ओढवलेला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 04:54 AM2018-08-14T04:54:10+5:302018-08-14T04:54:33+5:30
‘जेव्हा संघ चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहून त्यांना पाठिंबा देतो. पण लढत न देता पत्करलेला पराभव निराशाजनक असतो,’ हे कसोटी क्रिकेटचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचे लॉडर््सवरील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतरचे परखड मत पाहिले तर भारताने कसा पराभव ओढवून घेतला, याची कल्पना येते.
‘जेव्हा संघ चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहून त्यांना पाठिंबा देतो. पण लढत न देता पत्करलेला पराभव निराशाजनक असतो,’ हे कसोटी क्रिकेटचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचे लॉडर््सवरील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतरचे परखड मत पाहिले तर भारताने कसा पराभव ओढवून घेतला, याची कल्पना येते. खेळामध्ये जय-पराजय होत असतात हे मान्य; पण अखेरपर्यंत झुंजण्याची, प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याची वृत्ती भारतीय संघात दिसूनच आली नाही. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींच्या मते भारतीय संघ मायदेशात वाघाप्रमाणे खेळतो, पण विदेशात गेल्यावर त्यांचे पानिपत होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकरांची ओळख ‘खडूस’ अशी आहे. कोणत्याही परिस्थितीत सहजासहजी हार पत्करायची नाही, अशी शिकवण देणारी कांगा लीग येथे होते. जागतिक स्तरावर हीच शिकवण इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट देते. पण टी२०च्या वेगात सुसाट धावणाºया ‘बीसीसीआय’ला खेळाडूंना कौंटी क्रिकेट खेळविण्यास पाठविण्याची गरजच भासत नाही. त्याचा किती फटका बसू शकतो, ते इंग्लंड दौºयात दिसून आले. चेतेश्वर पुजारा व इशांत शर्माव्यतिरिक्त सध्याच्या भारतीय संघात कोणीही कौंटी क्रिकेट खेळलेले नाही. मुळात इंग्लिश वातावरणात क्रिकेट खेळणे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. या दौºयावरील प्रत्येक संघ तयारीनिशीच येतो. मुख्य मालिका खेळण्याआधी किमान दोन सराव सामने पाहुण्या संघाकडून खेळले जातात. मात्र भारताने एकाच सराव सामन्यावर भर दिला आणि तो सामनाही चार दिवसांवरून तीन दिवस खेळविण्यास भाग पाडले. अशा परिस्थितीमध्ये रवी शास्त्री-विराट कोहली संघाकडून विजयाची अपेक्षा कशी करू शकतात? कसोटी मालिकेसाठी झालेली संघनिवड हाही वादाचा विषय ठरला. त्या चुकांची कबुली आता कोहली देतो आहे. पहिल्या अटीतटीच्या कसोटीत थोडक्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यात कोहलीचा इंग्लिश वातावरणाचा चांगला अनुभव असलेल्या पुजाराऐवजी लोकेश राहुलला संधी देण्याचा निर्णय धक्कादायक होता. दुसºया डावात फिरकी गोलंदाज वरचढ ठरत असतानाही कोहलीने रवीचंद्रन अश्विनऐवजी वेगवान गोलंदाजांकडे चेंडू जास्त वेळ सोपविल्याने सामना अकारण गमवावा लागला. दुसºया कसोटीचा पहिला दिवस पावसाने धुतल्यानंतरही कोहलीने धडा घेतला नाही. परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी पूरक असतानाही त्याने दोन फिरकी गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच कोहलीच्या नेतृत्वक्षमतेवर मोठे प्रश्न निर्माण झाले. फलंदाज म्हणून कोहली या कसोटी मालिकेत इतरांपेक्षा उजवा ठरला असला, तरी कर्णधार म्हणून त्याने अनेक चुका केल्याने उर्वरित सामन्यांत प्रशिक्षक रवी शास्त्रीसह संपूर्ण संघाची मोठी ‘कसोटी’ लागणार हे निश्चित.