...अन्यथा ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे विनाश अटळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 01:15 PM2024-06-02T13:15:25+5:302024-06-02T13:22:20+5:30

- अविनाश कुबल (ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक)  जवळपास २० वर्षांपासून जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होत असलेले ऋतुबदल याचे छोटे-मोठे परिणाम ...

...otherwise destruction due to 'global warming' is inevitable | ...अन्यथा ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे विनाश अटळ

...अन्यथा ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे विनाश अटळ

- अविनाश कुबल
(ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक) 

जवळपास २० वर्षांपासून जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होत असलेले ऋतुबदल याचे छोटे-मोठे परिणाम दिसून येत होते. परंतु, आता गेल्या पाच वर्षांमध्ये याची तीव्रता आणि याचे प्रमाण वाढत चालले आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांचे निरीक्षण आणि अभ्यास केला असता सर्वत्र जागतिक तापमानवाढीच्या आणि ऋतुबदलाच्या खाणाखुणा दिसून येत आहेत.

समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला कोकण, सह्याद्रीच्या पलीकडचा खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र, त्याच्या पूर्वेला असलेला मराठवाडा आणि सुदूर पूर्वेचा विदर्भ अशा वैविध्यपूर्ण प्रदेशांवर झालेल्या परिणांमामुळे सर्वत्र हलकल्लोळ माजलेला आहे. अर्थातच त्याला जोड आहे ती मानवनिर्मित घटकांचीसुद्धा. 

कोकणात सह्याद्रीमध्ये प्रमाणाबाहेर गेलेले वणवे, सोबतच गेल्या काही वर्षांत सह्याद्रीमध्ये झालेली बेफाम वृक्षतोड, त्याकडे नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष, नष्ट होत असलेली सह्याद्रीतील जैवविविधता, यामुळे बिघडलेले पर्यावरण आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे होणारे डोंगरांचे भूस्खलन आणि पुरांचे वाढलेले प्रमाण. याचा परिणाम म्हणजे शेती, मासेमारी आणि फळबागा या कोकणातील पारंपरिक व्यवसायांचे प्रचंड नुकसान. डोंगर पोखरून केलेले वाढते खाणकाम, जंगले नष्ट झाल्यामुळे अन्नाच्या शोधत जंगलातून बाहेर पडलेले माकडे, गवे, हत्ती यासारखे प्राणी मोठ्या प्रमाणात शेती आणि फळबागांची नासधूस करीत आहेत. 

मराठवाडा : पाण्याचा अतिउपसा
मराठवाड्याची परिस्थिती सर्वांत जास्त वाईट आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचा अभाव, अतिउपशामुळे भूगर्भजलाची खालावलेली पातळी, हा फारच मोठा जटिल प्रश्न या प्रदेशाला भेडसावतो आहे. कोरडवाहू प्रकारच्या शेतीवर प्रामुख्याने अवलंबून असलेला हा प्रदेश सोबतच जमिनीच्या ऱ्हासामुळे झालेले अत्यंत घातक परिणाम भोगत आहे. 

प. महाराष्ट्र : शेती संकटात
पश्चिम महाराष्ट्र हा पाण्यासाठी पूर्णपणे सह्याद्रीवर अवलंबून असलेला प्रदेश. पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे सोबतच भूगर्भजलाचा प्रमाणाबाहेर उपसा यासारख्या मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देणे कठीण झालेले आहे. 
पाण्याअभावी शेती तर संकटात आलीच आहे, परंतु सोबत भूगर्भातील पाण्याची पातळी प्रमाणाबाहेर खालावल्यामुळे त्याचा परिणाम नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या वनस्पती सृष्टीवर झाल्याचे दिसून येत आहे. 
स्थानिक वनस्पती नष्ट होऊन त्याऐवजी आक्रमकपणे फोफावणाऱ्या वनस्पती प्रजातींनी सुपीक जमिनीवर आक्रमण केले आहे. केवळ व्यावसायिक पिके घेण्यावर असलेला भर, त्यासाठी लागणारे भरमसाठ पाणी, रसायनांचा वापर, त्यामुळे नापिक झालेल्या शेतजमिनी, या सर्वांचा अत्यंत वाईट परिणाम शेतीआधारित उद्योगधंद्यांवर झाला आहे.

खान्देश : शहरांकडे स्थलांतर
खान्देश प्रदेशाचा विचार केला असता अत्यंत अनियमित झालेल्या पावसामुळे कधी दुष्काळ, तर कधी पूरस्थिती त्यामुळे शेतीचे आणि इतर पारंपरिक व्यवसाय म्हणजे दूधदुभते वगैरेची झालेली प्रचंड हानी. त्यामुळे खान्देशातील लोकांची झालेली वाताहत रोखण्यासाठी कोणतेही ठोस असे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. परिणामी खान्देशातील लोकांना शहरांकडे स्थलांतराचा पर्याय स्वीकारणे भाग पडत आहे.

विदर्भ : दुष्काळाची भीती
विदर्भ प्रदेशाची परिस्थितीसुद्धा बऱ्याचशा अंशी मराठवाड्यासारखीच झालेली आहे. पाण्याच्या अभावी जवळपास नष्ट झालेली शेती, फळबागा, पशुधन यामुळे जवळपास दुष्काळी स्थिती या प्रदेशात दिसून येते.

जमिनीचे तापमान वाढले आणि...
जमिनीचे तापमान वाढल्याने जिवाणू नष्ट झाले आहेत. जमिनीची फळद्रूपता कमी अथवा नष्ट होत आहे. 
प्रशासनाने अशावेळी वनविभाग, शेती विभाग, जलसंधारण विभाग, अशा सर्वांना एकत्र करून जागतिक तापमानवाढ आणि ऋतुबदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आराखडा तयार 
करून आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद करून काम सुरू करायला हवे. 
समुद्रकिनारपट्टी, डोंगराळ भाग, नद्या, तलाव, पाणथळ जागा, गवताळ प्रदेश आणि शुष्क पठारे अशी कोणत्या प्रकारची भूपृष्ठरचना यातून मुक्त नाही आणि त्यामुळेच आपली सर्व शहरे, खेडी, गावे ही सुद्धा भयानक परिस्थितीला सामोरी जाणार आहेत. हे सर्व थांबवायलाच हवे, अन्यथा मानवजातीचा विनाश अटळ आहे.

Web Title: ...otherwise destruction due to 'global warming' is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.