गावागावात व्हावे अस्थिकुंड

By admin | Published: October 4, 2016 12:25 AM2016-10-04T00:25:25+5:302016-10-04T00:25:25+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पाईक लक्ष्मणदादा नारखेडे परवा भेटले. ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील श्री भूवैकुंठ आत्मानुसंधान आश्रमात ते राहतात.

Osthikund to be in the village | गावागावात व्हावे अस्थिकुंड

गावागावात व्हावे अस्थिकुंड

Next

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पाईक लक्ष्मणदादा नारखेडे परवा भेटले. ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील श्री भूवैकुंठ आत्मानुसंधान आश्रमात ते राहतात. हा आश्रम कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांनी स्थापन केला आहे. लक्ष्मणदादांनी आपले घरदार राष्ट्रसंतांच्या कार्यात आणि आयुष्य समाज जागरणासाठी समर्पित केले आहे. गावागावात अस्थिविसर्जन कुंड व्हावे, हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. हा तसा क्रांतिकारक विचार, समाजाला पचनी न पडणारा. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या अस्थींचे विसर्जन अलाहाबाद, त्र्यंबकेश्वरलाच व्हावे, हे परंपरेचे जोखड आपल्या मानगुटीवर पिढ्यान्पिढ्यांपासून घट्ट चिकटून असते. त्यामुळे गावातच अस्थी विसर्जित व्हाव्यात, ही गोष्ट आपण सहजासहजी स्वीकारत नाही. गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करताना आपल्या घरातील ज्येष्ठांचे आक्रसलेले चेहरे अशा वेळी आठवून पाहावेत.
अंत्यसंस्कारानंतरच्या अवास्तव धार्मिक विधींमुळे गरीब शेतकऱ्याचे सामाजिक, आर्थिक शोषण होते, ते थांबावे यासाठी तुकडोजी महाराज आयुष्यभर धडपडले. अंत्यसंस्कार, अस्थिविसर्जन त्यानंतर होणारी तेरवी, मासिक श्राद्ध, वर्षश्राद्ध या रुढींवर कर्ज काढून, उधार-उसने घेऊन सामान्य माणूस अवाढव्य खर्च करतो. तो अस्थी घेऊन काशी, अलाहाबादला जातो. तेथील पंडे, पुजारी त्याला लुटतात. या कर्जाच्या ओझ्याखाली तो आयुष्यभर पिचून राहतो, त्यातून कधीच बाहेर येत नाही. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या नष्टचर्याला कारणीभूत असलेली रुढी, परंपरांची ही अवनती राष्ट्रसंतांना ठाऊक होती. पिंडदान, श्राद्ध या कल्पना थोतांड असून त्यामुळे धनाचा, श्रमाचा आणि वेळेचा अपव्यय होतो, हे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून कळवळून सांगितले. परंतु ही जळमटे सहज नष्ट होणार नाहीत, हे वास्तव अनुभवांती लक्षात आल्यानंतर राष्ट्रसंतांनी मोझरी येथील श्री गुरुकुंज आश्रमात एक अस्थिविसर्जन कुंड निर्माण केले. इथे अस्थिविसर्जनासाठी लोक येतात. सकाळचे ध्यान आटोपल्यानंतर हा विधी होतो. अवघ्या पाच-दहा मिनिटांत तो पूर्ण होतो. एका रुपयाचा खर्च नाही तसेच पुजाऱ्याला गाय दान करायची गरजही नाही... असेच एक अस्थिविसर्जन कुंड राष्ट्रसंतांनी मध्य प्रदेशातील सौंसर येथेही निर्माण केले आहे. सहकाऱ्यांसोबत चर्चा करताना गावागावात असे कुंड निर्माण व्हावे, ही त्यांची तळमळ होती. त्यांच्या पश्चात हे कार्य गुरूदेव भक्तांना पुढे नेता आले नाही.
परंतु आज धार्मिकस्थळी बजबजपुरी माजली असताना गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात असे अस्थिविसर्जन कुंड निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसे झाले तर धार्मिक विधींवर होणारा खर्च वाचेल व त्यातून शिल्लक रक्कम गावातीलच लोककल्याणाच्या कार्यात उपयोगी पडेल. शिवाय तलाव, नदींचे प्रदूषणही थांबेल. तुकारामदादा गीताचार्यांनी जागृतीचे हे कार्य आयुष्यभर केले. अंत्यसंस्कारानंतर संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन कर्मकांडात धन खर्च न करता सत्कार्य करण्याचा संकल्प ते कुटुंबीयांकडून घ्यायचे. अशा कुटुंबांचा जाहीर सत्कारही करायचे. तुकडोजी महाराजांनीच सांगितले आहे. ‘ तुझं गावच नाही का तीर्थ? अरे रिकामा कशाला फिरतं... गावी राहती गरीब उपाशी, अन्नसत्र लावितोस काशी, हे दान नव्हे का व्यर्थ’?
या चळवळीच्या निमित्ताने गुरुकुंज आश्रमातील पदाधिकाऱ्यांना एक विनंती करावी वाटते, आश्रमात अस्थिविसर्जनाची प्रक्रिया पहाटेच करावी लागते. तसा दंडक महाराजांनी कधी घातला नाही. दिवसभरात केव्हाही तो करण्याची मुभा राहिली तर गरिबांना ते सोयीचे होईल. हा क्रांतिकारी विचार आपल्या गावात रुजविण्यासाठी सर्व सामाजिक संस्थांनी, शासनाने व त्याही आधी गावातील ग्रामपंचायतने समोर येणे गरजेचे आहे. मेल्यानंतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अस्थिविसर्जन केल्यामुळे स्वर्गसुख मिळते, अशी हिंदूंमध्ये धारणा आहे. परंतु गावातच जर अस्थिविसर्जन केले व त्यातून वाचवलेले पैसे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले तर मृतात्म्यांना स्वर्गही मिळेल व समाजाचे ऋण थोडे का होईना फेडल्याचे एक आंतरिक समाधान कुटुंबीयांच्या पदरात पडेल.
- गजानन जानभोर

Web Title: Osthikund to be in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.