खमक्या नेतृत्वाची सैरभैर फौज

By Admin | Published: October 28, 2016 04:50 AM2016-10-28T04:50:34+5:302016-10-28T04:50:34+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने अजित पवार राजकारणाची नव्याने मांडणी करीत आहेत... या खमक्या नेत्याच्या सैरभैर फौजेची बांधणी ते कसे करणार?

Outlaws of Risk Leadership | खमक्या नेतृत्वाची सैरभैर फौज

खमक्या नेतृत्वाची सैरभैर फौज

googlenewsNext

- राजा माने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निमित्ताने अजित पवार राजकारणाची नव्याने मांडणी करीत आहेत... या खमक्या नेत्याच्या सैरभैर फौजेची बांधणी ते कसे करणार?

सोलापूर जिल्हा आणि शरद पवार यांचे तसे जुने जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे राजकीय नाते! ७० च्या दशकात कृषी राज्यमंत्री असलेल्या पवारांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळताना या नात्याची बांधणी केली. त्यामुळे राजकारणात ते जसजसे मोठे होत गेले तसतसे ते नातेही घट्ट होत गेल्याचा अनुभव सर्वांना आला. त्याच कारणाने सोलापूर जिल्ह्यातील कोणतेही पद त्यांनी पाठविलेल्या बंद पाकिटातील नावावरून निश्चित व्हायचे.
पण गेल्या दशकात परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्यांचा संपर्क मर्यादित नेत्यांपुरताच राहू लागला आणि जिल्ह्याचे आणि त्यांचे राजकीय नाते ठिसूळ बनले. या पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात तब्बल चार दिवस जिल्ह्यात घेतलेल्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या राजकीय नात्याची आठवण सर्वांनाच झाली असावी.
शरद पवार आणि अजित पवार या दोघांची राजकीय कार्यपद्धती तशी भिन्न जातकुळीचीच! काका कुणालाही तळ शोधू न देणारे तर पुतणे अजितदादा रोखठोक बोलून ‘आत एक - बाहेर दुसरेच’ तत्त्वाला हद्दपार करणारे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना कार्यकर्त्यांच्या दोन स्वतंत्र फळ्या नैसर्गिकरीत्या तयार झाल्या. त्या फळ्यांनी थोरले पवार व धाकले पवार यांच्या कार्यपद्धतीशी सोयीने जुळवून घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा आभास निर्माण झाला. त्याच आभासाने पक्ष आणि नेते यांचा वापर आपले ‘सवतेसुभे’ मजबूत करण्यासाठी केला. परिणामी सवतेसुभे मजबूत झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेतेही जनतेपासून कधी दूर गेले हे कोणाला कळले नाही. आपल्या सुभ्यातील सत्ताकारणाला मदत करणारा सोयीचा नेता हे सूत्र गेल्या १०-१५ वर्षांत जिल्ह्यात रूढ झाले. देशात सर्वाधिक साखर कारखाने असणारा ३८ कारखान्यांचा जिल्हा म्हणून ख्याती निर्माण झाली. ते निर्माण करणारा राष्ट्रवादी पक्ष मात्र कागदावरच राहिला. निवडणुकीत सोयीचा आणि उमेदवारी देणारा तो आपला पक्ष अशीच काहीशी गणिते राष्ट्रवादी पक्षाची फौज मांडू लागली.
ही पार्श्वभूमी घेऊन जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मोर्चेबांधणीसाठी अजित पवार गतिमान झाल्याचे दिसले. यावेळी त्यांच्या गतिमानतेतील वेगळा दृष्टिकोन मात्र दिसला. परंपरेने चालत आलेल्या तथाकथित गाजावाजा करणाऱ्या मेळाव्यात न गुंतता थेट लोकांमध्ये जाण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचे दिसले.
७० हजार कोटी रुपयांच्या जलसंपदा विभागातील घोटाळ्याचा बनाव विरोधकांनी कशा पद्धतीने केला आहे हे ते आकडेवारीसह स्पष्ट करताना दिसले. आपला स्वभाव फटकळ नसून स्पष्टवक्तेपणाचा असल्याचे देखील ते कृतीने पटवून देताना दिसले. चितळे समितीने दिलेल्या दाखल्याच्या हवाल्याने राज्यात सहा टक्के सिंचन क्षेत्र वाढल्याचे ठासून सांगताना ते दिसले. उजनी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय त्यांनीच घेतला व धरणाची पाणी साठवण क्षमता ११४ टक्क्यांवर गेली हे देखील ते पहिल्यांदाच बोलताना दिसले. उजनी धरणासह कृष्णा खोऱ्यात त्यांनी उभ्या केलेल्या प्रकल्पाची माहिती देताना सोलापूर जिल्हा रब्बी हंगामाचा होता तो बागायती कसा झाला? हेही ३८ साखर कारखान्यांचा पुरावा देत बोलताना दिसले. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात त्यांना विश्वासाने सोबत घेण्याची निती त्यांनी अवलंबिली. ते करतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क राहावा यासाठी आता ते जाहीर भाषणातच आपला मोबाईल क्रमांक कार्यकर्त्यांना देताना दिसले.
कार्यकर्त्यांचा तोंडदेखलेपणा, फुका बडेजाव आणि पुढे पुढे करण्याच्या वृत्तीवर अजित पवार तुटून पडताना दिसले. एक आक्रमक आणि दूरदृष्टी असलेला स्पष्टवक्ता नेता अशी प्रतिमा नव्याने निर्माण करू पाहणाऱ्या अजित पवारांकडे ‘खमक्या’ नेता म्हणून पाहिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या महापालिका-नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य मात्र त्यांच्या जिल्ह्याजिल्ह्यांत सैरभैर झालेल्या फौजेच्या बांधणीवरच अवलंबून आहे.

Web Title: Outlaws of Risk Leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.