संरक्षण दलात अधिकारी होण्याच्या इतर संधी
By admin | Published: June 25, 2017 01:20 AM2017-06-25T01:20:01+5:302017-06-25T01:20:01+5:30
संरक्षण दलात अधिकारी व्हायचे आहे, या ध्येयाने प्रेरित झालेल्या उमेदवारांची NDA मार्फत बारावीनंतर अधिकारी होण्याची संधी
प्रा. राजेंद्र चिंचोले
संरक्षण दलात अधिकारी व्हायचे आहे, या ध्येयाने प्रेरित झालेल्या उमेदवारांची NDA मार्फत बारावीनंतर अधिकारी होण्याची संधी हुकल्यास, १२वी विज्ञान या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर दोन मार्गांनी सैन्यदलात अधिकारीपदी काम करण्याची संधी मिळू शकते. त्यातील पहिला मार्ग आहे. ‘टेक्निकल एन्ट्री स्कीम’ या प्रवेश प्रक्रियेद्वारे १२वी गणित व भौतिकशास्त्र विषय घेऊन ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सेनादलातर्फे चालविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळतो. यासाठी आॅनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. उमेदवारांची १२वीच्या गुणांची गुणवत्ता यादी करून कट आॅफ गुणांच्या आधारे उमेदवारांनी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे भोपाळ, बंगलोर किंवा अलाहाबादला मुलाखतीस बोलाविले जाते. अंतिम निवड केलेल्या उमेदवारांना ४ वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते व त्यानंतर त्यांची लष्करी सेवेत अधिकारी म्हणून निवड होते. हिच पद्धत नौदलात अधिकारी होण्यासाठी व हवाई दलात अधिकारी होण्यासाठीदेखील आहे.
जीवशास्त्र विषय घेऊन १२वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज’मध्ये प्रवेश मिळविता येतो. यासाठी विद्यार्थ्यांना AIPMT या परीक्षेच्या आधारेच AFMC ला प्रवेश मिळतो. AIPMT सोबत विद्यार्थ्यांना AFMC साठी www.afmc.nic.inया वेबसाइटद्वारे आॅनलाइन रजिस्ट्रेशन आवश्यक असते. पात्र उमेदवारांना AFMC महाविद्यालयातून डॉक्टर होण्याची संधी मिळते, तसेच हैद्राबाद येथील आर्मी डेंटल कॉलेजमार्फत डॉक्टर होऊन लष्करात आरोग्य सेवेत सहभागी होऊन वैद्यकीय सेवेची संधी मिळते. मिलिटरी इंजिनीअरिंगच्या माध्यमातून अधिकारी बनण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) मार्फत सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी हुकल्यास सैन्यदलात अधिकारी होण्याच्या आणखी काही संधी उपलब्ध आहेत. यात ‘टेक्निकल ग्रॅज्युएट एन्ट्री स्कीम’द्वारे इंजिनीअरिंग पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सैन्यदलाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो.
‘इंडियन आर्मी युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम’ च्या माध्यमातून इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकविणाऱ्या विद्यार्थ्यांना सैन्यदलाद्वारे कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातूनदेखील अधिकारी बनण्याची संधी उपलब्ध होते. यासाठी वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे आहे. यात सैन्यदलाद्वारे चाळणी परीक्षा, नंतर मानसिक क्षमता चाचणी गटचर्चा, मुलाखत, शारीरिक चाचणी घेतली जाते व नंतर पात्र उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड होते, तसेच ‘इंडियन नेव्ही युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम’च्या माध्यमातून नौदलात अधिकारी बनण्यासाठीची संधी प्राप्त होते. ‘इंडियन एअरफोर्स व युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम’च्या माध्यमातून हवाई दलात अधिकारी बनण्याची संधी प्राप्त होते.
पदवी असलेल्या व एनसीसीचे सी सर्टिफिकेट मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डामार्फत थेट मुलाखतीची संधी प्राप्त होते. मुलाखतीत पात्र उमेदवारांची सैन्यदलात अधिकारी बनण्याची संधी प्राप्त होते. या विद्यार्थ्यांना परीक्षेतून सूट देण्यात येते. भारताची समुद्र सीमेचे संरक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलात पदवीधर उमेदवारांना अधिकारी होण्याची संधी उपलब्ध आहेत. ‘भारतीय लष्कर प्रबोधिनी’द्वारे तांत्रिक विषयातील पदवीधरांसाठी लष्करात अधिकारी होण्यासाठी लेखी परीक्षा न देता सर्विस सिलेक्शन बोर्डाद्वारे थेट मुलाखतीची संधी प्राप्त होते. तसेच ‘अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी’द्वारे तांत्रिक विषयातील पदवीधरांसाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे थेट मुलाखतीची संधी प्राप्त होते. मुलाखतीत यशस्वी उमेदवारांची भारतीय लष्कर प्रबोधिनी, तसेच अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत अधिकारी बनण्याची संधी प्राप्त होते.
आपापले व्यवसाय सांभाळून देशसेवा करणाऱ्यांसाठी सैन्यातील टेरिटोरिअल आर्मी किंवा प्रादेशिक सेना हा पर्याय उपलब्धस आहे. देशासाठी काहीतरी करायचे आहे, देशाचे आपण देणे लागतो, या भावनेतून अनेक तरुणांची क्षमता, इच्छा, महत्त्वाकांक्षा सैन्यदलात जाण्याची असते, पण आपला व्यवसाय, उद्योग, नोकरी सांभाळून सैन्यात पूर्ण वेळ सेवा न करता, देशाला गरज असेल, त्या वेळेस (वर्षातून दोन महिने) टेरिटोरिअल आर्मी किंवा प्रादेशिक सेनाच्या माध्यमातून सेवा बजावता येते. ज्या काळात तुम्ही देशाला प्रत्यक्ष सेवा देता, त्या वेळेस तुमचा दर्जा सैन्यातील अधिकाऱ्यांप्रमाणेच असतो. वयाच्या १८ ते ४२ वर्षांपर्यंत या सेवेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया पार केल्यास, पात्र उमेदवारास लेफ्टनंट या पदावर नियुक्ती मिळते. सेवा ज्येष्ठतेनुसार बढतीच्या संधी उपलब्ध होतात. देशाला आवश्यकता भासल्यास कितीही कालावधीसाठी प्रादेशिक सेनेला सेवेसाठी बोलविले जाऊ शकते. उमेदवारास पूर्ण वेळ सेवा देण्याचा पर्यायदेखील उपलब्ध असतो. महाराष्ट्रातील उमेदवारांना प्रादेशिक सेनेत प्रवेशासाठी अर्ज पुण्यातील प्रादेशिक सेनेच्या साऊदन कमांडच्या मुख्यालयाकडे पाठवावा लागतो. प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू बोर्डाकडून वस्तुनिष्ठ परीक्षा घेण्यात येते. यानंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून मुलाखत व लष्करी वैद्यकीय मंडळाकडून चाचणी घेतल्यानंतर उमेदवारांची निवड होते.
भविष्याची निश्चित दिशा ठरवून भारतीय संरक्षण दलात अधिकारी होण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर मेहनत, समर्पण, शारीरिक तंदुरुस्ती, निष्ठा, सचोटी, उत्साह हे गुण आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सैन्यदलातील करिअरकडे एक पॅशन व राष्ट्रसेवेचे उदात्त कार्य म्हणून पाहावे.
rjchinchole@gmail.com