पं.उल्हास बापट : जादुई संगीताचा निगर्वी कलावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:15 AM2018-01-05T00:15:52+5:302018-01-05T00:16:25+5:30

संतूर या लोकसंगीतातील वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीताचे ‘सोलो’ वाद्य म्हणून मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्यांनी निष्ठेने अपार मेहनत घेतली, अशा प्रतिभावंत कलावंतांमध्ये पं. उल्हास बापट यांचे प्रमुख स्थान आहे. उल्हासजींच्या जादुई संगीताने रसिकांच्या दोन पिढ्यांना तृप्त केले. ‘संतूर’ने मला ओळख दिली, असे म्हणून तिच्या ऋणात राहिलेल्या या गुणी व निगर्वी कलावंतास वाहिलेली अल्पशी श्रद्धांजली.

 P. Ulhas Bapat: The Artist of Magical Music | पं.उल्हास बापट : जादुई संगीताचा निगर्वी कलावंत

पं.उल्हास बापट : जादुई संगीताचा निगर्वी कलावंत

googlenewsNext

- अमदेन्द्र धनेश्वर

संतूर या लोकसंगीतातील वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीताचे ‘सोलो’ वाद्य म्हणून मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्यांनी निष्ठेने अपार मेहनत घेतली, अशा प्रतिभावंत कलावंतांमध्ये पं. उल्हास बापट यांचे प्रमुख स्थान आहे. पं. रविशंकर यांनी स्थापन केलेल्या ‘संचारिणी’ या संस्थेसाठी मुंबईत १९७५ मध्ये केलेल्या पहिल्या जाहीर कार्यक्रमापासून उल्हासजींच्या जादुई संगीताने रसिकांच्या दोन पिढ्यांना तृप्त केले. ‘संतूर’ने मला ओळख दिली, असे म्हणून तिच्या ऋणात राहिलेल्या या गुणी व निगर्वी कलावंतास वाहिलेली अल्पशी श्रद्धांजली.

‘ओन्ली पॅशन, ग्रेट पॅशन कॅन एलेव्हेट मेन टू द ग्रेट थिंग्ज’ या ग्रीक विचारवंताचे हे वचन संतूरवादक पं. उल्हास बापट यांना तंतोतंत लागू पडते. अत्यंत पोरसवदा वयात त्यांनी शिवकुमार शर्मांचा संतूर प्रथम ऐकला. त्या नादाने ते इतके मोहित झाले की, त्यांनी स्वत: संतूरवादनाची विद्या व तंत्र आत्मसात केले आणि त्यावर असाधारण प्रभुत्व मिळवले. एक संतूरवादक म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि अवघ्या संगीतजगतावर आपली छाप टाकली.
त्यांचा जन्म संगीतकाराच्या घराण्यात झाला नव्हता. त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते. पण मुलात असलेले गुण त्यांनी पारखले आणि त्याला रमाकांत म्हापसेकरांकडे तबला शिकण्यासाठी पाठविले. उल्हासना या शिक्षणाचा पुढे फारच उपयोग झाला. कारण संतूर हे वाद्य लयीच्या अंगाने खुलणारे आहे. रागदारीचे आणि एकूण रागसंगीताचे शिक्षण त्यांनी कृष्णा गुंडो गिंडेसाहेबांकडे व वामनराव सडोलीकरांकडे घेतले. अशारीतीने रागांवर प्रभुत्व मिळवल्यानंतर सरोदवादक झरीन शर्मांकडे तंतूवादनाचे शिक्षणही त्यांना मिळाले. एक चतुरस्र वादक म्हणून १९७० च्या दशकात त्यांचे नाव होऊ लागले.
बापट यांनी क्रोमॅटिक ट्युनिंग नावाची वाद्य जुळविण्याची पूर्णपणे स्वतंत्र आणि वेगळी शैली विकसित केली. त्यामुळे संतूरच्या अंगभूत मर्यादा त्यांना वादक या नात्याने ओलांडता आल्या. संतूरवादनातील हा बदल क्रांतिकारक होता. एकदा मुुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये ‘संतूर संध्या’ नावाचा कार्यक्रम होता. त्यात बापट यांनी श्रोत्यांना फर्माईश विचारली. ‘बागेश्री’ आणि ‘जयजयवंती’पासून मालकंसपर्यंत अनेक फर्माईर्शी आल्या. सुहास्यवदनाने त्यांनी त्या ऐकल्या आणि मेंदूत टिपून ठेवल्या आणि उत्स्फूर्तपणे एक रागमाला रचून तिथल्या तिथे श्रोत्यांसमोर सादर केली. संतूरच्या इतिहासातील या अजब करामतीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिल्याचे स्मरते.
बापट यांचे वाद्य जुळविण्याचे तंत्र संगीत दिग्दर्शक राहुल देव बर्मन यांनी प्रथम पाहिले, तेव्हा ते विस्मयचकित झाले होते. त्यांनी बापटना शपथच घातली. ‘ये स्टाईल कभीभी मत बदलना. कसम खाओ’. आर. डी., खय्याम, वनराज भाटिया, अशोक पत्की, श्रीनिवास खळे, अनिल मोहिले, कौशल इनामदार वगैरे संगीत दिग्दर्शकांचे ते अत्यंत लाडके संतूरवादक होते. मिंड आणि गमक संतूरमधून निर्माण करणारे आणि सरोद आणि सतार या वाद्यांच्या स्तरावर संतूरला नेऊन पोहोचविणारे पं. उल्हास बापट हे अत्यंत मिश्किल आणि विनोदप्रिय होते. ५० दिवस रुग्णशय्येवर निपचित पडून त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागावा, हा दैवदुर्विलास आहे.

Web Title:  P. Ulhas Bapat: The Artist of Magical Music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.