हे गाणं सांगतंय, आम्ही जगाच्या रंगमंचावर आमचा हक्काचा वाटा मागणार. आता तुम्ही आम्हाला नाकारूच शकत नाही!

oscar winner natu natu song made the world crazy because | ‘नाटू नाटू’ने जगाला वेड लावले, कारण...

‘नाटू नाटू’ने जगाला वेड लावले, कारण...

googlenewsNext

डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, समीक्षक, गायक

ते गाणं आता नुसतं गाणं राहिलेलं नाही. ‘नाटू  नाटू’ म्हणत जोशात केलेलं ते नृत्यही राहिलेलं नाही, ते नुसतं अभिमानी तेलगू संवेदनही उरलेलं नाही -  ऑस्कर पुरस्कार कवेत घेत ते भारतीयच नव्हे तर आशियाई आकांक्षांचं प्रतीक बनलं आहे. जणू ते जोशात नाचत सांगतंय.. ‘आम्ही आता जगाच्या रंगमंचावर आमचा हक्काचा वाटा मागणार.  इतके वर्षे अव्हेरलेत; पण आता तुम्ही आम्हाला नाकारूच शकत नाही. 

गाण्याची ओळख करून द्यायला दीपिका पदुकोण ऑस्करच्या स्टेजवर येऊन टेसात म्हणाली, ‘If you don’t know Naatu, you are about to!’ तो नुसता ‘टू’ वर साधलेला अनुप्रास नव्हता तर जगाला आव्हान देणं होतं. आमची फिल्म इंडस्ट्री, आमची कलात्मक संस्कृती, आमचं संगीत, आमच्या भाषा तुम्ही आता दूर ठेवूच शकत नाही, हे जणू ते वाक्य सांगत होतं आणि नंतर प्रत्यक्ष पुरस्काराची घोषणा झालीच!’ 

...सगळीकडे टाळ्यांचा जल्लोष आहे. संगीतकार एम. एम. किरवाणी आणि गीतकार चंद्रबोस नंतर पत्रकारांच्या घोळक्यात आहेत. एक आशियाई वंशाची पत्रकार त्यांच्याकडे धावत येते आणि प्रश्न विचारण्याऐवजी प्रत्यक्षात तीच आनंदात दोघांना म्हणते, ‘तुम्ही दोघांनी नुसत्या भारतीय नव्हे तर आमच्या दक्षिण पूर्व आशियाच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्यायत.’ -ते  ऐकताना मी ते गाणं पहिल्यांदा पाहिलं तेव्हाचा क्षण आठवतो आहे. मी तेलुगूच बघितलेलं मूळ. या दाक्षिणात्य भाषांमध्ये गुणवत्ता असावी तशी जी नादवत्ता आहे त्याला तोड नाही! ‘नाटू...’ म्हणत ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण बेदम नाचत सुटलेत. सोबत फिरंगी मेम साहेब भुरळ पडल्यासारख्या त्यांच्यासोबत नाचायला लागल्या आहेत. जोरकस, पौरुषयुक्त असं ते नर्तन आहे. चिडून इंग्रजी साहेब येतो आणि मल्लाने कुस्तीसाठी मातीत खेळावं तसे ते तिघे नाचत राहतात. अखेर इंग्रज खाली पडतो आणि दोघे स्वातंत्र्यवीर मनोमन हसतात. 
मी गाणं पाहिल्यावर पहिलं काय शोधलं तर नृत्य दिग्दर्शकाचं नाव! आज अकॅडमी अवॉर्ड मिळाल्यावर ‘आरआरआर’च्या अधिकृत ट्वीटवर प्रेम रक्षित या नृत्य दिग्दर्शकाचा आवर्जून उल्लेख केला आहे, हे बघून छान वाटलं  आणि हे दोघे गायक-कला भैरव, राहुल सिप्लिगुंज; या दोघांनी या गाण्याचं सोन केलं आहे आणि संगीतकार एम. एम. किरवाणी ! ..अर्थात, आमच्यासाठी ते नाव कायम एम. एम. क्रीम असं आधी मनात उमटणार.  सूर चित्रपटातलं ‘दिल मै जागी धडकन’ हे गाणं फक्त आठवा. बाकी ऑस्कर मिळाल्यावर जग या गाण्याचं कौतुक करत असताना भारतात काही बुद्धिजीवी पेटून समाजमाध्यमात टीका करत आहेत. टीकेची कारणं तरी किती-हे गाणं अभिजात नाही, या चित्रपटाचा उजवा प्रपोगंडा होता, काय फालतू शब्द आहेत इत्यादी!

पहिले शब्द! मुलाखत देताना गीतकार चंद्रबोस म्हणाले की, ज्यांना तेलुगू कळत नाही त्यांना आमच्या तेलुगू भाषेचा जो अंगभूत नाद आहे, तो वेडावून टाकतो आहे. किती खरं !  शब्द हे फक्त अर्थ नव्हे तर नाद संबोधनदेखील घेऊन येतात. दुसरा मुद्दा उजवा-डावा वगैरे.  तरुण आयएफएस मित्र-मैत्रिणींशी  बोलतो तेव्हा मनात पक्कं ठसतं की भारत आता जगाच्या रंगभूमीवर एक सशक्त नट बनला आहे. आपली कला नेहमीच ताकतीची होती; पण अनेकदा जागतिक पुरस्कार हे त्या त्या देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय ताकतीवर नकळत आधारलेले असतात. ऑस्करमध्ये या गाण्याला पुरस्कार मिळणं, हे त्या दृष्टीनेदेखील बघावं लागेल. शिवाय, चित्रपटाच्या आशयातदेखील मुळात ब्रिटिश या पाश्चात्य शक्तीशीच लढा आहे की, चीन आता जगाला वेठीला धरतोय अन् म्हणून की काय हे बघा, कोरियाच्या दिल्लीतील एम्बेसीमधील सगळे अधिकारी एकत्र  येऊन या गाण्यावर (मूळ तेलुगूवर) मस्त डान्स करत आहेत. तो व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जग कुठे चाललंय हे माहीत नसलेले आणि आपण नक्की कुठे आहोत, या संभ्रमात असलेले भारतीय अभिजन मात्र दुःखात आहेत. 

जाऊदे! आपण मस्त नाचूया. उजवा पाय घट्ट रोवत, डावा पाय गुडघ्यात वळवत, ‘नाटू...’ असं मस्तीत म्हणत! वर्तमानात राहण्याचं भाग्य हे अनेकदा द्रूतगतीत बेदम नाचताना असतं आणि आपलं स्वतःचं ऑस्कर नकळत त्या आनंदी क्षणी आपल्याला मिळूनही जातं. 
ashudentist@gmail.com

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: oscar winner natu natu song made the world crazy because

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर