पद्मावती छे... शूर्पणखा
By संदीप प्रधान | Published: November 23, 2017 11:44 PM2017-11-23T23:44:50+5:302017-11-23T23:45:04+5:30
दीपिका आपले नाक मुठीत धरून बसली आहे. संजय लीला भन्साळी अस्वस्थतेने येरझारा घालत आहेत.
दीपिका आपले नाक मुठीत धरून बसली आहे. संजय लीला भन्साळी अस्वस्थतेने येरझारा घालत आहेत. सुटाबुटातील इन्शुरन्स कंपनीचा अधिकारी कपाळावरील घाम पुसत आहे तर एक पटकथा लेखक आपली स्क्रीप्ट वाचत आहे.
दीपिका : संजय, माझं नाक कापणार असं ते करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्रनाथ म्हणतायत. आय अॅम स्केअर्ड... (नाक मुठीत घट्ट धरून ठेवते)
इन्शुरन्स अधिकारी : संजय, मी हात जोडून विनंती करतो. हा चित्रपट रिलीज करू नका. आमचे फार मोठ्ठे नुकसान होईल. दीपिका हिच्या नाकाचा १०० कोटींचा विमा आम्ही मागच्याच महिन्यात उतरवलाय.
संजय : तुम्हाला तुमच्या कंपनीच्या नुकसानीची पडली आहे. पण माझे २०० कोटी बुडायची वेळ आलीय त्याचे काय?
लेखक : थांबा...थांबा... माझ्याकडे अफलातून आयडिया आहे. समजा त्यांनी दीपिकाचे नाक कापले...
दीपिका : (किंचाळते) नो...नो... नो...
संजय : अगं, जरा ऐकून तर घे...
लेखक : समजा दीपिकाचे नाक कापलं गेलं तर पद्मावतीच्या रिलीजपूर्वी आपण ‘शूर्पणखा’ हा पिक्चर रिलीज करू. माझी स्क्रीप्ट तयार आहे. शूर्पणखा ही रावणाची बहीण. राम, सीता व लक्ष्मण पंचवटीत वनवास भोगत असताना शूर्पणखा तेथे आली आणि रामाला पाहून मोहित झाली. रामाला आकृष्ट करण्याकरिता कमनीय बांधा, नाजूक कांती, मादक नजर आणि अल्लड हास्य. आपण विवाहित असल्याने तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे राम शूर्पणखेला सांगतो. आपल्या आणि रामाच्यामध्ये सीता असल्याने शूर्पणखा सीतेला मारायला धावते. लागलीच राम शूर्पणखेला विद्रूप करण्याकरिता तिचे नाक कापण्याची आज्ञा लक्ष्मणाला करतो. फिल्ममध्ये शूर्पणखा आणि सीतेचे एका भन्नाट साँगवरील नृत्य टाकू. हीट फॉर्म्युला.
संजय : मस्त, दीपिका या स्क्रीप्टमध्ये ड्रामा, इमोशन आहे. आता तुझे नाक कापले गेले तरी त्याची चिंता करू नकोस. ही फिल्म नक्की ५०० कोटींचा धंदा करील. या इन्शुरन्स कंपनीवाल्यालाही मग चिंता करायला नको.
दीपिका नाक घट्ट धरून बसते...