प्राणवायूच ‘गॅसवर’?

By Admin | Published: October 6, 2016 05:12 AM2016-10-06T05:12:22+5:302016-10-06T05:12:22+5:30

रस्ते तुम्हाला आॅक्सिजन देणार आहेत का? झाडांची अशीच कत्तल होत राहिली आणि नवी झाडे लागली नाहीत तर निकट भविष्यात लोकांना आॅक्सिजनचे सिलिंडर सोबत घेऊन वावरावे लागेल

Oxygen 'gas'? | प्राणवायूच ‘गॅसवर’?

प्राणवायूच ‘गॅसवर’?

googlenewsNext

रस्ते तुम्हाला आॅक्सिजन देणार आहेत का? झाडांची अशीच कत्तल होत राहिली आणि नवी झाडे लागली नाहीत तर निकट भविष्यात लोकांना आॅक्सिजनचे सिलिंडर सोबत घेऊन वावरावे लागेल, असा इशारा राष्ट्रीय हरित लवादाने दिला होता. तो खरा ठरण्याची भीती आता निर्माण झाली आहे. जगातील ९० टक्के लोक प्रदूषित हवेचे श्वसन करीत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. विकास प्रकल्पाच्या नावावर सरेआम होणारी वृक्षतोड, तपमान वाढ आणि वातावरणातील प्रचंड वाढलेल्या प्रदूषणामुळे लोकांना मोकळा श्वास घेणेही आज दुरापस्त झाले आहे. मनुष्याला प्राणवायू देणारी हवाच मृत्युदायी बनल्याने ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जगभरातील तीन हजार शहरांमधील प्रदूषणाच्या पातळीचे अध्ययन केल्यावर हा अहवाल तयार झाला आहे. त्यानुसार दहापैकी नऊ लोकांना अशुद्ध हवा मिळते आहे. या गंभीर परिस्थितीला सर्वस्वी मानवच जबाबदार आहे, हे वेगळे सांगायचा नको. नैसर्गिक स्रोत संपवायचे आणि मग तेच कृत्रिम पद्धतीने मिळवायचे, अशी खोडच आम्हाला लागली आहे. खरे तर निसर्गाने मोफत शुद्ध हवेची व्यवस्था केली आहे. पण आम्हाला ती नको आहे. म्हणूनच ती हवा प्रदूषित करून मग शुद्ध हवेसाठी नवनवीन वैज्ञानिक प्रयोग सुरू झाले आहेत. आॅक्सिजन बार आणि पार्लरची संकल्पना भारतासह अनेक देशांत यापूर्वीच अस्तित्वात आली आहे. १९९७ साली जपानमध्ये अशा पार्लरचा ओनामा झाला. त्यानंतर आशिया, युरोप आणि अमेरिकेतही त्याचे लोण पसरले. भारतात १९९९ साली बेंगळुरूमध्ये असे पार्लर आले. तणावपूर्ण आणि प्रदूषित जीवनातून दिलासा देण्यास हे पार्लर उपयुक्त असल्याचा दावा केला गेला. आता त्याही पुढे जात आता आॅक्सिजनच्या बाटल्या विक्रीला आल्या आहेत. सध्या चीनमध्ये या आॅक्सिजनच्या बाटल्यांची मागणी फार वाढल्याचे समजते. तेथील प्रदूषणाने सर्व मर्यादा ओलांडल्याने ही भयावह स्थिती निर्माण झाली आहे. लोक १४ ते २० डॉलर्समध्ये ही बाटली खरेदी करीत आहेत. हरित लवादाने दिलेला इशारा लक्षात घेता भारतातही ही वेळ काही दूर नाही. कृत्रिम पावसाचे प्रयोग आपण करतच आहोत. लोकांना शुद्ध पाणी विकत घ्यावे लागेल अशी कल्पना कुणी केली नव्हती. त्यामुळे भविष्यात आॅक्सिजन सिलिंडर आणि बाटल्याही खरेदी कराव्या लागल्या तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. निसर्गाकडून मोफत मिळणारा प्राणवायू संपवायचा आणि मग बाटल्यांमध्ये पैसे मोजून तो मिळवायचा यात कुठला शहाणपणा आहे, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.

Web Title: Oxygen 'gas'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.